मुलींच्या गटात भूमिका उच्च माध्यमिक पर्ये विजयी : क्रीडा आणि युवा व्यवहार संचालनालयातर्फे स्पर्धा
पणजी : दामोदर इंग्लिश उच्च माध्यमिक विद्यालय गुढी पारोडा आणि श्री भूमिका उच्च माध्यमिक विद्यालय पर्ये यांनी अनुक्रमे मुलगे आणि मुलांच्या गटात आंतरउच्च माध्यमिक १९ वर्षांखालील हॉकी स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. स्पर्धा क्रीडा आणि युवा व्यवहार संचालनालयातर्फे पेडे म्हापसा येथे खेळवण्यात आली होती.
मुलांच्या अंतिम सामन्यात दामोदर संघाने डीएमसी म्हापसाचा ५-२ अशा गोलने पराभव केला. दामोदर संघाने मध्यंतरापर्यंत ३-० अशी आघाडी घेतली होती तर म्हापसाने ही आघाडी ४३व्या मिनिटांपर्यंत ३-२ अशी कमी करण्यात यश मिळवले. मात्र दामोदर संघाने ४७व्या आणि ४९व्या मिनिटाला गोल करत सामना ५-२ने आपल्या खिशात घातला. विवेक वैदनादे आणि दीपक नाईक यांनी म्हापसासाठी तर दामोदर संघासाठी हर्ष गावकरने ३ आणि शांतम शेल्डेकर याने दोन तर राहुल गावकर आणि कुणाल गावकर यांनी प्रत्येकी एक गोल केला.
मुलींच्या सामन्यात श्री भूमिका उच्च माध्यमिक पर्येने रोझरी उच्च माध्यमिक विद्यालय नावेलीचा ४-२ असा शूटऊटमध्ये पराभव केला. पूर्ण वेळेत दोन्ही संघ १-१ गोलने बरोबरीत होते. रिया तळेखोलकरने पर्येसाठी मैदानी गोल केला तर फातिमा ब्रागांझाने पेनल्टी कॉर्नरला गोलमध्ये बदलत नावेली संघाला बरोबरी साधून दिली.
हॉकी युवा विकास कार्यक्रमाचा पर्ये संघ भाग
पर्ये मुलींचा संघ स्पोर्ट्स फॉर यूथ डेव्हलपमेंट या बॅनरखाली पिलार फादर्स गोवाने सुरू केलेल्या हॉकी युवा विकास कार्यक्रमाचा भाग आहे. हा कार्यक्रम २०२१मध्ये फा. डॉम्निक आल्वारेस यांच्या मार्गदर्शनाखाली सत्तरी तालुक्यात सुरू झाला होता. पिलार फादर्स यूथ डेव्हलपमेंट कार्यक्रम अंतर्गत सत्तरी संघाच्या प्रशिक्षणात विजेते होण्याची ही पहिलीच वेळ आहे.