तबल्याशी बोलणारा जादूगार

सुमारे सात दशकांचा काळ तबल्याचा जादूगार म्हणून जगभर मोहिनी घालणाऱ्या झाकीर हुसेन यांच्या निधनाने संगीत क्षेत्राचेच नव्हे तर जगाचेही नुकसान झाले आहे.

Story: संपादकीय |
18th December, 12:40 am
तबल्याशी बोलणारा जादूगार

ज्यांच्या श्वासातच तबल्याचा ताल होता, असे महान तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांच्या निधनाने संगीत विश्वाला मोठा धक्का बसला आहे. ७३ वर्षांचे आयुष्य जगले असले तरी तबल्याच्या ठेक्यावर तरुणाईचा आविष्कार दाखवणारा हा अव्वल कलाकार आपल्या आठवणींमधून सदैव जिवंत राहील. आपल्या कलेबद्दल अपार निष्ठा राखणारे झाकीर हुसेन यांनी देशभरात आणि विदेशात आपली कला सादर केली. गोव्यातील एका कार्यक्रमात एक राजकीय व्यक्ती विलंबाने आल्यावर त्यांनी त्यांनाही स्पष्ट शब्दांत सुनावले होते. संगीत या गोष्टीकडे तडजोड नाही असेच त्यांच्या वागणुकीतून दिसायचे. तबल्यावर श्रद्धा आणि संगीताचे उपासक असेच त्यांचे जगणे होते. त्यांची प्रामाणिक वृत्ती आणि कलेवरील निष्ठा ही त्यांची खरी ओळख होती.  

झाकीर हुसेन हे तबल्याचे जादूगार होते. त्यांची ऊर्जा, नेहमी नव्या प्रयोगांसाठी सज्ज आणि प्रत्येक सादरीकरणातली तल्लीनता अविस्मरणीय आहे. चार वेळा ग्रॅमी पुरस्कारावर नाव कोरलेल्या या महान कलाकाराने तबल्याच्या माध्यमातून भारताचे नाव जागतिक पातळीवर नेले. तबला म्हणजे झाकीर हुसेन आणि झाकीर हुसेन म्हणजे तबला, असे एक समीकरणच तयार झाले होते. लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच आपलेसे करणाऱ्या या कलाकाराने चहा कंपनीच्या जाहिरातींमध्येही लोकांच्या मनात वेगळी छाप पाडली होती. झाकीर हुसेन हीच त्या चहा कंपनीची ओळख ठरली. त्या जाहिरातीत झाकीर हुसेन यांच्या केसाबाबतची लोकप्रियता पाहून त्यांनी केस कापू नयेत, अशी अटच त्या कंपनीने घातल्याचे अनेकदा झाकीर हुसेन यांनी सांगितले होते.

मुंबईत जन्मलेल्या झाकीर हुसेन यांनी वयाच्या तिसऱ्या वर्षीच तबल्याचा सराव सुरू केला आणि वयाच्या बाराव्या वर्षी कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ लागले. वडील उस्ताद अल्लारखा कुरेशी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना तबल्याचे बाळकडू मिळाले आणि त्यांची प्रतिभा अधिकच समृद्ध झाली. वडिलांनंतर अकबर अली खान यांच्याकडेही शिक्षण घेतले. बाराव्या वर्षी त्यांनी बडे गुलाम अली, आमीर खान, ओंकारनाथ ठाकूर यांसारख्या दिग्गजांना साथ देत त्यांनी आपली कला सिद्ध केली. पं. रविशंकर, भीमसेन जोशी, किशोरी आमोणकर, वसंतराव देशपांडे यांसारख्या दिग्गजांसोबतही त्यांनी साथ संगत केली. देशातील अनेक दिग्गजांच्या मैफिली झाकीर हुसेन यांच्या साथसंगतीने संस्मरणीय झाल्या आहेत.

"संगीत हे चांगले आरोग्य देते. माझे यशस्वी कार्यक्रम माझ्यामुळे नसून ते संगीतासाठी आहेत. मी संगीताचा केवळ एक पुजारी आहे," असे सांगत संगीताचे महत्त्व अधोरेखित करणारे झाकीर हुसेन हे भारतीय संगीताच्या क्षेत्रातले एक स्वप्न होते. भारतीय संगीत जागतिक स्तरावर नेणाऱ्यांपैकी झाकीर हुसेन हे अग्रस्थानी आहेत. 

भारतीय शास्त्रीय संगीतापासून पाश्चात्य संगीत आणि फ्युजनपर्यंत विविध प्रकारांमध्ये त्यांनी आपली मुद्रा उमटवली. जॉर्ज हॅरीसन, वॅन हॅरीसन, जॉन हँडी, मिकी हार्ट, जिओनी हिडाल्गो अशा अनेक पाश्चात्य संगीतकारांबरोबर त्यांनी केलेले प्रयोग जागतिक संगीताला नवी दिशा देणारे ठरले. त्यांच्या या प्रवासात कर्नाटकी संगीतातले प्रसिद्ध वादक विकू विनायक राम यांची साथ मिळाली. त्यांचा सहभाग असलेल्या उल्लेखनीय अल्बम्समध्ये लिव्हिंग इन द मटेरीयल वर्ल्ड, हार्ड वर्क, प्लॅनेट ड्रम आणि दी ग्लोबल ड्रम प्रॉजेक्ट यांचा समावेश होतो. त्यातील काही अल्बमच्या निर्मितीसाठी त्यांना ग्रॅमी पुरस्कार मिळाले. 

भारतीय शास्त्रीय संगीताला जागतिक स्तरावर पोहोचवणारे झाकीर हुसेन यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण सारखे भारतातील सर्वोच्च पुरस्कारही मिळाले. त्याशिवाय ग्रॅमी, अमेरिकेतील नॅशनल हेरिटेज फेलोशिप, संगीत नाटक अकादमी, इंडो-अमेरिकन पुरस्कार, कालिदास सन्मान अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले. तबल्याशी असलेले त्यांचे मैत्रीपूर्ण नाते, तबल्याशी संवाद साधण्याची आणि तबल्याला काय हवे नको ते जाणून घेण्याची कला देवाने याच महान कलाकाराला दिली होती. मी तबल्याशी बोलतो, कार्यक्रमाआधी त्याला काय वाटते ते जाणून घेतो असे सांगणाऱ्या या महान कलाकाराने तबल्याला मोठा सन्मान दिला. कधीच मन विचलित होऊ दिले नाही. लहान, थोरांना तितक्याच ताकदीने साथ संगत करण्याची आणि सर्वांना समान सूत्रात बांधण्याची दैवी देणगी त्यांना होती. सुमारे सात दशकांचा काळ तबल्याचा जादूगार म्हणून जगभर मोहिनी घालणाऱ्या झाकीर हुसेन यांच्या निधनाने संगीत क्षेत्राचेच नव्हे तर जगाचेही नुकसान झाले आहे.