शेती, बागायती, पशुपालन, पारंपरिक उद्योग धंदे, पर्यावरणीय पर्यटन आपणाला अपेक्षित शाश्वत विकास साध्य करण्यास सहाय्य करेल का? याच्यावर गोवा राज्याचे वर्तमान आणि भविष्य सुरक्षित राहील.
हिं दुस्थानातील पोर्तुगीज राज्याच्या सशस्त्र दलाचा कमांडर इन चीफ या नात्याने जनरल मानुयल आंतोनियु व्हासालु इ सिल्वा यांनी १९ डिसेंबर १९६१ रोजी रात्री ८.३० वाजता बिनशर्त शरणागती पत्करली. लेफ्टनंट जनरल के. पी. कॅन्डेथ आणि भारतीय सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांच्या आणि सैनिकांच्या शौर्यामुळे पोर्तुगीजांच्या गुलामगिरीखाली खितपत पडलेल्या गोवा, दमण आणि दीव प्रदेशातील जनतेला स्वातंत्र्याची प्राप्ती झाली आणि हा प्रदेश भारतीय संघराज्यात समाविष्ट झाला. भारताचे तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी आपल्या संदेशपत्रात म्हटले, ‘विदेशी सत्ता दूर झाल्यामुळे आमच्या भूमीवरील वसाहतवादाचे हे शेवटचे चिन्ह नष्ट झाले. १४ वर्षांच्या दीर्घ मुदतीत ज्यावेळी समस्त भारतीय स्वातंत्र्याची शुभफळे चाखत होते, त्यावेळी आमचे गोमंतकीय बांधव एका विदेशी सत्तेच्या शासन व्यवस्थेखाली होणारे जुलूम, अपमान सहन करीत होते. या गोष्टीचे आम्हाला दुःख होत होते?’
१९ डिसेंबर हा दिवस गेल्या अर्धशतकापासून गोवा राज्याचा मुक्तीदिन गोवाभर भारतीय सार्वभौमत्व आणि अस्मितेचा मानदंड म्हणून तिरंगा ध्वज फडकावून उत्साहाने साजरा केला जातो. १५१० साली पोर्तुगीजांनी जेव्हा तिसवाडीचा महाल जिंकून घेतला आणि त्यानंतर बार्देश आणि सासष्टीवर आपली सत्ता प्रस्थापित केली, त्यावेळी इथल्या जुन्या काबिजादीत गुलामगिरीबरोबर पराकोटीच्या धर्मांधतेने गोमंतकीयांना संत्रस्त केले. जुन्या काबिजादीत साडेतीनशे तर नव्या काबिजादीत दीड-दोनशे वर्षांपर्यंत स्थानिकांना पोर्तुगीजांनी आरंभलेल्या अन्याय, अत्याचाराला सामोरे जावे लागले. सत्तरीतील कष्टकरी जनतेने राणे सरदेसाईंच्या नेतृत्वाखाली २५ पेक्षा जास्तवेळा बंडांची निशाणे उभारून, पोर्तुगीज साम्राज्याला आव्हान दिले. कुंकळ्ळीतील जनतेने स्वधर्म, भारतीय संस्कृतीच्या रक्षणासाठी परमोच्च त्याग केला.
‘भारत’कार गोविंद पुंडलीक हेगडे देसाई यांनी आपल्या लेखणीने पोर्तुगीज सरकारची नाराजी पत्करून स्वतःवर ५० खटले ओढवून घेतले आणि चारवेळा तुरुंगवासाची शिक्षा सोसली. त्यांच्या ‘भारत’च्या पोर्तुगीज विभागात त्यावेळी राष्ट्रीय बाण्याचे मिनेझिस ब्रागांझा, डॉ. त्रिस्ताव ब्रागांझ कुन्हा, तेलु मास्कारेन्हस यांच्यासारखे झुंजार गोमंतकीय लिखाण करत होते. तेलु मास्कारेन्हस यांच्या ‘देवतांचा मृत्यु’ या पोर्तुगीज व मराठी विभागात प्रसिद्ध झालेल्या लेखाखातर पोर्तुगीज सरकारने खटला दाखल केला. पणजी येथील न्यायालयाने ‘भारत’कारांना सजा फर्मावली होती, पण त्यामुळे न डगमगता त्यांनी आपला लढा कायम ठेवला.
