विमानाच्या महाग तिकीट दराचा पर्यटनावर परिणाम

पर्यटनाशी संबंधित घटकांनी व्यक्त केली चिंता

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
29th November, 12:03 am
विमानाच्या महाग तिकीट दराचा पर्यटनावर परिणाम

पणजी : डिसेंबर महिन्याच्या उत्तरार्धात वाढलेल्या विमानांच्या तिकिटांच्या किमतीमुळे गोव्याच्या पर्यटनावर नकारात्मक परिणाम होणार आहे. दिल्लीहून गोव्यात येणारा पर्यटक विमानांचे वाढीव भाडे पाहूनच स्वस्त विमानाने थायलंडला जाण्याचा निर्णय घेतो. दरम्यान, तिकीट दरात वाढ झाल्याचा परिणाम गोव्यातील हॉटेलांवरही झाला आहे, असे गोवा पर्यटनाशी संबंधित संघटनांनी सांगितले.
डिसेंबरमध्ये नाताळ आणि नवीन वर्षामुळे गोव्यात येणाऱ्या विमानाच्या किमतीत तिपटीने वाढ झालेली आहे. त्याशिवाय ३ ते ४ हजार रुपये अधिक खर्च केल्यास पर्यटकांना आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळांना भेट देता येणार आहे, असे वृत्त प्रसारमाध्यमात प्रसिद्ध झाल्यानंतर पर्यटकांनी ‌विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
याविषयी बोलताना स्काल इंटरनॅशनल गोवाचे सदस्य अर्न्स्ट डायस यांनी सांगितले की, विमान तिकिटाच्या दरात कमालीची वाढ झाल्याने पर्यटकांसाठी गोवा पॅकेजही महागले आहे. त्यामुळे देशी पर्यटक स्वस्त दरात आंतरराष्ट्रीय ठिकाणी जातील आणि परदेशी पर्यटक कोणत्या ठिकाणी स्वस्त दर आहेत ते पाहून त्या देशांमध्ये प्रवास करतील अशावेळी मागणी आणि पुरवठ्याचा विषय समोर येतो. जर मागणी असेल तर विमान कंपन्या त्यांच्या किमती वाढवतील तसेच हॉटेलही आपले दर वाढवतील, असे डायस म्हणाले.

दिल्लीतील पर्यटकांना गोव्यापेक्षा थायलंडला जाणे स्वस्त पडते. तेथील आकर्षक स्वस्त पर्यटन पॅकेजमुळे पर्यटक थायलंडला जाण्यास प्राधान्य देतात. गोवा हे महागडे ठिकाण बनले असून विविध बैठका, इव्हेंट आणि लग्न सोहळ्यांमध्ये घट झाली आहे. हॉटेल आणि विमानांसाठीचे परवानेही महागले असून व्याव‌सायिकांसाठी हे खूपच मारक असल्याची तक्रार डायस यांनी केली.
‌विमानाचे दर गोव्याच्या पर्यटनासाठी नकारात्मक‌

विमान तिकिटांच्या किमतीतील वाढ गोव्याच्या पर्यटनासाठी सकारात्मक बाब नाही. इतका पैसा खर्च करून काय फायदा, पर्यटक याचा प्रथम विचार करेल. तसेच इतर पर्यटन ठिकाणांच्या परिस्थितीचे आकलन करून पुढील निर्णय घेईल. थायलंड आणि मालदीवला जाणाऱ्या विमान तिकिटांचा दर स्वस्त असल्यास त्याचा गोव्याला फटका बसणार असल्याचेही जॅक सुखिजा यांनी सांगितले.

विमानाच्या किमती बाजाराच्या प्रभावावर निश्चित केल्या जातात. जर लोकांनी विमान तिकिटे खरेदी केली, तर बाजार किमतीत वाढ हाेते, अन्यथा या किमती कमी केल्या जातात. पण, एकंदरीत परिस्थिती लक्षात घेता गोव्यात या दरात खूपच वाढ झाली आहे. _जॅक सुखिजा, अध्यक्ष, टीटीजीए


हेही वाचा