झारखंड
विधानसभा निवडणूक १३ आणि २० नोव्हेंबर अशा दोन टप्प्यांत पार पडली. २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होऊन पुन्हा झारखंड मुक्ती मोर्चाने (झामुमो) काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल (राजद) आणि सीपीआय (एमएल) यांच्या साथीने स्पष्ट बहुमत प्राप्त केले. ‘इंडिया’ने ८१ पैकी तब्बल ५६ जागांवर विजय नोंदवला. भाजपच्या २१ जागांसह रालोआला २४ जागांवरच समाधान मानावे लागले. झामुमोचे सर्वेसर्वा हेमंत सोरेन यांनी गुरुवार, २८ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या सोहळ्यात शपथबद्ध होणारे सोरेन एकटेच होते. त्यानंतर तब्बल आठ दिवसांनंतर सोरेन मंत्रिमंडळाचा गुरुवार, ५ डिसेंबर रोजी विस्तार झाला.
नव्या विधानसभेचे पहिले विशेष अधिवेशन ९ डिसेंबरपासून तीन दिवस चालणार आहे. या अधिवेशनात नवनिर्वाचित आमदारांना शपथ देणे, सभापतींची निवड, विरोधी पक्ष नेत्याची निवड केली जाणार आहे. सोरेन सरकारला पहिल्याच दिवशी विश्वासमत सिद्ध करायचे आहे. त्यापूर्वी मंत्रिमंडळ स्थापन करण्याचा सोरेन यांचा विचार होता. त्याप्रमाणे मंत्रिमंडळाची रचना झाली. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत संबंधित पक्षांमध्ये परस्पर विचारमंथन झाल्यानंतर युतीच्या बैठकीत त्याला अंतिम मंजुरी देण्यात आली. मंत्र्यांची निवड करताना प्रादेशिक आणि जातीय संतुलनाची काळजीही घेतली गेली आहे.
मंत्रिमंडळ विस्तार करताना गुरुवारी ११ मंत्र्यांनी शपथ घेतली. राजभवन येथे झालेल्या सोहळ्यात राज्यपाल संतोष गंगवार यांनी नवनियुक्त मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या ११ मंत्र्यांमध्ये सर्वाधिक ६ मंत्री झामुमोचे, काँग्रेसचे ४ आणि राजदचा एक मंत्री आहे. ‘इंडिया’तील सीपीआय (एमएल) पक्षाने मंत्रिमंडळात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. नूतन मंत्र्यांमध्ये ५ जुनेच चेहरे आहेत, तर ६ जण प्रथमच मंत्री बनले आहेत. विधानसभेत ‘इंडिया’चे आठ महिला सदस्य आहेत. पैकी दोघांची मंत्रिपदी वर्णी लागली आहे. मंत्रिमंडळात समाजातील सर्व घटकांना स्थान मिळेल याची काळजी घेण्यात आली आहे. अनुसूचित जमातीचे चार, अनुसूचित जातीचा एक, ओबीसीचे तीन, अल्पसंख्याक समाजातील दोन आणि सवर्ण समाजातील एक आमदार मंत्रिमंडळात आहे. काँग्रेसच्या ३१ वर्षीय नेहा तिर्की या मंत्रिमंडळातील सर्वात तरुण आहेत. काँग्रेसचे ६६ वर्षीय राधा कृष्ण किशोर हे सर्वांत ज्येष्ठ मंत्री आहेत. राजदचे संजय प्रसाद यादव हे सर्वांत श्रीमंत मंत्री आहेत. त्यांनी शपथपत्राद्वारे २९.५९ कोटींची संपत्ती जाहीर केली आहे. यावेळी विधानसभेचे हंगामी सभापती म्हणून झामुमोचे स्टीफन मरांडी यांनाही शपथ देण्यात आली. मंत्रिमंडळ स्थापन झाल्यामुळे आता जनहिताचा कारभार गतीने पुढे जाईल, अशी जनतेला अपेक्षा आहे.
प्रदीप जोशी