महाराष्ट्र : पॉर्नोग्राफी नेटवर्क प्रकरणी ईडीची राज कुंद्राच्या घरी छापेमारी

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
29th November, 04:07 pm
महाराष्ट्र : पॉर्नोग्राफी नेटवर्क प्रकरणी ईडीची राज कुंद्राच्या घरी छापेमारी

मुंबई : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी सकाळी बॉलिवूड निर्माता राज कुंद्राच्या अनेक ठिकाणांवर छापे टाकले. हे प्रकरण पोर्नोग्राफीशी संबंधित असल्याचे समोर आले आहे. सकाळी ६ वाजल्यापासून ईडीच्या अधिकाऱ्यांनी शिल्पा शेट्टीच्या सांताक्रूझ येथील घराचीही चौकशी सुरू केली आहे. ईडीचे छापे हे  राज कुंद्रा व  त्याच्या सहकाऱ्यांच्या कथित पोर्नोग्राफी नेटवर्क आणि चॅनेलशी संबंधित आहेत.  गुन्ह्याच्या सर्व पैलूंचा सखोल तपास करता यावा यासाठी  ईडीच्या अधिकाऱ्यांनी कुंद्रा आणि त्याच्या साथीदारांच्या ठावठिकाणांवरील कागदपत्रांची तपासणी सुरू केली आहे. 

पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्राचे नाव यापूर्वीही चर्चेत आले आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी त्याला अटकही केली होती, मात्र नंतर त्याला जामीन मंजूर झाला होता. या प्रकरणात शिल्पा शेट्टीचे नावही पुढे आले होते, मात्र आतापर्यंत तिच्यावर या प्रकरणात कोणताही आरोप करण्यात आलेला नाही. पॉर्नोग्राफी प्रकरणी राज कुंद्रा आणि त्याच्या साथीदारांविरोधात ईडीच्या या छाप्याने बॉलिवूड जगतात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. या प्रकरणात अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. सध्या ईडीची टीम सर्व महत्त्वाच्या कागदपत्रांची तपासणी करत आहे.

फेब्रुवारी 2021 मध्ये मुंबई पोलिसांनी एका पॉर्न रॅकेटचा पर्दाफाश केला होता. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने फेब्रुवारीमध्ये अश्लील चित्रपट बनवून ते वेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलीस सक्रिय झाले असून विविध ठिकाणी छापे टाकत आहेत. यावेळी पोलिसांनी चौघांना अटक केली. त्यांची चौकशी केली असता राज कुंद्राचे नाव पुढे आले. त्याआधारे राज कुंद्राला अटक करण्यात आली. मॉडेल पूनम पांडे, अभिनेत्री आणि मॉडेल शर्लिन चोप्रा, अभिनेत्री सागरिका शोना सुमन यांनीही राज कुंद्रावर अनेक गंभीर आरोप केले.

पोर्नोग्राफीसाठी तुरुंगात वेळ घालवलेल्या राज कुंद्राने तिथून सुटल्यानंतर 'UT 69' नावाच्या चित्रपटात अभिनेता म्हणून काम केले. हा चित्रपट त्याने आर्थर जेलमध्ये घालवलेल्या ६९ दिवसांवर आधारित होता. म्हणजेच हा चित्रपट 'ॲडल्ट फिल्म स्कँडल'मध्ये राज कुंद्राच्या अटकेवर आधारित होता. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राचे २००९ मध्ये लग्न झाले आणि आता त्यांच्या लग्नाला १५  वर्षे झाली आहेत.

हेही वाचा