पोर्तुगीजांच्या जोखडातून गोव्याला विमुक्त करण्यासाठी स्वाभिमानी गोमंतकीयांनी धर्म, भाषा, जात यांची बंधने झुगारून लढा उभारला. राष्ट्रीय गोवा काँग्रेसच्या नेतृत्वाखाली डॉ. त्रिस्ताव ब्रागांझ कुन्हा, पीटर अल्वारिस सारखी मंडळी गोमंतभूमीवरील असीम प्रेमापायी एकत्र आली. महात्मा गांधींच्या सत्याग्रह चळवळीचा अंगिकार करून असंख्य निर्भिड पोर्तुगीजांच्या झोटींगशाहीविरुद्ध उभे ठाकले. डॉ. पुंडलिक गायतोंडे, गोपाळ आपा कामत, अॅड. पांडुरंग मुळगावकर यांच्यासारखे उच्चविद्याविभूषित चळवळीत सहभागी झाले. अस्नोड्यातील मयते येथील बाळा राया मापारी गोवा मुक्ती संग्रामासाठी पहिला हुतात्मा झाला. त्यानंतर बाळकृष्ण भोसले, कामिल परेरा, सोमा मळिक, बापू गवससारख्या तरुणांनी तारुण्यात गोव्यासाठी मृत्यूचा आनंदाने स्वीकार केला. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. परंतु गोव्यातील जनता पारतंत्र्याच्या अंधारात त्रस्त आहे, यासाठी भारतभरातून स्वाभिमानी तरुणाई पुढे सरसावली. बाबूराव केशव थोरात, नित्यानंद सहा, पन्नालाल यादव यासारख्या भारतभरातून आलेल्या स्वातंत्र्यवीरांनी गोवा मुक्तीसाठी हौताम्य पत्करले.
डॉ. राम मनोहर लोहियांनी १८ जून १९४६ रोजी क्रांतीची मशाल पेटवली आणि निद्रिस्त गोमंतकीयांना अंतिम लढ्यासाठी प्रेरित केले. बॅरिस्टर तेलु मास्कारेन्हश यांना लिस्बनच्या सैनिकी न्यायालयाने शिक्षा ठोठावून १९७० पर्यंत तुरुंगात डांबले. तुरुंगात जाण्यापूर्वी स्वतःचा बचाव करण्यासाठी न्यायालयात त्यांनी ठणकावून सांगितले, गोवा निःसंशय भौगोलिक, ऐतिहासिक, वांशिक व सांस्कृतिक दृष्टीने भारताचा भाग आहे. सालाझारने एकाहून अधिक वेळा आपल्या भाषणातून हे मान्य केले आहे. याचमुळे आम्ही गोमंतकीय भारतभूमीला पूज्य मानतो. तेलु मास्कारेन्हशसारख्या स्वातंत्र्यसेनानींनी गोव्याला भारतभूमीचा अविभाज्य घटक मानलेला आहे. परंतु विमुक्त गोव्यात आजही गोवा स्वतंत्र राष्ट्र व्हावे, गोवा पोर्तुगीज साम्राज्याचा भाग आहे, अशा मानसिकतेची व्यक्तिमत्त्वे आहेत. अपघाताने गोवा पोर्तुगालच्या वसाहतीचा भाग बनला. परंतु आजही भाषिक, धार्मिक आणि सामाजिकदृष्ट्या इथल्या लोकमानसाची नाळ भारतीय माती आणि संस्कृतीशी अतुट आहे. गोवा मुक्तीच्या पर्वदिनामुळे भारताशी असलेले नाते पुन्हा एकदा जुळले. शतकानंतर आलेल्या या पर्वदिनी गोवा भारताचा अविभाज्य घटक बनला. आज मुक्तीदिन अभिमानाने साजरा करताना राष्ट्रीय बाणा आणि भारतीय संस्कृतीशी अनुबंध घट्ट करण्याची नितांत आवश्यकता आहे. गोवा मुक्तीदिनाची स्मृती आमच्यासाठी नित्य मंगलमय आणि स्पूर्तिदायी व्हावी, यासाठी मुक्ती संग्रामात झुंजारपणे मरणाची अजिबात तमा न बाळगता सहभागी झालेल्या असंख्य स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाची स्मृती चिरंतन ठेवण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत.
आज मुक्तीदिनाच्या पूर्वसंध्येला गोवा सरकारने मुक्ती लढ्यात जे चौदा हुतात्म झाले, त्यांच्या वारसदारांचा गौरव करण्याचा निर्णय घेतला आहे. १९६१ नंतर आजतागायत गोवा, दमण आणि दीव केंद्रशासित प्रदेश ते १९८७ नंतर गोवा राज्याची निर्मिती झाल्यापासून १९ डिसेंबर २०२१ पर्यंत आपण जे प्रगतीचे टप्पे गाठले त्यांचे अवलोकन करण्याची गरज आहे. रस्त्यांचे जाळे, विजेची, पेयजलाची, दूरसंचार सुविधांची सोय गावोगावी पोहचली म्हणजे आपण विकास साध्य केला का? याविषयी चिंतन, मनन होणे गरजेचे आहे. जंगल, जलस्रोत आणि जैविक संपदा यांचा ऱ्हास करून जीवन सुखमयी होणार का? उष्णकटिबंध प्रदेशातील स्वर्ग आता लौकिक मिरवणारा आपला प्रदेश मद्यपान, अंमली पदार्थ सेवन, गुन्हेगारी यांच्या ताणाखाली संकटग्रस्त झालेला आहे. शेती, बागायती, पशुपालन, पारंपरिक उद्योग धंदे, पर्यावरणीय पर्यटन आपणाला अपेक्षित शाश्वत विकास साध्य करण्यास सहाय्य करेल का? याच्यावर गोवा राज्याचे वर्तमान आणि भविष्य सुरक्षित राहील.
प्रा. राजेंद्र केरकर
(लेखक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते
असून पर्यावरणप्रेमी आहेत.) मो. ९४२१२४८५४५