क्वीन्स क्लबर्फे स्पर्धेचे आयोजन : चैतन्य गावकर, जोशुआ तालेस उपविजेते
पणजी : आयएम नितीश बेळुरकरने अखिल गोवा लिबरेशन कप जलद खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत ९ फेऱ्यांमध्ये ९ गुण मिळवत विजेतेपद पटकावले. स्पर्धा क्वीन्स चेस अँड कल्चरल क्लबतर्फे डॉ. के. बी. हेडगवार विद्यालय, कुजिरा येथे आयोजित करण्यात आली होती. चैतन्य गावकर व जोशुआ तालेस यांनी प्रत्येकी ८ गुण मिळवत अनुक्रमे द्वितीय व तृतीय स्थान मिळवले.
आलेक्स सिक्वेराने ७.५ गुणांसह चौथे स्थान पटकावले तर देवेश नाईक, विहान तारी, सुधाकर पटगर, एसीएम रायस कर्व्हालो, जेनिसा सिक्वेरा, हर्ष डागारे, लिया सिल्वेरा, आयुष नाईक आणि अर्थ कारापूरकर यांनी प्रत्येकी ७ गुण मिळवत अनुक्रमे ५वे ते १३वे स्थान पटकावले.
बक्षीस वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारत चेस फेडरेशनचे माजी खजिनदार व गोवा चेस असोसिएशनचे माजी सचिव किशाेर बांदेकर यांची उपस्थिती होती. यावेळी त्यांनी क्वीन्स क्लबच्या सदस्यांनी या स्पर्धेच्या केलेल्या आयोजनाबद्दल कौतुक केले. यावेळी व्यासपीठावर विद्या बांदेकर, सर्वानंद शिरोडकर, संदेश प्रभू चोडणेकर, मुख्य आर्बिटर तनिष्क कवळेकर यांची उपस्थिती होती.
क्वीन्स क्लबच्या अध्यक्षा डॉ. रूपा बेळुरकर यांनी क्लबच्या उपक्रमांची माहिती दिली. तन्वी हडकोणकर यांनी सर्वांचे आभार मानले. क्वीन्स क्लबच्या उपाध्यक्ष प्रज्ञा काकोडकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.