महाराष्ट्राचे नूतन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक प्रचारसभांमध्ये आपण आधुनिक अभिमन्यू आहोत, असे म्हटले होते. विधानसभा निवडणुकांमध्ये ऐतिहासिक विजय मिळवत महायुतीची सत्ता तिसर्यांदा प्रस्थापित करुन आणि तिसर्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान होऊन त्यांच्याभोवती निर्माण केला गेलेला चक्रव्यूह यशस्वीपणाने भेदला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी राजकारण आणि समाजकारण यात पावले टाकली ती विद्यार्थी चळवळीतून. महाविद्यालयात शिकत असताना प्रथमत: ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक बनले आणि पुढे महाविद्यालयात गेल्यावर ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या संघटनेचे सक्रिय कार्यकर्ते झाले. विविध सामाजिक उपक्रम, चळवळी तसे शैक्षणिक प्रश्नावरील आंदोलने यातही ते सक्रिय होते. ज्ञान, चारित्र्य व एकता हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ध्येय असून त्या दृष्टीने त्यांनी आपली अखंड साधना चालू ठेवली आणि हळूहळू त्यांच्या नेतृत्त्वाचा कलाकलाने विकास होत गेला. वडिलांची शिस्त, आईचे संस्कार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील प्रभावशाली वातावरण यातून फडणवीस यांचे चारित्र्य आकारास आले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यास प्रारंभ करताना, गती देताना त्यांनी मूलगामी संघटन कार्याचे धडे घेतले आणि या संघटन कार्यात त्यांनी प्रवास, भेटी, अभ्यास, बैठका याद्वारे राष्ट्र जीवनाची विविध क्षेत्रांची संपूर्ण माहिती घेतली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून भारतीय जनता पक्षाकडे वळले आणि भारतीय जनता मोर्चाचे राज्य अध्यक्ष बनले. त्यापूर्वी नागपूर शहरातील महापालिकेत नेतृत्व केले आणि नागपूरचे महापौरही झाले. भारतातील दुसरे तरूण महापौर असा लौकिक त्यांना मिळाला आणि त्याला साजेसे कार्य त्यांनी केले. १९९९ साली ते महाराष्ट्र विधानसभेत निवडून आले आणि पुढे २०१४ पर्यंत विधीमंडळात प्रतिनिधित्त्व केले. भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाप्रमाणे प्रदेशाध्यक्ष पदही त्यांच्याकडे चालून आले आणि प्रदेशाध्यक्ष या नात्याने पक्षात नव चैतन्य आणण्यातही ते यशस्वी ठरले. प्रथम २०१४ साली लोकसभा आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणूकीत भारतीय जनता पक्षाला जे घवघवीत यश मिळाले त्या यशाचे शिल्पकार देवेंद्र फडणवीसच होते. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याचे पक्षनेतृत्व म्हणून निवड केली.
अभ्यासू मुख्यमंत्री
विधीमंडळ नेतेपदी एकमताने निवड झाल्यानंतर ३१ ऑक्टोबर २०१४ रोजी त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची सुत्रे हाती घेतली होती. सातत्याने कार्यरत राहून या पाच वर्षांत त्यांनी राज्याच्या राजकारण आणि समाजकारणावर विलक्षण छाप टाकली. शेती, उद्योग, शिक्षण, संस्कृती, अर्थकारण अशा अनेक क्षेत्रात त्यांनी महाराष्ट्राचा सकल अंगाने अभ्यास केला आहे. विशेषतः शेती प्रश्नावरील त्यांनी केलेले कार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. यशवंतराव चव्हाण आणि वसंतराव नाईक यांच्यानंतर शेतीच्या प्रश्नाचा एवढा सूक्ष्म आणि बारकाईने अभ्यास करणारे मुख्यमंत्री म्हणून त्यांचा नामोल्लेख केला जातो. जलयुक्त शिवार हा एक अभिनव उपक्रम आखला आणि केवळ घोषणांनीच नव्हे तर प्रत्यक्ष कृतीनेच तो प्रत्यक्षात आणला. त्यासाठी चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात प्रवास करून आणि स्वतः श्रमदान करून त्यांनी या योजनेच्या प्रस्थापनेत महत्त्वाचे योगदान दिले. जलयुक्त शिवाराची कामे त्यांनी इतक्या बारकाईने पाहिली की त्यामुळे राज्यात शेतीचे उत्पादन वाढले होते आणि शेतीच्या सिंचनाचा साठासुद्धा वाढला. २०१४ ते २०१९ या काळात त्यांनी शेततळ्यांच्या योजनेला गती दिली आणि जलयुक्त शिवार योजने अंतर्गत ठिकठिकाणी पाण्याचा साठा करून भूजल पातळी उंचावण्यासाठी प्रयत्न केले. परिणामी आटलेल्या नद्या भरून वाहू लागल्या. पूर्णपणे मोकळ्या झालेल्या विहीरी पाण्याने भरू लागल्या. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात या योजनेला खोडा घालण्यात आला; परंतु २०२२ मध्ये पुन्हा सत्तेत आल्यानंतर या योजनांची नव्याने अमलबजावणी सुरू झाली.
