कराची : पाकिस्तानात तालिबानी राजवट आणण्यासाठी धडपडत असलेल्या ‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ अर्थात टीटीपी या दहशतवादी संघटनेने चक्क पाकिस्तानच्या १६ अणूशास्त्रज्ञांचे अपहरण केल्याची घटना ९ जानेवारी रोजी सकाळी समोर आली आहे. या संघटनेने एक व्हीडिओ जारी केला असून त्यात एक शास्त्रज्ञ शहबाज यांनी पाकिस्तानच्या सरकारकडे सुरक्षेसाठी याचना केली आहे.
दरम्यान, २०२१ पासून पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचे हत्यासत्र सुरू असून, यामागे भारताचाच हात असल्याची गरळओक अमेरिकेच्या ‘वॉशिंगटन पोस्ट’ आणि ब्रिटनच्या ‘द गार्जियन’ या वृत्तपत्रांतून सुरू होती. तर पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मुमताज जहरा यांनी भारताच्या रॉ संघटनेवर आरोप केले होते.
मात्र, आज टीटीपीने जारी केलेल्या व्हीडिओमुळे अमेरिका, ब्रिटन हे पाकिस्तानची दिशाभूल करून भारतावर बिनबुडाचे आरोप करत होते, हे स्पष्ट झाले आहे. १६ डिसेंबर २०१४ रोजी, तहरीक-ए-तालिबानच्या सहा दहशतवाद्यांनी पेशावरमधील सैनिक शाळेवर हल्ला केला होता आणि १२६ मुलांची हत्या केली होती.
पाकिस्तानने ३ जानेवारी रोजी टीटीपीच्या तळांवर अफगाणिस्तानमध्ये हवाई हल्ले केले होते. त्यानंतर अफगाणिस्तानचे परराष्ट्र खात्याचे उपमंत्री शेर मोहम्मद अबास स्टॅनिकजई यांनी पाकिस्तानला चार दिवसांपूर्वीच इशारा दिला होता. आणि आता त्यांनी अणूबॉम्ब बनवण्याच्या कामात गुंतलेल्या १६ शास्त्रज्ञांचे अपहरण करून पाकिस्तानला खुले आव्हान दिले आहे.