पणजी : विद्यार्थ्यांनी विज्ञानाच्या साहाय्याने जगभरातील सामान्य जनतेला भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी केले. सहाव्या मनोहर पर्रीकर विज्ञान महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी अणु ऊर्जा आयोगाचे माजी संचालक डॉ अनिल काकोडकर, प्रा. हाबिल वोजनियाक , एनआयओचे संचालक सुनील कुमार आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. मोहित कुमार जॉली यांना मनोहर पर्रीकर युवा पुरस्काराने गौरविण्यात आले.
गोव्यात विद्यार्थ्याला चांगली टक्केवारी मिळाली की तो विज्ञान शाखेत प्रवेश घेतो. विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेत करिअर नक्कीच करावे. मात्र केवळ विज्ञानाचा प्राध्यापक किंवा शिक्षक म्हणून नोकरी करण्याचे ध्येय बाळगू नये. विज्ञानाकडे केवळ एक विषय म्हणून न पाहता बदलाचे , समस्या सोडविण्याचे साधन म्हणून पहावे. सध्याचे जग हे ज्ञान आधारित अर्थव्यवस्थेकडे जात आहे. विद्यार्थ्यांनी याचा फायदा करून घ्यावा, असे मुख्यमंत्री म्हणाले
विद्यार्थ्यांनी विज्ञान क्षेत्रात स्वतःची कल्पकता वापरून पर्यावरण, आरोग्य किंवा अन्य कोणत्याही क्षेत्रात शाश्वत उपाययोजना शोधून काढाव्यात. गोव्याला जास्तीत जास्त पेटंट मिळावेत यासाठी प्रयत्न करावेत. यातून केवळ गोव्यालाच नव्हे तर देशाला आणि जगाला देखील फायदा व्हावा. स्व. मनोहर पर्रीकर हे त्यांच्या वैज्ञानिक दृष्टीकोनासाठी देखील ओळखले जात होते. आपण देखील त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे आवश्यक आहे, ते म्हणाले.
सरकारने नुकतेच भारतीय विज्ञान संस्था, सीएसआयआर , केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार तसेच अन्य केंद्रीय संस्थांसोबत सामंजस्य करार केले आहेत. याद्वारे गोव्याला वैज्ञानिक नवकल्पनांचे हब बनवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, मुख्यमंत्री म्हणाले.