स्मृती मानधनाचे विक्रमी शतक ठरले व्यर्थ
पर्थ : भारताची स्टार फलंदाज स्मृती मानधनाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पर्थ येथे खेळल्या गेलेल्या मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात ऐतिहासिक शतक झळकावले. मानधनाने १०९ चेंडूत १४ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने १०५ धावा केल्या. मात्र, मानधनाच्या या शतकानंतरही टीम इंडियाला मालिकेत ३-० असा पराभव स्वीकारावा लागला. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर भारतीय संघाचा पूर्णपणे सुपडा झाला. अष्टपैलू खेळाडू अॅनाबेल सदरलँडने सामन्यासह मालिकावीराचा देखील किताब पटकावला.
पर्थमध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेतील तिसऱ्या वनडेमध्ये टीम इंडियाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाने ५० षटकांत ६ गडी गमावताना २९८ धावा केल्या. यादरम्यान अॅनाबेल सदरलँडने ९५ चेंडूत ९ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने संघासाठी ११० धावा केल्या. याशिवाय कर्णधार ताहलिया मॅकग्राने ५० चेंडूत ५ चौकारांच्या मदतीने नाबाद ५६ धावा केल्या. याव्यतिरिक्त अॅशले गार्डनरने ६४ चेंडूत ५ चौकारांच्या मदतीने ५० धावा केल्या. या काळात अरुंधती रेड्डीने भारताकडून सर्वाधिक ४ बळी घेतले.
टीम इंडियाची निराशाजनक कामगिरी
विजयासाठी २९९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. संघाला १६ धावसंख्येवर पहिला धक्का बसला, जेव्हा रिचा घोष केवळ ०२ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. त्यानंतर स्मृती मानधना आणि हरलीन देओल यांनी दुसऱ्या विकेटसाठी ११८ (१३९ चेंडू) धावांची भागीदारी केली. या भागीदारीनंतर टीम इंडियाने विजयाकडे वाटचाल केल्याचे दिसत होते, परंतु तसे झाले नाही आणि २८व्या षटकात हरलीन देओलच्या रूपाने संघाला तिसरा धक्का बसला. हरलीनने ४ चौकारांच्या मदतीने ३९ (६४ चेंडू) धावा काढून माघारी परतली.
यानंतर टीम इंडियाने सातत्याने विकेट गमावण्यास सुरुवात केली आणि २०० धावसंख्येचा टप्पा ओलांडताना एकूण ७ विकेट पडल्या. टीम इंडियाला २०१ धावांवर ७वा आणि ८वा धक्का बसला. यानंतर संघाने २०३ धावांवर नववी विकेट गमावली. अखेर २१५ धावांवर संघाला १० वा आणि शेवटचा धक्का बसला.
ऑस्ट्रेलियाची अप्रतिम गोलंदाजी
यादरम्यान अॅशले गार्डनरने सर्वाधिक विकेट महत्त्वपूर्ण असे विजयी योगदान दिले. तिने १० षटकांत ३० धावा देत सर्वाधिक ५ बळी घेतले. याशिवाय मेगन शुट आणि अलाना किंगने प्रत्येकी २-२ विकेट घेतल्या. अॅनाबेल सदरलँडला उर्वरित १ विकेट मिळाली.
स्मृतीचे ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऐतिहासिक शतक
स्मृती मानधनाने इतिहास घडवला आहे. स्मृतीने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात विजयी धावांचा पाठलाग करताना शतकी खेळी केली. या शतकासह एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात अशी खास कामगिरी करणारी स्मृती पहिलीच महिला क्रिकेटपटू ठरली आहे. स्मृतीने १०३ चेंडूत ९७.०९ च्या स्ट्राईक रेटने हे शतक पूर्ण केले. या खेळीत तिने १३ चौकार आणि १ षटकार लगावला. स्मृतीच्या एकदिवसीय कारकीर्दीतील हे नववे शतक ठरले. तसेच २०२४ या वर्षातील हे स्मृतीचे चौथे शतक ठरले. स्मृतीने यासह एका वर्षात ४ शतके करणारी पहिलीच महिला क्रिकेटपटू हा बहुमान मिळवला.