मुख्यमंत्र्यांचा इशारा : अब्रुनुकसानीचे खटले दाखल करणार असल्याचे केले स्पष्ट
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : सरकारी नोकरी देण्याचे आमिष दाखवून जनतेला लुबाडल्याच्या प्रकरणांवरून आम आदमी पक्षासह (आप) इतर विरोधी पक्षांचे नेते आपल्या पत्नीवर बिनबुडाचे आरोप करत आहेत. त्यामुळे अशा सर्वांविरोधात आपण अब्रुनुकसानीचे खटले दाखल करणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
सरकारी नोकरी देण्याचे आमिष दाखवून गोमंतकीय जनतेला लुटणाऱ्यांचा पर्दाफाश आपणच केला. आपण केलेल्या आवाहनानुसार आर्थिक लुबाडणूक झालेल्या अनेकांनी पोलिसांत जाऊन तक्रारी दाखल केल्या. त्यानुसार अशा प्रकरणांतील संशयितांवर कारवाया करण्यात येत आहेत. सरकारी नोकरीत भ्रष्टाचार होऊ नये, यासाठी आपणच राज्यात कर्मचारी भरती आयोगाची स्थापना केली. या आयोगामार्फत सध्या सरकारी खात्यांतील अनेक रिक्त पदे पारदर्शकपणे भरण्यात येत आहेत. त्यामुळे विरोधकांकडे आपल्याविरोधात बोलण्यासाठी इतर कोणतेही विषय नसल्यामुळेच ते सरकारी नोकरी देण्याचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक केलेल्यांच्या प्रकरणांवरून आपल्याला तसेच आपल्या पत्नीला लक्ष्य करत आहेत. आपली पत्नी राजकारणात सक्रिय आहे; परंतु सरकारच्या कामात तिचा कोणताही सहभाग नाही. ‘आप’सह इतर विरोधी पक्षांचे काही नेते जाणीवपूर्वक तिचा संबंध अशा प्रकरणांशी लावत आहेत. त्यामुळे आपण निश्चित त्यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, सरकारी नोकरी देण्याचे आमिष दाखवून नागरिकांना कोट्यवधी रुपयांना लुटणाऱ्या राज्यातील अनेक टोळ्यांचा गेल्या काही दिवसांत पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. यात काही सरकारी कर्मचारीही सहभागी असल्याचे समोर आले. यातील अनेकांना अटक होऊन त्यांची जामिनावर सुटकाही झाली आहे; परंतु अशी प्रकरणे बाहेर येण्यास सुरुवात झाल्यानंतर विरोधी काँग्रेस, आप या पक्षांनी या विषयावरून थेट मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि त्यांच्या पत्नी सुलक्षणा सावंत यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली. त्यामुळे जनतेत संभ्रम निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर, आपल्या पत्नीवर बिनबुडाचे आरोप करणाऱ्यांना अजिबात सोडणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला.
आरोप करणाऱ्या एकालाही सोडणार नाही !
‘आप’च्या गोव्यातील नेत्यांनी दिल्लीतील काही नेत्यांना सोबत घेऊन आपल्यावर, तसेच आपल्या पत्नीवर नाहक आरोप केले आहेत. अबकारी घोटाळ्याच्या आरोपांनंतर अटक होऊन जे जामिनावर सुटलेले आहेत, त्यांनी आपल्याला नैतिकता शिकवू नये. कोणतेही पुरावे नसताना आपल्यावर, तसेच आपल्या पत्नीवर आरोप करणाऱ्यांना आपण कदापि सोडणार नाही, असेही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ठणकावले.
सैरभर झाल्यामुळेच विरोधकांकडून आरोपबाजी !
गेल्या अनेक वर्षांपासून आपण राजकारणात सक्रिय आहे. यावेळी प्रथमच विरोधकांकडून आपल्यावर इतक्या खालच्या पातळीवरचे आरोप झालेले आहेत. सरकारच्या चांगल्या कामांमुळे सैरभर झाल्यामुळेच त्यांच्याकडून अशी आरोपबाजी होत आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नमूद केले.