भारतीय चित्रपटसृष्टीत राज कपूर यांचे योगदान अमुल्य आहे. त्यांनी आपल्या अभिनयातून आणि चित्रपटातून भारतीय चित्रपटसृष्टीला एक वेगळी ओळख दिली. त्यामुळेच त्यांना शोमॅन म्हणून ओळखले जाते. इफ्फी २०२४ च्या निमित्ताने कपूर घराण्याचा लखलखता तारा आणि राज कपूर यांचा नातू रणबीर याने आपल्या आजोबांबद्दल हर्षदा वेदपाठक यांच्याशी केलेली ही दिलखुलास बातचित...
आजोबा राज कपूर यांचा तुझ्यावर किती प्रभाव आहे?
हा प्रश्न मला नेहमीच विचारला जातो. खरे सांगायचे तर माझ्यासाठी दादू म्हणजे निळ्या डोळ्यांचे एक खास व्यक्तिमत्व होते. लहानपणी ते आम्हाला कॅरॅमल कँडीचे आमिष दाखवत. माझ्यासह सगळ्या चुलत भावांना रांगेत उभे करायचे जो कोणी ‘आवरा हू’ हे गाणे चांगल्याप्रकारे म्हणायचा त्यालाच कँडी मिळायची. आणखी एक आठवण म्हणजे, माझी आई माझ्यावर ओरडली की मी थेट माझ्या आजोबांकडे धावत जायचो आणि ते माझ्यावतीने तिला ओरडायचे. ज्यावेळी त्यांचे निधन झाले, तेव्हा मी फक्त सहा वर्षांचा होतो आणि त्या दिवशी आमचे गार्डन माणसांनी फुलून गेले होते. हे सर्व पाहिल्यावर मला जाणवले की लोकांना त्याच्याबद्दल किती आदर आणि प्रेम होते. त्या दिवशी मला जाणवले की आजोबा खूप मोठे व्यक्तिमत्व होते.
तुझे आजाेबांच्या चित्रपटाबद्दल काय मत आहे?
राज कपूर यांचे चित्रपट त्यांच्या सामाजिक समस्यांंवर भाष्य करणारे म्हणून ओळखले जातात आणि ते सामान्यांना जाणवणाऱ्या विविध समस्यांचे निराकरण करतात. त्यांच्याकडे विषय निवडण्याची अनोखी पद्धत होती. ‘आवारा’मध्ये फक्त जातीवादाचा मुद्दा होता, तर ‘श्री ४२०’ मध्ये त्यांनी वंचितांच्या संघर्षावर लक्ष केंद्रित केले. ‘राम तेरी गंगा मैली’मध्ये, स्रीच्या व्यक्तिमत्वाच्या शुद्धतेचे आणि पवित्रतेचे दर्शन त्यांनी घडवले होते. त्यांच्या चित्रपटामध्ये समाजाची गडद बाजू देखील दिसते. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे ५० वर्षांपूर्वी बनलेल्या चित्रपटांमध्येही, राज कपूर यांनी जे कथानक मांडले ते आजच्या पिढीलाही प्रेरित करणारे आहे, तसेच वर्तमान समस्यांशी निगडीत आहे.
त्यांच्या कोणत्या चित्रपटांचा तुझ्यावर सर्वाधिक प्रभाव आहे?
‘श्री ४२०!’ या चित्रपटाने भारतीय चित्रपट सृष्टीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. त्यामुळे राज कपूर यांची प्रसिद्धी सातासमुद्रांच्या पार गेली. त्यामुळे हा चित्रपट माझ्यासाठी खास आहे. दुसरा चित्रपट म्हणजे ‘जागते रहो’ ज्याचे त्याने दिग्दर्शन त्यांनी केले नाही. पण निर्मिती त्यांनी केली होती. त्यात त्यांनी अभिनय केला होता. मी त्यांचे सर्व चित्रपट पाहिले आहेत. पण ‘जागते रहो’मधील त्यांचा अभिनय अप्रतिम आहे. त्यामुळे ‘जागते रहो’ आणि ‘श्री ४२०’ हे दोन्ही चित्रपट माझ्यासाठी खास आहेत.
तुला आजोबांप्रमाणे दिग्दर्शन करायला आवडेल का?
हो, नक्कीच! मला आठवते की मी जेव्हा फिल्म स्कूलमध्ये होतो, तेव्हा आम्हाला शॉर्टफिल्म बनविण्यास सांगितले होते. मी एका शॉर्ट फिल्म बनवली. पण ती खूपच खराब बनली. आजोबा एक उत्कृष्ट दिग्दर्शक होते. त्यांना ती शॉर्टफिल्म दाखविण्याचे मला धाडस झाले नाही. आता मी ४२ वर्षांचा आहे, तरीही मला आणखी एक शॉट बनविण्याचे धैर्य होत नाही. पण मी अशा कुटुंबातून आलो आहे, ज्या कुटुंबाने या फिल्मसृष्टीला दिग्गज दिग्दर्शक तसेच अभिनेते दिलेले आहेत. त्यामुळे मला या दिग्दर्शनाकडे वळताना योग्य विचार करूनच पाऊल उचलावे लागेल. मी खूप चांगल्या दिग्दर्शकांसोबत काम केले आहे. त्यांची मेहनत पाहून समजते हे किती कठिण आणि मेहनतीचे काम आहे. राज कपूर त्यांच्या चित्रपटांमध्ये जोखीम पत्करण्यासाठी ओळखले जात होते. ते सहसा अपारंपरिक कथा किंवा भावनिक किंवा सामाजिक स्तरावर भाष्य करणाऱ्या थीम निवडत. जसा माझा बर्फी चित्रपट! आणि वेक अप सिद. ही दोन्ही वैशिष्ट्यपूर्ण पात्रे आहेत. ते स्वत:चा शोध घेतात. म्हणूनच कदाचित तुम्ही त्यांच्याशी कनेक्ट होतात.
