पर्यावरणीय, सांस्कृतिक, धार्मिक पर्यटनासाठी हरवळे गावाजवळ प्रचंड क्षमता आहे. परंतु त्याची नियोजनबद्ध विनियोग करून घेण्याची दृष्टी नसल्याकारणाने हा परिसर नानाविविध संकटांच्या वावटळीत सापडलेला आहे.
डिचोली लालुक्यातील हरवळे गाव आपली ग्रामीण संस्कृती आणि लोकजीवन हरविण्याच्या वाटेवर आहे. झपाट्याने होत असलेल्या लोकवस्तीचा विस्तार, उभ्या राहणाऱ्या सिमेंट काँक्रिटच्या इमारती नगरपालिका आणि ग्रामपंचायती यांच्यात विभागलेला गाव, लोप पावत असलेली शेती - बागायती, उद्ध्वस्त झालेली जंगले, प्रदूषित झालेले जलस्रोत, कार्यान्वित असलेली बेशिस्त नागरीकरणाची प्रक्रिया... यांच्या चक्रव्यूहात हरवळेचे गावपण विस्मृतीत जाण्याच्या वाटेवर आहे. ‘हर’ म्हणजे शिवशंभो तर ‘वळे’ म्हणजे ओहळ. इथे रुद्रेश्वराचे प्राचीन मंदिर शेकडो वर्षांपासून ही शिवभूमी असल्याचे स्पष्ट करत आहे. भुईपाल गावाच्या डोंगरमाथ्यावरून जन्माला येणारी कुडणे नदी हरवळेत जेव्हा प्रवेश करते, तेव्हा ती त्या ठिकाणी असलेल्या कातळावरून ७० फूट खाली झेपावते आणि तिचे ते नयनरम्य कोसळणाऱ्या धबधब्याचे रूप धारण करते. सांस्कृतिक, पर्यावरणीय, नैसर्गिक सौंदर्याच्या वैविध्यपूर्ण घटकांनी कुडणे प्राचीन काळापासून समृद्ध आहे. गोव्यात एका हजाराहून ज्यास्त वर्षांच्या इतिहासाची पार्श्र्वभूमी असलेली जी हाताच्या बोटावर मोजण्याइतकी प्राचीन गावे आहेत, त्यात हरवळेचे नाव अग्रक्रमी आहे. आज गावाच्या एकंदर स्वरूपात जे आमुलाग्र परिवर्तन उद्भवले, त्यामुळे त्याला धड ग्रामीण आणि धड शहरी भागही म्हणता येणार नाही.
गोव्याच्या कोकण काशीला साजेसे गतवैभव, संस्कृती असलेली जी पवित्र तीर्थक्षेत्रे इथे अस्तित्वात होती, त्यात कुडणे गाव महत्त्वाचे होते. महाभारतातील पांडवांचे वास्तव्य इथे होते, अशी लोकश्रद्धा पूर्वापार असून, त्यांनी इथल्या जांभ्या दगडात गुंफा कोरल्या, त्यात आपल्या आराध्य दैवत असणाऱ्या शिवशंभूची लिंगे प्रस्थापित केली, पवित्र असे भीमकुंड निर्माण केले. आज शुष्क, गलितगात्र होऊन वाहणारी कुडणेची नदी निर्मळ जल सह्याद्रीच्या डोंगररांगांतून घेऊन जेव्हा हरवळेत प्रवेश करायची आणि खाली कोसळायची तेव्हा तिच्या रौद्र भीषण तांडवातून इथल्या कष्टकरी समाजाच्या चक्षूंना चैतन्य, उत्साह, अगम्य, अलौकिक अशा रुद्रेश्वराचा साक्षात्कार झाला नसेल तर नवल मानावे लागेल. कुडणे नदीच्या उजव्या तिरावर असलेले शिवलिंग स्वयंभू असून त्याची स्थापना इथे शेकडो वर्षांपूर्वी झाली. महाराष्ट्रातील रेडीत जेव्हा बदामी चालुक्याची रेवतीद्विप ही राजधानी होती, त्या काळात हरवळेतील डोंगरात गुंफा कोरण्याची प्रेरणा झाली. या गुंफा बौद्ध भिक्षूंनी कोरल्या की शैव पंथियांनी कोरल्या याचे निश्चित पुरावे नसले तरी फोंडा येथील शिरोड्यात शिवपुरातील बौद्ध विहाराचा संदर्भ देणारा जो ताम्रपट सापडला होता, त्यातील शिवपूर गाव म्हणजेच हरवळे असे काही इतिहासकार मानतात आणि या गुंफा शैव भिक्षूंचे विहार असल्याचे मानतात. पुरातत्व अभ्यासक डॉ. व्ये. गुणे यांच्या मते या गुंफा चंद्रपूरचे भोजराजे अथवा कोकण मौर्याच्या आदेशानुसार खोदण्यात आल्या असाव्यात. सहाव्या शतकात या गुंफा खोदल्या असाव्यात. या गुफांतील एका खोलीत ब्राह्मी लिपीतील शिलालेख असून, त्यात ‘संबालुरवासी रवी’ असा संदर्भ असून, सहाव्या शतकाच्या शेवटी किंवा सातव्या शतकाच्या पहिल्या टप्प्यातला हा शिलालेख असावा असे मत आहे. ‘पांडवाच्या होवऱ्यो’ या नावाने परिचित असलेल्या या जांभ्या दगडात कोरलेल्या गुंफा शेकडो वर्षांच्या इतिहासाच्या साक्षीदार आहेत.
