रिलायन्स पॉवरच्या शेअर्सवर परिणाम होण्याची शक्यता
रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचे धाकटे बंधू अनिल अंबानी त्यांच्या व्यवसायाला पुनरुज्जीवित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे दिसत असून यातच एक महत्वाची बातमी हाती येतेय. अनिल अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स समूहाची कंपनी रिलायन्स पॉवरने नवीन कंपनी स्थापन केली आहे. कंपनीने अक्षय ऊर्जा क्षेत्रासाठी रिलायन्स एनयू एनर्जीज नावाची कंपनी स्थापन केली आहे. रिलायन्स पॉवरकडून सांगण्यात आले की कंपनीचे सीईओ मयंक बन्सल असतील आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीओओ) राकेश स्वरूप असतील, अशी माहिती देखील उपलब्ध झाली आहे.
नवीन कंपनी सौर, पवन ऊर्जा आणि बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम यांसारख्या क्षेत्रात काम करेल. रिलायन्स न्यू एनर्जीजच्या स्थापनेच्या वृत्तानंतर रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये वाढ दिसून आली. रिलायन्स पॉवरचा शेअर मंगळवारी २ टक्क्यांनी वाढून ४५.३० रुपयांवर पोहोचला होता. गेल्या पाच दिवसांत त्यात १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. या वर्षी आतापर्यंत शेअर ९० टक्क्यांवर चढला आहे.