गोव्यातील महिलांच्या मालकीच्या ‘एमएसएमई’त १७ टक्क्यांनी वाढ

पश्चिम बंगालमध्ये २४ लाखहून अधिक एमएसएमई महिलांच्या मालकीच्या

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
13th December, 12:19 am
गोव्यातील महिलांच्या मालकीच्या ‘एमएसएमई’त १७ टक्क्यांनी वाढ

पणजी : गोव्यात मागील २० महिन्यांत महिलांच्या मालकीच्या सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांत (एमएसएमई) १७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मार्च २०२३ मध्ये महिलांच्या मालकीच्या एमएसएमईचे प्रमाण २२.०९ टक्के होते. डिसेंबर २०२४ मध्ये यात १७ टक्क्यांनी वाढ होऊन ते ३९ टक्के झाले आहेत. लोकसभेत उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांच्या उत्तरांतून ही माहिती मिळाली आहे.
राज्यात मार्च २०२३ पर्यंत २९ हजार ७६९ एमएसएमईंपैकी ६५७८ महिलांच्या मालकीच्या होत्या. डिसेंबर २०२३ पर्यंत एकूण ४८७१५ एमएसएमईची नोंदणी झाली. यातील १३९८१ एमएसएमईची महिलांच्या मालकीच्या होत्या. मागील एका वर्षात एमएसएमईची संख्या वाढली आहे. डिसेंबर २०२४ मध्ये राज्यात ९८ हजार ८७४ एमएसएमई आहेत. यातील १५ हजार ३८ महिलांच्या मालकीच्या आहेत.
महिलांच्या मालकीच्या एमएसएमई असण्याची राष्ट्रीय सरासरी ४० टक्के इतकी आहे. संपूर्ण देशाचा विचार करता पश्चिम बंगालमध्ये २४ लाखहून अधिक एमएसएमई महिलांच्या मालकीच्या आहेत. त्याखाली महाराष्ट्र (२५ लाख), उत्तर प्रदेश (१९.६८ लाख), तामिळनाडू (१९.२६ लाख) या राज्यांचा क्रमांक लागतो. सिक्कीममध्ये सर्वांत कमी म्हणजे १० हजार एमएसएमईचे नेतृत्व महिला करतात. केंद्रशासित प्रदेश लक्षद्वीपमध्ये महिलांच्या मालकीच्या केवळ ४४६ एमएसएमई आहेत.

३.८० लाख जणांना रोजगार
गोव्यात १ जुलै २०२० ते ३० नोव्हेंबर २०२४ दरम्यान एमएसएमईमुळे ३ लाख ८० हजार ४४३ जणांना रोजगार उपलब्ध झाला आहे, तर संपूर्ण देशात या क्षेत्रामध्ये २३.९७ कोटी व्यक्तींना रोजगार मिळाल्याचे उत्तरात म्हटले आहे.

हेही वाचा