लैंगिक अत्याचारातून १७ वर्षीय युवती गर्भवती; दोघांविरुद्ध आरोप निश्चित करण्याचा आदेश

२६ वर्षीय युवकासह पीडित युवतीच्या महिला नातेवाईकाचा समावेश

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
3 hours ago
लैंगिक अत्याचारातून १७ वर्षीय युवती गर्भवती; दोघांविरुद्ध आरोप निश्चित करण्याचा आदेश

पणजी : डिचोली तालुक्यात २०२४ मध्ये १७ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणी न्यायालयाने संशयितांविरोधात आरोप निश्चित करण्याचा आदेश दिला आहे. या प्रकरणात २६ वर्षीय युवकावर लैंगिक अत्याचाराचा, तर पीडित मुलीच्या एका महिला नातेवाईकावर संशयितासोबत कट रचून अपहरणास साथ दिल्याचा आरोप निश्चित करण्यात आला आहे. हा आदेश न्या. दुर्गा मडकईकर यांनी दिला.

या प्रकरणी पीडित १७ वर्षीय मुलीच्या वडिलांनी डिचोली पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, त्यांची मुलगी १३ मे २०२४ रोजी सकाळी ७ वाजल्यापासून बेपत्ता असल्याची माहिती तक्रारीत नमूद केली. डिचोली पोलिसांनी या संदर्भात बेपत्ता असल्याचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. याच दरम्यान पोलिसांनी मुलगी राहत असलेल्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता, ती संशयितासोबत गेल्याची माहिती समोर आली. त्यानुसार, पोलिसांनी संशयिताचा शोध सुरू केला.

२७ जानेवारी २०२५ रोजी तामिळनाडूत संशयित असल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी त्या ठिकाणी जात पीडित मुलीची सुटका केली. याच दरम्यान पीडित मुलीचा जबाब घेतला असता, तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे तसेच ती गरोदर असल्याचे समोर आले. त्यानुसार, पोलिसांनी संशयित युवकाला अटक करून कारवाई केली.

याच दरम्यान अधिक चौकशी केली असता, पीडित मुलीच्या एका महिला नातेवाईकाने संशयितासोबत तिला पळून नेण्यासाठी कट रचल्याचे समोर आले. पोलिसांनी याप्रकरणी तपास पूर्ण करून संशयित तसेच अटक न करता संबंधित महिलेविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. न्यायालयाने प्रथमदर्शनी पुराव्याची दखल घेऊन संशयितांविरोधात आरोप निश्चित करण्याचा आदेश जारी केला.

कटात मुलीची महिला नातेवाईक सहभागी

पीडित मुलीची चौकशी केली असता, तिच्या एका महिला नातेवाईकाने युवकासोबत तिला पळून नेण्यासाठी कट रचल्याचे समोर आले. पोलिसांनी याप्रकरणी तपास पूर्ण करून संशयित तसेच संबंधित महिलेविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.



हेही वाचा