सक्षम हातातच भाजपचे नेतृत्व हवे!

प्रदेशाध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेत त्यांना पक्षाकडे नेतृत्वगुण असलेल्या युवा नेत्यांची कमतरता जाणवत आहे, हे निश्चित. नव्या रक्ताला मुख्य फळीत वाव देण्यास किंवा त्यांच्याकडे जबाबदारी देऊन त्यांना पुढे आणण्यात भाजप अपयशी ठरला आहे.

Story: अग्रलेख |
12th December, 12:48 am
सक्षम हातातच भाजपचे नेतृत्व हवे!

भाजपच्या प्रदेश समित्या निवडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. बूथ, जिल्हा समिती निवडीनंतर प्रदेशाध्यक्ष निवड आणि प्रदेश समिती स्थापन होईल. जानेवारी महिन्यात ही सर्व प्रक्रिया पूर्ण होऊ शकते. त्यामुळे जानेवारीपर्यंत भाजपला नवा प्रदेशाध्यक्ष मिळेल. भाजपने आपल्या अंतर्गत निवडणुकीच्या कामासाठी प्रभारीही नियुक्त केला आहे. भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी प्रथमच सात ते आठ नेते इच्छुक आहेत. त्यामुळे भाजपसमोर पेच निर्माण झाला आहे. यातील बरेचसे नेते पक्षाच्या कोअर समितीच्या बाहेरील आहेत. काहींनी तर पक्षाच्या कार्यालयात येणेही सोडले आहे. पण प्रदेशाध्यक्ष होण्यासाठी त्यांचे दावे आलेले आहेत. 

भाजपमध्ये अनेक नवे आमदार आहेत, शिवाय काँग्रेसमधून आलेले काही आमदारही आहेत. यापैकी कोणाकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी जाण्याची शक्यता कमी आहे. काँग्रेसमधून आलेल्यांनी तर प्रदेशाध्यक्ष होण्याचे स्वप्नही पाहू नये, अशी भाजपची धोरणे आहेत. त्यामुळे आमदार, खासदार नसलेल्या नेत्यांनी प्रदेशाध्यक्षपदावर दावा केला आहे. पक्षाच्या कामात सक्रिय असलेले अॅड. नरेंद्र सावईकर, दामू नाईक या दोन नेत्यांची नावे यात आघाडीवर आहेत. दयानंद सोपटे यांचा दावा असला तरी त्यांनी मध्यंतरी काँग्रेसवारी केलेली असल्यामुळे त्यांच्यावर ही जबाबदारी देण्याबाबत भाजपचे पक्षश्रेष्ठी तयार नसतील. दिलीप परुळेकर आणि दयानंद मांद्रेकर हे दोन नेते भाजपशी प्रामाणिक राहिले. मांद्रेकर हे गेल्या काही वर्षांत पक्षाच्या कामात फार सक्रिय नाहीत. परुळेकर हे या ना त्या कारणाने अधून मधून पक्षाचा झेंडा हातात धरत असतात. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत त्यांचा दावा थोड्या प्रमाणात मजबूत मानला जातो. मनोहर आडपईकर हे पक्षाचे जुने पदाधिकारी आहेत. माजी आमदार विश्वास सतरकर यांचा दावाही आहे. पक्ष शेवटी जनसंपर्क, पक्षाचे कार्य अशा गोष्टी पाहत असतो. शिवाय वेगवेगळ्या समाजांचा विचारही करत असतो. प्रदेशाध्यक्षपदाचा उमेदवार हा लोकप्रिय असेल आणि लोकांशी जुळवून घेणारा असेल तर जात, समाज याला फारसे महत्व दिले जात नाही. तिथे पक्षाचा विस्तार करण्याची क्षमता प्रदेशाध्यक्ष होणाऱ्या नेत्यामध्ये आहे का, त्याची कार्यकर्त्यांकडे वागणूक कशी आहे तसेच समाजात त्याचे स्थान कसे आहे, राजकीय कारकीर्द, पक्षातील कार्य अशा अनेक गोष्टींचा अभ्यास भाजप करत असतो. भाजपने पक्षाच्या सच्चा कार्यकर्त्यालाच आजपर्यंत प्रदेशाध्यक्षपद दिले आहे, हे मागील प्रदेशाध्यक्ष पाहून लक्षात येईल.

१९८० पासून पाहिल्यास काशिनाथ परब, विश्वनाथ आर्लेकर, श्रीपाद नाईक, डॉ. सुरेश आमोणकर, लक्ष्मीकांत पार्सेकर, राजेंद्र आर्लेकर, विनय तेंडुलकर, सदानंद शेट तानावडे यांनी आतापर्यंत पक्षाची धुरा संभाळली आहे. यातील काहीजणांनी दोनवेळा प्रदेशाध्यक्षपद संभाळले. त्यामुळे यावेळी नवा प्रदेशाध्यक्ष नियुक्त केला जाईल की तानावडे यांच्याकडेच प्रदेशाध्यक्षपद राहणार आहे, हे येत्या महिन्याभरात स्पष्ट होईल. प्रदेशाध्यक्षपदासाठी जरी इच्छुक अनेक असले तरी भाजपचे श्रेष्ठी बिनविरोध एका नेत्याची निवड करण्यासाठी प्रयत्न करतील. विद्यमान प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्या कार्यकाळात भाजपने वेगवेगळ्या निवडणुका जिंकल्या, त्यांनी संयम ठेवून पक्षाचे काम हाताळले. भाजपला नवा प्रदेशाध्यक्ष हा त्याचप्रमाणे पक्षाचे काम पुढे नेणारा हवा. पक्षातील ज्येष्ठ नेत्यांची एक फळी पक्षाच्या कामातून जवळजवळ वेगळी झाली आहे. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आज हयात नाहीत. लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी पक्ष सोडला. राजेंद्र आर्लेकर राज्यपाल म्हणून गेले आहेत. मिलिंद नाईक, दयानंद मांद्रेकर हे पक्षाच्या कार्यात सक्रिय असल्याचे दिसत नाही. सध्या प्रदेशाध्यक्षपदाच्या स्पर्धेत असलेले नरेंद्र सावईकर, दिलीप परुळेकर, दामू नाईक हे पक्षाच्या कामात सक्रिय आहेत. एकूणच स्थिती पाहिली तर प्रदेश भाजपकडे पक्षाचे नेतृत्व करण्याच्या कामासाठी आवश्यक असलेले नव्या फळीत दमदार नेतृत्व नाही. भाजप हे मान्य करणार नाही. गोव्यात सर्वात बलाढ्य पक्ष असला तरी त्यांच्याकडे कसदार युवा नेतृत्व नाही. जो तो मंत्रिपदासाठी आसुसलेला, पक्षाच्या कामासाठी जुंपून घेणे कोणालाच नको. त्यामुळे पक्षाचे काम पाहण्यात किंवा पक्ष चालवण्याच्या कामात युवा नेतृत्वाची कमतरता आहेच. प्रदेशाध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेत त्यांना पक्षाकडे नेतृत्वगुण असलेल्या युवा नेत्यांची कमतरता जाणवत आहे, हे निश्चित. नव्या रक्ताला मुख्य फळीत वाव देण्यास किंवा त्यांच्याकडे जबाबदारी देऊन त्यांना पुढे आणण्यात भाजप अपयशी ठरला आहे.