उत्तर प्रदेशच्या मंत्र्यांनी भेट घेऊन दिली आमंत्रण पत्रिका
पणजी : प्रयागराज येथील त्रिवेणी संगमावर होणाऱ्या धार्मिक महाकुंभाला उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना उत्तर प्रदेश सरकारने खास निमंत्रण दिले आहे. उत्तर प्रदेशचे मंत्री दारासिंग चौहान व राज्यमंत्री रामकेश निषद यांनी सावंत यांना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यातर्फे आमंत्रण पत्रिका दिली.
प्रयागराज येथे बारा वर्षांनंतर महाकुंभमेळा होतो. 'गोमंतकीय जनतेतर्फे मी अभिमानाने या आमंत्रणाचा स्वीकार केला', असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे. सनातन भारतीय संस्कृतीचा भाग असलेला महाकुंभमेळा हा धार्मिक व आध्यात्मिक उत्सव आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नामुळे महाकुंभमेळाला युनेस्कोकडून 'मानवता जपणारा सांस्कृतिक वारसा उत्सव' म्हणून मान्यता मिळालेली आहे. यंदा १३ जानेवारी २०२५ ते २६ फेब्रुवारी २०२५ दरम्यान महाकुंभमेळा होणार आहे.