श्रीलंकेचा ७ गडी राखून केला पराभव
शारजहा : टीम इंडियाने (Team India) १९ वर्षांखालील आशिया कप २०२४ च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा (Sri Lanka) ७ गडी राखून पराभव केला. भारताने हा सामना केवळ २१.४ षटकांत जिंकला. वैभव सूर्यवंशीने यात महत्त्वाची भूमिका बजावली. वैभवने स्फोटक अर्धशतक झळकावले. विशेष म्हणजे त्याचे हे सलग दुसरे अर्धशतक ठरले. याआधी वैभवने यूएईविरुद्धही आपली ताकद दाखवली होती.
वास्तविक वैभव टीम इंडियासाठी ओपनिंगसाठी आला होता. त्याने ३६ चेंडूंचा सामना करत ६७ धावा केल्या. वैभवच्या या खेळीत ६ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश होता. त्याने या स्पर्धेत आतापर्यंत एकूण ४ सामने खेळले आहेत. या काळात त्याने १२ चौकार आणि १२ षटकार मारले. स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत वैभव सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. शाहजेब खान अव्वल आहे. पाकिस्तानच्या शाहजेबने १६ षटकार ठोकले आहेत.
भारतीय संघाचा अंतिम फेरीपर्यंत प्रवास
भारताने पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध खेळला. यामध्ये त्यांना ४३ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. मात्र यानंतर टीम इंडियाने सलग तीन सामने जिंकले. भारताने जपानचा २११ धावांनी पराभव केला. यानंतर यूएईविरुद्ध १० गडी राखून विजय मिळवला. टीम इंडियाने उपांत्य फेरीत श्रीलंकेचा ७ विकेट्स राखून पराभव केला.
वैभवची सूर्यवंशीची चमक
पहिल्या दोन सामन्यात वैभवने टीम इंडियासाठी काही खास कामगिरी केली नाही. मात्र यानंतर तो पुन्हा रंगात आला. पाकिस्तानविरुद्ध १ धाव करून वैभव बाद झाला. त्याने जपानविरुद्ध २३ धावांची खेळी खेळली. यूएई विरुद्ध त्याने स्फोटक प्रदर्शने केले. वैभवने नाबाद ७६ धावा केल्या होत्या. उपांत्य फेरीत ६७ धावा केल्या. टीम इंडियासाठी तो फायनलमध्येही आपली ताकद दाखवू शकतो. वैभव टीम इंडियाचा भावी स्टार बनू शकतो.