हरवळे येथील श्री रुद्रेश्वर संस्थान हे गोव्यातील प्राचीन मंदिर असून, या मंदिरासमोरील नदीच्या पात्रात मृतांचे अस्थी विसर्जन केले जात असल्याने त्याच्या शेकडो वर्षांपासून असलेल्या लौकिकाची कल्पना येते. या नदीच्या पल्याड प्राचीन काळातील लोहगड असून तेथे श्री वल्लभाचार्य प्रभूची बैठक असून, जवळच जांभ्या दगडात कोरलेल्या पादुका आहेत. श्री रुद्रेश्वर संस्थान महाशिवरात्रीच्या पर्वदिनी भाविकांनी गजबजून उठते. त्यावेळी उपस्थित भाविक धबधब्याच्या पाण्यात पवित्र स्नान करतात. पूर्वाचारी, निराकारी, रुद्रेश्वर या दैवतांमुळे या संपूर्ण परिसराला भक्तिरसाचा परिस स्पर्श झाल्याचा अनुभव प्राप्त होत असतो. वरचे हरवळे येथे श्री सातेरी केळबाय ही ग्रामदैवते असून, पूर्वाश्रमी त्यांचे वास्तव्य वृक्षवेलींनी समृद्ध असलेल्या देवराईत होते. आज देवराईचे अस्तित्व नष्ट झालेले असून सातेरी केळबाय या दैवतांची सिमेंट काँक्रिटची नवी मंदिरे उभारण्यात आलेली आहेत. १९७१ साली हरवळेत केवळ १,०२३ इतकी लोकसंख्या होती, ती १९९१ साली २,५९० इतकी झाली. आज ही लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने वरचे हरवळेला स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा देण्यात आलेला आहे, तर खालचे हरवळे साखळीनगर पालिका क्षेत्राचा प्रभाग झालेला आहे. वरचे हरवळेतील बहुसंख्य जनतेचा आर्थिक स्तरदेखील बराच मागासलेला आहे. गोवा सरकारने वरचे हरवळेत औद्योगिक वसाहत उभारलेली असून, त्यातील बरेच गाळे रिकामी आणि ओस पडलेले आहेत. जे उद्योग धंदे येथे कार्यान्वित आहेत, त्यांनी अधूनमधून इथल्या लोकांना जलप्रदूषणाचे चटके देण्यास प्रारंभ केलेला आहे. जुन्या काळी भोज, कोकण मौर्य, बदामी चालुक्य यांच्या राजवटीतील सांस्कृतिक संचितांचा वारसा मिरवणारे हरवळे आज परिवर्तनाच्या वावटळीत घुसमटत चाललेले असून, पाव शतकापूर्वी प्रदूषणकारी खाण व्यवसायाने इथल्या शेती, बागायती आणि पारंपरिक उद्योग धंद्यांना आव्हान दिलेले आहे. लोहखनिज उत्खननामुळे हरवळेतील भूगर्भातील जलसंपत्ती कधीच संकटात सापडलेली आहे. वरचे आणि खालचे हरवळेत खनिज उत्खनन सुरू करण्याचे प्रयत्न चालू आहेत.
पर्यावरणीय, सांस्कृतिक, धार्मिक पर्यटनासाठी हरवळेजवळ प्रचंड क्षमता आहे. परंतु त्याची नियोजनबद्ध विनियोग करून घेण्याची दृष्टी नसल्याकारणाने हा परिसर नानाविविध संकटांच्या वावटळीत सापडलेला आहे. साखळी, कुडणे, होंडा, मोर्ले, पर्ये अशा गावांच्या साखळीत विसावलेला हा गाव एकेकाळी सांस्कृतिक आणि धार्मिक वैभवाच्या शिखरावर होता. परंतु खाण व्यवसायाने हा वारसा आणि त्याचा लौकिक याचे विस्मरण व्हावे, अशी परिस्थिती निर्माण केल्याकारणाने हरवळेचा मूळ चेहरा लोप पावण्याच्या वाटेवर आहे. पावसाळ्यात घो घो आवाज करत कोसळणारा हरवळेचा धबधबा वर्षाचे बारा महिने पाटातून कुळागरात खळखळत जाणारे पाणी, प्राचीन इतिहासाच्या खाणाखुणा कवटाळून नव्या आलिशान मंदिरात जाण्यासाठी सिद्ध असलेला रुद्रेश्वर... या हरवळेच्या अस्मितेच्या खाणाखुणा इतिहासजमा होण्याच्या वाटेवर आहेत.
प्रा. राजेंद्र केरकर
(लेखक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते
असून पर्यावरणप्रेमी आहेत.) मो. ९४२१२४८५४५