स्मार्ट सिटीच्या कामात मागच्या चुकांनी पुनरावृत्ती

गोवा

Story: अंतरंग |
19th December, 04:19 am
स्मार्ट सिटीच्या कामात मागच्या चुकांनी पुनरावृत्ती

असे म्हणतात की आपल्या आधीच्या अनुभवावरून आपण शिकले पाहिजे. भूतकाळात ज्या चुका झाल्या त्या परत होऊ नयेत यासाठी इतिहास माहिती असणे आवश्यक असते. हे केवळ व्यक्तीला लागू नसून सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था, महामंडळे यांना देखील लागू पडते. मात्र पणजीला स्मार्ट बनवण्यासाठी (निदान तसा आव आणणाऱ्या) स्मार्ट सिटी लिमिटेडला आपल्या भूतकाळाची पर्वा नसावी. यामुळेच स्मार्ट सिटी अंतर्गत पणजीतील शिल्लक कामे सुरू करताना मागच्या चुका परत केल्या जात आहेत. आणि नेहमीप्रमाणे नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. 

सध्या शहरात विशाल मेगामार्ट, जुने शिक्षण संचालनालय, बाजार परिसर, १८ जून रस्त्यावरील काकुलो आयलंड, महिला आणि बालकल्याण खात्यासमोरील पदपथ, हॉटेल पब्लिक कॅफे ते बाजाराकडे जाणार रस्ता, डॉन बॉस्कोकडून पेट्रोल पंपकडे जाणारा रस्ता, वुडलँड शोरूम जवळील रस्ता येथे विविध कामे सुरू आहेत. स्मार्ट सिटीने कामे सुरू करताना कुणालाही विश्वासात घेतले नाही. महापालिकेला देखील ऐनवेळी कळवण्यात आले. ही कामे सुरू करताना नागरिकांना अमुक रस्ते बंद किंवा अंशत: बंद असतील याची पुसटशी कल्पनाही देण्यात आली नव्हती. 

स्मार्ट सिटीने नेहमीप्रमाणे आली लहर केला कहर या पद्धतीने कामे करणे सुरू केले. कामासाठी जेसीबी व अन्य मोठी वाहने वापरण्यात येत असल्याने वाहतूक कोंडी होत आहे, तर काही ठिकाणी नव्या सांडपाणी वाहिन्यांना जोडणी देण्याचे काम सुरू आहे. या कामांसाठी रस्ते खोदण्यात आल्यामुळे देखील वाहतुकीस अडथळा झाला आहे. या भागात व्यवसायिकांना धुळीच्या प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागत आहे. 

कामांमुळे रस्ते अधिक अरुंद झाले झाले आहेत. येथे वाहतूक नियंत्रण करण्यासाठी पोलीस नसल्याने वाहतूक कोंडी देखील होत आहे. स्मार्ट सिटीच्या कामामुळे गेली तीन वर्षे स्थानिकांसह पणजीत कामासाठी येणाऱ्या अन्य नागरिकांना त्रास सहन करावा लागला आहे. यापूर्वी स्मार्ट सिटीच्या कामांमुळे झालेले धुळीचे प्रदूषण किंवा वाहतूक कोंडी हे सध्या तुलनेने कमी असली तरी या समस्या नाहीच असे कोणीही छाती ठोकपणे सांगू शकत नाही. स्मार्ट सिटीच्या कामांची मुदत ३१ मार्च २०२५ ला संपणार आहे. कंत्राटदारांना यापूर्वी राजधानी पणजीतील कामे करावी लागणार आहेत. मागचा अनुभव लक्षात घेऊन निदान यावेळी तरी स्मार्ट सिटी सुधारेल अशी अपेक्षा होती. मात्र सध्या तरी अशी सुधारणा कुठेच दिसत नाही. गेली अनेक वर्ष स्मार्ट सिटीचा त्रास सहन करणाऱ्या पणजीकरांना निदान शेवटच्या टप्प्यातील कामे करताना त्रास होऊ नये अशी माफक अपेक्षा आहे.

पिनाक कल्लोळी