पुन्हा ‘देवेंद्र पर्व’

निवडणुकीत २३० जागा मिळवून सत्तेत येण्याची केलेली कमाल याचे खरे श्रेय देवेंद्र फडवणीस यांनाच जात होते. त्यामुळे तेच मुख्यमंत्री होतील हे स्पष्ट होते. शपथविधीने साऱ्या चर्चांना पूर्णविराम देत महाराष्ट्रात महायुतीच्या नव्या पर्वाला प्रारंभ केला आहे.

Story: अग्रलेख |
06th December, 12:21 am
पुन्हा ‘देवेंद्र पर्व’

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा गुरुवारी शपथविधी झाला. महाराष्ट्रातील विधानसभेच्या निकालानंतर गेले दहा-बारा दिवस असलेला सस्पेन्स गुरुवारी संपला. फडणवीसच मुख्यमंत्री होतील हे स्पष्ट होते, पण त्यावरून महायुतीत फूट पडू नये यासाठी भाजप श्रेष्ठींना चांगलीच कसरत करावी लागली. म्हणजे महायुतीचे घटक असलेल्या एकनाथ शिंदे यांनी सहजपणे मुख्यमंत्रीपद सोडलेले नाही. किंवा दुसरा घटकपक्ष असलेला राष्ट्रवादी अजित पवार यांच्या गटानेही सहजपणे अटी मान्य केलेल्या नाहीत. त्यासाठीच गेले आठ-दहा दिवस भाजपच्या नेत्यांना कंबर कसावी लागली. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यात हस्तक्षेप करावा लागला. अमित शहा, जे. पी. नड्डा, राजनाथ सिंग अशा अनेक दिग्गज नेत्यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची मनधरणी केली. उपमुख्यमंत्रीपद आणि खाते वाटपावर एकमत झाल्यानंतरच शपथविधी ठरला. फडवणीस यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि एकनाथ शिंदे तसेच अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. हा सोहळा अभूतपूर्व करण्यासाठी भाजपने एनडीएच्या सर्व मुख्यमंत्र्यांना खास आमंत्रित केले होते. भाजपचे सर्व मुख्यमंत्री होतेच, पण एनडीएचे सरकार असलेल्या बिहार, आंध्र प्रदेशसारख्या राज्यांचे मुख्यमंत्रीही व्यासपीठावर होते. अनेक केंद्रीय मंत्री, एनडीएचे अन्य नेते, इतर राज्यांतील मंत्री, भाजपचे प्रदेशाध्यक्ष, भाजपचे इतर महत्त्वाचे पदाधिकारी तसेच शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार राष्ट्रवादी गटाचे अनेक नेते, पदाधिकारी या सोहळ्याला उपस्थित राहिले. एका अर्थाने महाराष्ट्राच्या शपथविधी सोहळ्यात एनडीएने आपले शक्तीप्रदर्शनच केले. एनडीएचे सर्व घटक पक्ष एकत्र राहतील असेच बहुधा भाजपला भासवायचे होते. या सगळ्या गोष्टींपेक्षा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली शपथ फार महत्त्वाची आहे. पुरोगामी महाराष्ट्र अशी ज्या प्रदेशाची ओळख आहे, त्या राज्यात काँग्रेसने सर्वाधिक काळ सत्ता भोगली. त्यांच्या दिमतीला शरद पवार यांची सोबत असायची. भाजपच्या नेतृत्वाखाली किंवा शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र जास्तकाळ सत्तेत राहिलेला नाही. २०१३ पासून भाजप, उद्धव ठाकरे गटाची शिवसेना, एकनाथ शिंदे, अजित पवार यांची सत्ता राहिली. त्यापूर्वी १९९५ ते १९९९ दरम्यान शिवसेना भाजपची म्हणजे एनडीएची सत्ता होती. २०१३ पासून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल होत गेला. या बदलांचा लाभ उठवत महाराष्ट्र भाजपच्या नेतृत्वाखाली ठेवण्यासाठी पक्षाच्या संपूर्ण यंत्रणेने कंबर कसली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सोबत घेऊन विधानसभा निवडणुकीत एवढी मेहनत घेतली की, भाजपला एकट्यालाच महाराष्ट्रात १३२ जागा मिळाल्या. बहुमतासाठी फक्त १३ जागा कमी पडल्या. भाजपच्या या अभूतपूर्व यशाचे श्रेय देवेंद्र फडणवीस यांनाच दिले गेले. मात्र मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री राहिलेले अजित पवार यांनीही प्रत्येकी ५७ आणि ४१ जागा मिळवल्या. या तीन पक्षांकडे २३० जागा आहेत. त्यामुळे हे सरकार मजबूत राहू शकते. महायुतीच्या घटक पक्षांनी काहीही अडथळा आणण्याचा प्रयत्न केला, तर भाजपकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा पर्याय आहेच. भाजपकडून होणारे फोडाफोडीचे राजकारण पाहता, सध्या सत्तेबाहेर राहिलेल्या कोणत्याही गटाला कधीही भाजप आपल्यासोबत आणू शकते. या सगळ्या गोष्टी पाहिल्या, तर विनाअडथळा फडवणीस पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करतील यात शंका नाही.       

लोकसभा निवडणुकीत महायुतीतल्या भाजप आणि इतर दोन्ही पक्षांना जबर फटका बसला होता. त्यानंतर महायुती सरकारने लोकहिताच्या योजना मार्गी लावल्या. ‘लाडकी बहीण’सारख्या योजनेने जनमानसांत महायुतीला चांगले स्थान मिळवून दिले. निवडणुकीच्या काळात याच योजनेचा जास्त बोलबाला होता. जून महिन्यात मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीएला ज्या महाराष्ट्राने जवळ जवळ नाकारले होते, त्याच राज्यात अवघ्या पाच महिन्यांत विधानसभेच्या २३० जागा मिळतात हा चमत्कारच होता. लाडकी बहीण योजनेचा यात मोठा वाटा होता. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हेही याच पाच महिन्यात कमालीचे लोकप्रिय झाले. असे असले तरी निकालानंतर मोठे भावंड म्हणून भाजपकडेच मुख्यमंत्रीपद जाणार हे निश्चित होते. उद्धव ठाकरे यांच्याशी फारकत घेतल्यानंतर एकनाथ शिंदे-अजित पवार यांना सोबत घेऊन थाटलेला संसार आणि टीका होत असतानाही निवडणुकीत पुन्हा २३० जागा मिळवून सत्तेत येण्याची केलेली कमाल याचे खरे श्रेय देवेंद्र फडवणीस यांनाच जात होते. त्यामुळे तेच मुख्यमंत्री होतील हे स्पष्ट होते. शपथविधीने साऱ्या चर्चांना पूर्णविराम देत महाराष्ट्रात महायुतीच्या नव्या पर्वाला प्रारंभ केला आहे.