तिसऱ्या कसोटीत आघाडी घेण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्नशील

बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिका : उद्यापासून गाबा येथे सामना

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
13th December, 12:04 am
तिसऱ्या कसोटीत आघाडी घेण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्नशील

ब्रिस्बेन : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील ५ सामन्यांच्या बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतील तिसरा सामना गाबा मैदानावर खेळवला जाणार आहे. हा सामना जिंकून दोन्ही संघांच्या नजरा मालिकेत आघाडी मिळवण्यावर असतील. भारताने पर्थमध्ये खेळला गेलेला पहिला सामना २९५ धावांनी जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली, मात्र, ॲडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या डे-नाईट कसोटीत ऑस्ट्रेलियाने दमदार पुनरागमन करत भारताचा १० गडी राखून पराभव करत मालिकेत १-१ अशी बरोबरी मिळवली. मात्र तिसऱ्या कसोटी सामन्यात पाऊस व्यत्यय घालणार असल्याची चिन्हे आहेत.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरी कसोटी १४ डिसेंबरपासून खेळवली जाणार आहे आणि सामन्याच्या पाचही दिवस पावसाची शक्यता आहे. हवामानाच्या अंदाजानुसार, सामन्याच्या पहिल्या दिवशी जास्तीत जास्त ८८ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर दुसऱ्या आणि चौथ्या दिवशीही पावसाची ४० टक्क्यांहून अधिक शक्यता आहे. उर्वरित तिसऱ्या आणि पाचव्या दिवसांचा अंदाज चांगला आहे, ज्यामध्ये सुमारे २० टक्के पाऊस पडू शकतो, ज्याचा खेळावर फारसा परिणाम होणार नाही.
गाबा म्हटले की सर्वांनाच या मैदानावरील भारताचा ऐतिहासिक कसोटी विजय आणि ऋषभ पंतची ती निर्णयाक खेळी आठवते. आता पुन्हा एकदा तिसऱ्या कसोटी सामन्याचा थरार या मैदानावर पाहायला मिळणार आहे. पण या मैदानावरील सामना पाहण्यासाठी चाहत्यांना पहाटे लवकर उठावे लागणार आहे.
टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पोहोचली तेव्हा या दोन्ही संघांमधील पहिला कसोटी सामना भारतीय वेळेनुसार सकाळी ७.५० वाजता सुरू झाला. पहिल्या दिवशी नाणेफेक अर्धा तास आधी झाली. उर्वरित दिवस, सामना ७:५० वाजता सुरू झाला. तीन दिवस झालेल्या या पहिल्या पर्थ कसोटीत भारताने ऐतिहासिक विजय नोंदवला. तर दुसरा सामना म्हणजेच गुलाबी चेंडूचा सामना सकाळी ९.३० वाजता सुरू झाला. दुसऱ्या कसोटीचा निकालाही ३ दिवसात लागला आणि यात भारताला पराभव पत्करावा लागला.
ॲडलेडमधील पराभवानंतर रविचंद्रन अश्विन आणि हर्षित राणा यांना गाबा कसोटीसाठी संघातून बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. याशिवाय केएल राहुलच्या फलंदाजी क्रमाबाबतही साशंकता आहे. राहुलच्या जागी कर्णधार रोहित शर्मा डावाची सुरुवात करू शकतो, तर केएल राहुल मधल्या फळीत खेळू शकतो.
कर्णधार रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल हे गाबा येथे खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या कसोटीत डावाची सुरुवात करू शकतात. यानंतर शुभमन गिल तिसऱ्या क्रमांकावर खेळणार हे निश्चित आहे. गिलनंतर विराट कोहली चौथ्या क्रमांकावर खेळताना दिसेल. २०२१ मधील गाबा कसोटीतील विजयाचा हिरो रिषभ पंत पाचव्या क्रमांकावर खेळताना दिसणार आहे.
