सावंतवाडी : गोव्यात उपलब्ध असलेली दारू स्वस्त असल्याने देशी पर्यटकांत ती विशेष लोकप्रिय आहे. याच कारणास्तव अनेकदा गोवा बनावटीच्या दारूची गैरमार्गाने तस्करी केली जाते. हा प्रकार रोखण्यासाठी गोव्याच्या सीमेवर तसेच अनेक ठिकाणी अबकारी खाते नेहमीच नजर ठेऊन असते. दरम्यान अशाच एका प्रसंगी, ४ डिसेंबर रोजी मुंबई-गोवा महामार्गावर झाराप येथे अबकारी खात्याद्वारे रुटीन तपासणी दरम्यान तब्बल ६१ लाख २८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, या दोन्ही आरोपींना २५ हजार रुपयांच्या सशर्त जामिनावर मुक्त करण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार; ४ डिसेंबर रोजी आरोपी ओम प्रकाश गुप्ता (३२,घणसोली-मुंबई) आणि शिव लखण केवट (३०,गोंदरगढी-रेवा-मध्यप्रदेश) यांना मुंबई-गोवा महामार्गावरील झराप येथे अबकारी खात्याने रुटीन तपासणीसाठी थांबवले. गाडीतील मालाची चौकशी केली असता अंत खाली डबे असल्याचे सांगितले व त्यांची कागदपत्रेदेखील दाखवली. या कागदपत्रांबबत पोलिसांना संशय आल्यानंतर त्यांनी रीतसर गाडीची तपासणी केली असता त्यांना एकूण ९४० बॉक्समध्ये रॉयल सिलेक्ट डिलक्स व्हिस्की (१८० मिली) ४५,१२० प्लॉस्टिक सिलबंद बाटल्या तसेच ८० बॉक्समध्ये एव्हरग्रीन रिझर्व्ह व्हिस्कीच्या (७५० मिली) ९६० काचेच्या बाटल्या असे एकूण १०२० बॉक्स अशी गोवा बनावटीची दारू आढळून आली. यांची किंमत बाजारभावानुसार सुमारे ५० लाख ८८ हजार रुपये इतकी आहे. पोलिसांनी या मालासह, वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला ट्रक व मोबाईल असा एकंदरीत ६१ लाख २८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. दोघा आरोपींवर महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम १९४९ च्या कलम ६५ (अ), (ई),८०,८१,८३ व ९० अन्वये गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली.
पोलिसांनी आरोपी ओम प्रकाश गुप्ता, शिव लखन केवट यांना अटक करुन कुडाळ येथील न्यायालयात हजर करत ३ दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. दरम्यान न्यायालयाने आरोपी तर्फे अॅड परशुराम चव्हाण यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरत पोलीस कोठडी नाकारुन न्यायालयीन कोठडी मंजुर केली. पुढे आरोपीच्या वकिलांनी जामीन अर्ज दाखल करुन त्यावर युक्तीवाद केला. आरोपी तर्फे करण्यात आलेला युक्तीवाद ग्राह्य धरत न्यायालयाने दोघाही आरोपींची पंचवीस हजार रुपयांच्या सशर्त जामिनावर सुटका केली.