मुंबई : येथे पोलिसांनी धडक कारवाई करत, शस्त्रे आणि तब्बल ६७ जीवंत काडतुसे घेऊन विक्रीसाठी आलेल्या तिघांना अटक केली. दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबई गुन्हे शाखेचा खंडणी विरोधी कक्ष आणि पायधुनी पोलिसांनी संयुक्त कारवाईत या आरोपींना अटक केली आहे.
याप्रकरणी अँटी एक्सॉर्शन सेलचे कॉन्स्टेबल अमोल तोडकर यांना, काही लोक बेकायदेशीररीत्या शस्त्रे आणि जिवंत काडतुसे घेऊन मुंबईत येत त्याची विक्री करणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. २८ नोव्हेंबर रोजी रात्री तिघे आरोपी पी. डीमेलो रोड, पायधुनी येथील हॉटेलजवळ शस्त्राचा सौदा करण्यासाठी जात होते.
माहिती मिळाल्यानंतर आरोपींना पकडण्यासाठी पथक तयार करण्यात आले. त्यांनी पूर्ण नियोजन करून त्यांना पकडले. या आरोपींकडून पोलिसांनी दोन पिस्तूल, एक रिव्हॉल्व्हर, तीन देशी बनावटीचे सिंगल बोअर पिस्तूल, दोन ब्लँक मॅगझिन आणि ६७ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.
याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. अभिषेक कुमार अंजनी कुमार पटेल (२६ वर्षे), सिद्धार्थ सुभाषकुमार सुमन उर्फ गोलू (२३ वर्षे) आणि रवीत रामभीकुमार मंडल (२७ वर्षे) अशी त्यांची नावे आहेत. याप्रकरणी पायधुनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास गुन्हे शाखा करत आहे.