पंतनंतर केएल राहुल सहाव्या क्रमांकावर खेळू शकतो. यापूर्वी राहुलने दोन कसोटी सामन्यांमध्ये डावाची सुरुवात केली होती. मात्र, पहिल्या कसोटीत रोहित शर्मा संघासोबत नव्हता. दुसऱ्या कसोटीत रोहित सहाव्या क्रमांकावर खेळला. अश्विनच्या जागी या सामन्यात वॉशिंग्टन सुंदर किंवा रवींद्र जडेजाला संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर नितीशकुमार रेड्डी खेळताना दिसेल. हर्षित राणाच्या जागी आकाशदीप खेळू शकतो. तर मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांची जोडी कायम असेल.
टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, रिषभ पंत (यष्टीरक्षक), केएल राहुल, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर/रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार) , मोहम्मद सिराज आणि आकाशदीप
टीम इंडिया डब्ल्यूटीसी फायनल समीकरण
टीम इंडिया सध्या ५७.२९ टक्के गुणांसह डब्ल्यूटीसी गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. भारताच्या पुढे दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया आहेत ज्यांचे गुण अनुक्रमे ६३.३३ आणि ६०.७१ टक्के आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरी कसोटी अनिर्णित राहिली तरीही भारत डब्ल्यूटीसी फायनलमध्ये पोहोचू शकतो. गाबा कसोटी अनिर्णित राहिल्यानंतर भारताने पुढील दोन सामने जिंकून मालिका ३-१ ने जिंकली, तर त्यांना अंतिम फेरीचे थेट तिकीट मिळेल.
पहाटे ५.५० वाजता होणार सामना सुरू
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना पाहण्यासाठी भारतीय चाहत्यांना पहाटे उठावं लागणार आहे. गाबा येथे होणारा तिसरा सामना पहाटे ५.५० वाजता सुरू होईल. पहिल्या दिवशी नाणेफेक अर्धा तास आधी म्हणजे सकाळी ५.२० वाजता होईल. बाकीचे दिवस सामना थेट ५.५० वाजता सुरू होईल. तर दुपारी २ वाजण्याच्या सुमारास दिवसाचा खेळ संपण्याची शक्यता आहे. या कसोटी सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग टीव्हीवर स्टार स्पोर्ट्सच्या चॅनेलवर पाहता येणार आहे. तर मोबाईलवर डिस्ने प्लस हॉटस्टारवर पाहता येईल.भारत वि ऑस्ट्रेलिया कसोटीतील चौथा आणि पाचवा सामना पहाटे सकाळी ५ वाजता सुरू होईल. म्हणजेच या सामन्यांमध्ये नाणेफेक सकाळी ४.३० वाजता होणार आहे. म्हणजे इतर दिवशीही पहाटे ५ वाजताच दिवसाचा खेळ सुरू होईल. भारताचा चौथा कसोटी सामना मेलबर्न तर पाचवा सामना सिडनीमध्ये खेळवला जाणार आहे.

ब्रिस्बेनच्या मैदानात कोहली पहिल्या शतकाच्या प्रतिक्षेत
विराट कोहली ऑस्ट्रेलियातील अ‍ॅडिलेड, पर्थ, सिडनी मेलबर्न, कॅनबेरा आणि होबार्ट या सर्व मैदानात सेंच्युरी झळकावली आहे. पण आतापर्यंत त्याच्या भात्यातून गाबाच्या मैदानात सेंच्युरी आलेली नाही. तो या मैदानातील शतकी दुष्काळ यावेळी तरी संपवणार का? ते पाहण्याजोगे असेल. विराट कोहलीने आतापर्यंत ब्रिस्बेनच्या मैदानात एकमेव कसोटी सामना खेळला आहे. २०१४ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तो हा सामना खेळला होता. या सामन्यात विराट कोहलीने पहिल्या डावात १९ धावा तर दुसऱ्या डावात फक्त १ धाव केली होती. पहिल्या डावात जोश हेजलवूड आणि दुसऱ्या डावात मिचेल जॉनसन याने किंग कोहलीची विकेट घेतली होती.