नेतृत्त्वाचे समाजशास्त्र
कुठलेही नेतृत्त्व ज्या सामाजिक जीवनातून विकसित होते त्या समाजाचा प्रभाव नेतृत्त्वावर पडणे स्वाभाविक असते. नागपूर परिसरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यसंस्कृतीचा प्रभाव देवेंद्र फडणवीस यांच्यावर पडलेला आहे. त्यांनी प्रारंभीच्या काळात, संघ, अभाविप, आणि भाजप मध्ये जी कामे केली त्या कामाची बैठक त्यांना राज्याचे नेतृत्त्व करण्यास मार्गदर्शक ठरली आहे. विकासाचे राजकारण पुढे नेत असताना समाजातील दुःखी, कष्टी आणि पददलित माणसाची दुःखे समजावून घेण्यास ते समर्थ आहेत. मागील काळात ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ या कार्यक्रमातील त्यांची भाषणे ऐकली असता त्यांच्या अभ्यासू नेतृत्त्वाचे प्रतिबिंब या सर्व भाषणात उमटले असल्याचे दिसून येते. त्यांच्या मुलाखतींचे विश्लेषण केल्यास शाश्वत विकास हा त्यांच्या चिंतनाचा विषय असल्याचे दिसून येते. त्यांनी सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाला गती देण्यासाठी राज्यातील शेती, उद्योग, शिक्षण या मूलभूत समस्यांचा सखोल आणि सूक्ष्म अभ्यास करून या संदर्भात आपली समीकरणे विकसित केली आहेत. महाराष्ट्र हे देशातील प्रगतीशील आणि पाच प्रमुख राज्यांपैकी एक राज्य आहे. हे लक्षात घेऊन राज्यात केले जाणारे विकासाचे प्रयोग हे देशातील इतर राज्यांना पथदर्शक ठरतात हे लक्षात घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी विकासाचे अनेकविध प्रयोग यशस्वी केले आणि ते प्रत्यक्षात आणले. त्यांच्या या कृतीशील विकास कार्यक्रमातून प्रकट झालेले चिंतन पुन्हा एकदा महाऱाष्ट्राला निश्चितच नवी दिशा देणारे ठरणार आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाचे समाजशास्त्र अभ्यासले असता त्यांची बांधिलकी ही सातत्याने सामाजिक राहिली आहे. हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व हे सूत्र घेऊन त्यांनी हिंदुत्त्वाला समरसतेची जोड दिली आहे आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा एकात्म मानवदर्शन हा व्यापक विचार त्यांनी प्रत्यक्षात कृतीत आणला आहे. यावरून त्यांच्या नेतृत्त्वाचे समाजशास्त्र किती प्रभावशाली आहे आणि त्यांच्या नेतृत्त्वाची पाळेमुळे लोकजीवनात कशी रुजली आहेत हे स्पष्ट होते.
दुसरे म्हणजे कार्यक्रम कोणताही आणि कुठेही असो त्यांच्या सभा गाजल्या आणि त्यांची भाषणे लोकांची नाडी ओळखणारी ठरली. लोकसभा किंवा विधानसभा यांतील त्यांचा झंझावाती प्रचार अनेक मतदारसंघात गेमचेंजर ठरला. अनेक अर्थाने देवेंद्र फडणवीस यांना संघर्ष करावा लागला पण त्यांनी संघर्ष यात्रेचे रुपांतर संवाद यात्रेत केले. प्रश्नांचा भडिमार झाला तरी देखील स्वकर्तृत्त्वाने आणि स्वयंप्रज्ञेने प्रश्न सोडवण्यासाठी आवश्यक अशी व्यूहरचना कशी करावी याबाबत त्यांची अभ्यासूवृत्ती त्यांना सर्वच संकटातून बाहेर पडण्यास मार्गदर्शक ठरली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शिस्त, भारतीय जनता पक्षाच्या कार्यातील तडफ आणि समस्या सोडवण्यातील तडफ ही त्यांची बलस्थाने आहेत. आता या अष्टपैलू नेतृत्वास पुन्हा एकदा महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेण्याची संधी लाभली आहे.
जलयुक्त शिवारप्रमाणेच राज्यांत भारतीय जनता पक्षाने अमलात आणलेली लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारने कृतीमध्ये आणली आणि ती अक्षरशः गेमचेंजर ठरली. याशिवाय शेतकर्यांना सौरपंप योजना असो, किंवा शेतकर्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठीच्या उपाययोजना असोत किंवा उद्योगक्षेत्रात चैतन्य येण्यासाठी राबवलेल्या योजना असोत अथवा शिक्षणक्षेत्रात गुणवत्तावृद्धीसाठी केलेले प्रयत्न असोत या सर्वांचा परिपाक म्हणजे महाराष्ट्राचा विकासवेग वाढतो आहे. भविष्यात भारताची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलरचा टप्पा पार करेल तेव्हा महाराष्ट्राचा त्यात सिंहाचा वाटा असेल आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांनी म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्र देशाचा खङ्गहस्त बनेल. हे स्वप्न साकार करण्याचे सामर्थ्य देवेंद्र फडणवीस यांच्या व्यक्तिमत्त्वात आहे. नम्रता, विद्वत्ता, बुद्धिमत्ता, प्रचंड अभ्यासूपणा, आकलनक्षमता, प्रशासनावरील पकड, व्यासंग, समन्वयवादीपणा, संवेदनशीलता, प्रभावी वक्तृत्व, प्रचंड कार्यक्षमता, प्रयत्नवादी, विजिगिषु वृत्ती, सौहार्द आणि प्रसंगी आवश्यक असणारा कणखरपणा हे नेतृत्व करणार्या व्यक्तीच्या अंगी आवश्यक असणारे सर्व गुण त्यांच्यामध्ये आहेत आणि त्यांनी ते प्रयत्नपूर्वक जोपासत वृद्धिंगत केलेले आहेत. त्यामुळेच हा आधुनिक अभिमन्यू चक्रव्यूह भेदण्यात यशस्वी झाला.
प्रा. डॉ. वि. ल. धारुरकर
(लेखक ज्येष्ठ विचारवंत आहेत.)