आज पासून डे-नाईट पिंक बॉल टेस्ट : रोहित. गिलचे पुनरागमन
अॅडलेड : बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमधील दुसरी कसोटी पिंक बॉल कसोटी सामना ६ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. दरम्यान, भारतासाठी चांगली गोष्ट ही आहे की संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा परतला आहे, तर शुबमन गिलही दुखापतीतून सावरला आहे. म्हणजे संपूर्ण संघ पूर्णपणे तंदुरुस्त आणि खेळण्यासाठी तयार आहे. अशातच ऑस्ट्रेलियाने देखील पहिल्या कसोटीसाठी प्लेईंग इलेव्हन जाहीर केली आहे.
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना हा पिंक बॉल कसोटी असणार आहे. पण या सामन्याची वेळही बदलली आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमधील पहिला सामना भारतीय वेळेनुसार सकाळी ७.५० वाजता सुरू झाला होता. पण दुसरा कसोटी सामना हा आता सकाळी ९.३० वाजता सुरू होणार आहे. जेव्हा भारतात कसोटी सामना असतो तेव्हा दिवसाचे सामने ९.३० वाजता सुरू होतात. आता ऑस्ट्रेलियात हा सामना डे नाईट टेस्ट असल्याने दुपारी २.३० वाजता सुरू होणार आहे. भारतात हा सामना सकाळी साडेनऊ वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी साडेचार पर्यंत असेल. त्यावेळी ऑस्ट्रेलियात रात्र झालेली असेल.भारतीय संघ फारसे डे-नाईट कसोटी सामने खेळत नाही. भारतीय संघ आपल्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात दुसऱ्यांदा विदेशी भूमीवर दिवस-रात्र कसोटी खेळताना दिसणार आहे. भारताने पहिली पिंक बॉल कसोटी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळली होती. त्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. पण घरच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या तीनही गुलाबी चेंडूच्या कसोटी भारताने जिंकल्या आहेत. इतकेच नाही तर टीम इंडियाने या मालिकेतील पहिला सामना रोहित शर्मा आणि शुबमन गिलशिवाय जिंकला आहे, त्यामुळे संघाचे मनोबल उंचावले आहे. रोहित शर्मा अनुपस्थितीनंतर दुसऱ्या सामन्यात नेतृत्व करणार आहे. तर पॅट कमिन्स ऑस्ट्रेलियाचे कर्णधारपद सांभाळणार आहे. टीम इंडियाकडे हा सामना जिंकून सलग दुसरा विजय मिळवण्यासह २०२० चा वचपा घेण्याची दुहेरी संधी असणार आहे. ऑस्ट्रेलियाने भारताला अॅडलेडमध्ये ३६ धावांवर ऑलआऊट केले होते. त्यामुळे भारताचा अॅडलेडमध्ये ३६ चा आकडा आहे. आता टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला याच मैदानात पराभूत करत वचपा घेणार का? याकडे साऱ्यांचे लक्ष असणार आहे.
रोहित शर्माने निश्चितपणे सांगितले आहे की तो संघाच्या फलंदाजीच्या क्रमाशी छेडछाड करू इच्छित नाही, म्हणून केएल राहुल सलामी देईल आणि तो स्वतः मधल्या फळीत खेळेल. मात्र मधल्या फळीत पाचव्या क्रमांकावर खेळणार की सहाव्या क्रमांकावर खेळणार हे रोहितने सांगितले नाही. परिस्थितीनुसार रोहित फलंदाजीला येण्याची शक्यता आहे.या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघ पुनरागमन करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करेल. ज्याला सामोरे जाणे टीम इंडियासाठी सोपे होणार नाही. एकीकडे गवताच्या खेळपट्टीने ॲडलेड कसोटीत भारतीय संघाचा ताण वाढवला आहे. तर दुसरीकडे पहिल्या दिवशीचे हवामानही अडचणी निर्माण करू शकते.
सामन्यापूर्वी कर्णधार रोहित शर्माने या सामन्यात सलामीला येणार नसल्याची मोठी घोषणा केली आहे. रोहितने सांगितले की, पर्थ कसोटीप्रमाणे या सामन्यात फक्त केएल राहुलच सलामीला येईल.
ॲडलेडमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत रोहित शर्माने युवा खेळाडू हर्षित राणा आणि नितीश रेड्डी यांचे कौतुक केले. रोहित म्हणाला, ‘हर्षित आणि नितीश राणा पर्थमध्ये पहिला सामना खेळतीस, असे माझ्या मनात कधीच आले नव्हते. त्याची बॉडी लँग्वेज चांगलीच दिसत होती. कसोटी मालिका जिंकायची असेल तर अशा खेळाडूंची गरज आहे. त्याचबरोबर रोहितने गिल आणि जैस्वालचेही कौतुक केले. तो म्हणाला, जैस्वाल आणि गिल हे दोघेही वेगवेगळ्या पिढीतील खेळाडू आहेत. आम्ही पहिल्यांदा ऑस्ट्रेलियात आलो, तेव्हा धावा कशा करायच्या याचा विचार करायचो. पण हे खेळाडू सामना जिंकण्यासाठीच खेळतात. सामना जिंकण्यावर त्याचे सर्वाधिक लक्ष असते.
ॲडलेडमध्ये सामना ६ डिसेंबर रोजी स्थानिक वेळेनुसार दुपारी २.३० वाजता सुरू होईल. जर आपण पहिल्या दिवसाच्या हवामानाबद्दल बोलायचे झाल्यास, तर सामन्यात पावसाचा व्यत्यय येऊ शकतो. वेदर डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार मॅच सुरू होण्यापूर्वी २० ते ३० टक्के पावसाची शक्यता आहे. सामना सुरू झाल्यानंतर पावसाची शक्यता कमी होईल. पण ढगांचा जमाव दिसून येईल. अशा स्थितीत वेगवान गोलंदाजांना त्याचा पुरेपूर फायदा होईल.
हवामानाचा विचार करता नाणेफेक जिंकणाऱ्या संघासाठी प्रथम फलंदाजी करायची की गोलंदाजी करायची हे ठरवणे अजिबात सोपे असणार नाही. या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी पावसाची शक्यता कमी आहे. तर पाचव्या दिवशी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
ॲडलेडमध्ये भारताची निराशाजनक कामगिरी
ॲडलेड ओव्हलवरील भारतीय संघाच्या विक्रमावर नजर टाकली तर संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकूण १३ कसोटी सामने खेळले आहेत. त्यापैकी केवळ २ सामने त्यांनी जिंकले आहेत. तर ८ सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर ३ सामने अनिर्णित राहिले. रोहित शर्मा पुन्हा एकदा ॲडलेड कसोटीत टीम इंडियाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळताना दिसणार आहे. याशिवाय शुबमन गिलही प्लेइंग ११ मध्ये पुनरागमन करणार आहे.
बुमराहला विक्रम करण्याची संधी
बुमराहने ॲडलेड कसोटी सामन्यात एक विकेट घेतल्यास तो यावर्षी एका कॅलेंडर वर्षात ५० कसोटी बळी घेईल. त्याच वेळी, त्याने तीन विकेट घेतल्यास, तो एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या यादीत झहीर खानला मागे सोडेल. झहीर खानने २००२ मध्ये एका कॅलेंडर वर्षात ५१ कसोटी विकेट घेतल्या होत्या. बुमराहने यावर्षी १० कसोटी सामन्यांमध्ये ४९ विकेट घेतल्या आहेत.एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम कपिल देव यांच्या नावावर आहे. कपिल देव यांनी १९८३ मध्ये ७५ विकेट घेतल्या होत्या. याशिवाय त्यांनी १९७९ मध्ये ७४ विकेट्सही घेतल्या होत्या. कपिल देव नंतर झहीर खान हा एका कॅलेंडर वर्षात ५० बळी घेणारा दुसरा भारतीय वेगवान गोलंदाज आहे. फिरकी गोलंदाजीमध्ये अनिल कुंबळेने एका कॅलेंडर वर्षात ७४ विकेट्स घेतल्या आहेत. अनुभवी फिरकी गोलंदाज आर अश्विनने २०१६ मध्ये ७२ विकेट घेतल्या होत्या. फिरकीपटूंमध्ये रविचंद्रन अश्विन, हरभजन सिंग, भागवत चंद्रशेखर आणि विनू मांकड यांनीही कॅलेंडर वर्षात ५० हून अधिक बळी घेतले आहेत.
आजचा सामना
भारत वि. ऑस्ट्रेलिया
वेळ : सकाळी ९.३० वा.
स्थळ : ॲडलेड ओव्हल, ॲडलेड
प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स नेटवर्क, डिझ्ने प्लस हॉटस्टार