साळ नदीसाठी लोकचळवळ आवश्यक

दक्षिण गोवा

Story: अंतरंग |
12th December 2024, 12:47 am
साळ नदीसाठी लोकचळवळ आवश्यक

पर्यावरणप्रेमी वैयक्तिकरीत्या व संस्थांतर्फे हरित लवाद, प्रदूषण नियंत्रण मंडळ, बायोडायव्हर्सिटी बोर्ड अशा ठिकाणी पर्यावरण बचावासाठी वेळोवेळी दाद मागतात. मात्र आंदोलनांच्या माध्यमाद्वारे प्रशासनाला जागे केले जात नाही. साळसह राज्यातील सर्व नद्यांच्या अस्तित्वासाठी सरकारने तत्काळ उपाययोजना करण्याची गरज आहे.      

साळ नदी संवर्धनासाठी गांभीर्याने दखल घेतल्यास साळ पुनर्जीवित होणे शक्य आहे. साळ नदीला दक्षिण गोव्याची जीवनदायिनी म्हटले जाते. मात्र नदीसंदर्भातील विषय सोडविण्यासाठी लोकांना हरित लवादाकडे हात पसरावे लागतात, हे राज्यातील लोकांचे दुर्दैवच म्हणावे लागेल. 

यापूर्वी राज्य सरकारकडून साळ नदीतील गाळ उपसण्यात आल्याचे सांगण्यात आले, पण ही निव्वळ फसवणूक असल्याचा लोकांचा आरोप आहे. ओर्ली परिसरात नदीतील गाळ उपसण्याच्या नावाखाली खारफुटीचे वन नष्ट करण्यात आले. तीन मीटरपर्यंत गाळ उपसण्याच्या सूचना असतानाही खोलात जाऊन ड्रेजिंग केल्याचा लोकांचा आरोप आहे. पर्यावरणप्रेमींनी बायोडायव्हर्सिटी बोर्डकडे याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. 

साळ नदी शहरी भागातून वाहते, यामध्ये वेर्णा, मडगाव, नावेली, बाणावली इत्यादी महत्वाचे भाग येतात. या वस्ती असलेल्या भागांत साळ मोठ्या प्रमाणात प्रदूषित, तुंबलेली, बुजलेली दिसून येते. यामुळे मानवच पर्यावरणाचा शत्रू आहे, हे पुन्हा सिद्ध झालेले आहे. साळ नदीच्या किनार्‍यांवरील हॉटेलची घाण जोपर्यंत थेट नदीत जाणे बंद होत नाही, तोपर्यंत नदी साफ होणार नाही. दरवर्षी सरकार लाखो रुपये खर्च करून साळ नदी साफ करते. परंतु शहरातील नाल्यातून थेट नदीत जाणाऱ्या घाणीवर रोख लावण्यासाठी प्रयत्न दिसून येत नाही. शहरातील आस्थापने आणि इस्पितळातील घाण नाल्यातून थेट नदीत सोडतात. असे प्रकार लोकांकडून अनेकवेळा प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आलेले आहेत. तात्पुरती पाहणी झाल्यासारखे केल्यावर यावर पुढे काही होताना दिसून येत नाही. नदीच्या सुरक्षेसाठी न्यायालयाचे दारही ठोठावण्यात आले आहे. पालिका, पंचायतींनी मिळून याप्रश्नी कठोर भूमिका घेतल्यास साळ नदी वाचणे शक्य आहे. शहरांतून जाणाऱ्या कचऱ्यामुळे नदी तुंबत चालली असल्याचे नावेलीतील ग्रामस्थ सांगतात. बाणावली ओर्ली भागांत नदीचा विद्ध्वंस सुरू आहे, वेळोवेळी यावर आवाज उठविण्यात आला आहे, मात्र सरकारच्या इच्छाशक्ती अभावी काहीही झालेले नाही व लोकांची फसवणूक करण्यात येत आहे.

अजय लाड