महामार्ग निर्धोक करा !

Story: अंतरंग |
04th December, 11:38 pm
महामार्ग निर्धोक करा !

रस्ते हे दळणवळणातील महत्त्वाचे साधन. आंतरराज्य वाहन वाहतूक सुरळीत व सोयीस्कर बनावी, यासाठी प्रकर्षाने राष्ट्रीय महामार्गची निर्मिती झाली. वाहनांची वाढती संख्या, वाहन वाहतुकीची कोंडी, त्याचबरोबर वाढते अपघात यावर तोडगा म्हणून महामार्गांच्या रुंदीकरणाचा मार्ग शासनाने अवलंबला. गोव्यातील रुंदीकरणावेळी महामार्गावरील अडथळे आणि समस्यांचा विचार किंवा अभ्यास केला गेला नाही. यामुळे गोव्यात महामार्ग हा वाहन अपघातांचा सापळा ठरत आहे. परवाच करासवाडा म्हापशात महाराष्ट्रातून येणाऱ्या भरधाव कारचा अपघात घडला. यात सात प्रवासी जखमी झाले. महामार्गावर पार्क केलेल्या कंटेनरमुळे हा अपघात घडला. पूर्वीपासूनच करासवाडा येथे महामार्गाच्या बाजूने अवजड वाहने पार्क केली जायची. या ठिकाणी धाबे आणि रेस्टॉरन्ट असल्याने गोव्याबाहेरून येणाऱ्या अवजड वाहनचालकांची इथे खाण्यापिण्याची सोय होत होती.             

महामार्गाचे रुंदीकरण झाले. पण सर्व्हिस रोड अरुंद असल्यामुळे वाहनांना महामार्गाच्या बाजूला पार्किंगला पुरेशी जागा नसल्याने नाईलाजास्तव वाहन चालकांना महामार्गवरच अतिक्रमण करावे लागते. याचा अडथळा महामार्गावरील वाहतुकीला होतो. राष्ट्रीय महामार्ग बांधकाम नियमांचा देखील गोव्यासारख्या छोट्याशा राज्याला फटका बसत आहे. आवश्यक तिथे उड्डाणपुलाच्या निर्मितीसाठी हे नियम अडथळा ठरत आहेत. शिवाय गोव्यातील लोकसंख्येच्या तुलनेत वाहनांची संख्याची मोठी आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडे याविषयीचे मुद्दे ठामपणे मांडण्याची गरज आहे.              

महामार्गावरील बहुतेक अडथळेच सध्या वाहन अपघातांचे कारण ठरले आहेत. शिवाय महामार्गांच्या अलाइन्मेंटचा देखील मुद्दा आहे. महामार्ग किंवा अंतर्गत रस्त्यांवरील अडथळे दूर करण्यासाठी कोणतीही पावले उचलली जात नाहीत. गोवा हे पर्यटन क्षेत्र आहे. यामुळे मोठ्या संख्येने इथे पर्यटकांची ये-जा असते. यातील बहुतेक देशी पर्यटक हे स्वत:ची वाहने घेऊन गोव्याच्या पर्यटन दौऱ्यावर येत असतात.             

वाहन नियमांच्या नावाखाली वाहतूक पोलीस, वाहतूक खात्याचे अधिकारी या गाड्यांची अडवणूक करतात. वाढत्या अपघातांचे कारण समोर ठेऊन फक्त पर्यटकांनाच लक्ष्य बनविले जाते. यामुळे पर्यटकांची नाहक छळवणूक होते. वाहतूक पोलिसांच्या हाती चलनाची मशिने न देता वाहतूक सुरळीत कशी होईल, यासाठी पोलीस तैनात करायला हवेत. राज्यातील महामार्ग आणि रस्त्यांवरील अपघात कसे कमी होतील, याचा अभ्यास करण्यासाठी वाहतूक अधिकाऱ्यांना जुंपायला हवे.             

जर कोणी जाणूनबुजून वाहन वाहतूक नियमांचे उल्लंघन करत असेल, तर त्यांना सक्तीचा दंड द्यायलाच हवा. मात्र नियमांच्या  नावाखाली होणारी वाहनचालकांची सतावणूक कुठेतरी थांबायला हवी. वाहतुकीवर नियंत्रण मिळावे आणि वाहनचालकांना शिस्त लागावी, या उद्देशाने भारत सरकारने वाहतूक कायद्यात सुधारणा करून दंडाची रक्कम भरमसाट वाढवली आहे. तरी देखील अपघात किंवा नियमांचे उल्लंघन थांबत नाही, यावरून आपली व्यवस्थाच कुठेतरी चुकत असावी, असे वाटते. यावर सखोल अभ्यास होणे आवश्यक आहे. शिवाय महामार्गावरील अडथळे कमी होऊन वाहतूक सुरळीत कशी होईल, याचा सारासार विचारविनिमय सरकार पातळीवर होणे अपेक्षित आहे.


- उमेश झर्मेकर, गोवन वार्ता