राज कपूर यांच्या चित्रपटातील संगीत नेहमीच अप्रतिम असायचे, त्यांनी या बॉलीवूडला अनेक एव्हरग्रीन गाणी दिली. याबद्दल काय म्हणशील?
दादूंनी लता मंगेशकर आणि शंकर जयकिशन यांसारख्या महान कलाकारांसोबत काम केले. तो काळ खरोखरच खास होता. त्यांचे संगीत केवळ गाणी तयार करण्यापुरते मर्यादीत नव्हते, ते सखोल भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणारे, समाजाला आरसा दाखविणे उत्कृष्ट नमुने होते. लता मंगेशकर यांचा आवाज, शंकर जयकिशन यांच्या रचना आणि त्यांनी एकत्र काम करण्याची पद्धत हे केवळ व्यावसायिक यश नव्हते, तर त्या अद्भूत कलाकृती होत्या. आज, अनेक प्रतिभावान संगीतकार जुन्या गाण्यांचा वापर करतात. जुन्या गाण्यांचे पुनरुज्जीवन करणे चुकीचे आहे. कारण त्या रचना वर्षानुवर्षे आपल्या संस्कृतीत रुजलेल्या आहेत. आज संगीताला केवळ मनोरंजन म्हणून पाहिले जाते. त्यांचे सांस्कृतिक योगदान काही नाही, त्यामुळे प्रेक्षक, श्रोते ते काही काळानंतर विसरून जातात.
तुझे आजोबा जेवणाचे शौकीन होते. तुला पण असा शौक आहे का?
मी याबाबतीत आजोबांवरच गेलो आहे. पण मी अशा ठिकाणी काम करत आहे. जेथे फिट दिसणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या जीबेवर नियंत्रण ठेवावे लागते. माझी आई मला कधीही अशा गोष्टी खाऊ देत नाही, ज्याने माझे वजन वाढू शकते. तिने माझ्या डोक्यात हे घालून दिले आहे की, तू नेहमी फिट दिसला पाहिजेस आणि निरोगी राहिला पाहिजेस. मला आठवते, एकदा दादूंनी सगळ्यांना सांगितले की, मला डाएट करायची आहे. मला फक्त डाएट फूडच द्या. त्यावेळी मुघल-ए-आझमची शुटिंंग सुरू होती. त्यावेळी दादूंंना सेटवर एकाने सॅलेड आणून दिले. त्यावेळी त्यांनी म्हटले माझ्याने नाही होणार डाएट, माझे नेहमीचेच जेवण आणा आणि डाएटचा विषय तेथेच संंपला.
राज कपूर यांंचे चित्रपट तू दिग्दर्शित केले असतेस, तर काय झाले असते?
मला वाटते की मी त्यांंचे सर्व चित्रपट माझ्या पद्धतीने दिग्दर्शित केले असते तर ते खूपच वाईट बनले असते. जर मला त्यांंचा कोणता चित्रपट रिमेक करायचा असेल, असे तुम्ही विचाराल, तर मी सांंगेन की माझा रिमेकवर विश्वास नाही. कारण चित्रपट त्याच्या क्षमतेनुसार आधीच उत्कृष्ट बनवला गेला आहे. त्याच्याशी छेडछाड करणे चुकीचे आहे आणि जर मला दादूंंचे कोणते पात्र करायला आवडेल, असे तुम्ही विचाराल तर ते ‘श्री ४२०’चे असेल.
अभिनेता खोटे बोलणारा असतो, असे म्हटले जाते. तुझे यावर काय मत?
मी हे विधान खूप ऐकले आहे की, जर तुम्ही खोटे बोलू शकत असाल तर तुम्ही अभिनय करू शकता. पण अभिनय करणे हे खोटे आहे, असे मला वाटत नाही. कारण तुम्ही खरे नसाल किंवा तुमच्या पात्राशी एकनिष्ठ नसाल, तर तुम्ही अभिनय करू शकत नाही. म्हणून मी त्या विधानाचे समर्थन करत नाही. पण सत्य हे आहे की, अभिनय करणे इतके कठीण काम नाही. आज अनेक चांगल्या संस्था आहेत, ज्या चांंगले अभिनेते, अभिनेत्री घडवतात. तुम्ही दिसायला जरी चांंगले नसाल, तरी तुम्ही तुमच्या अभिनयाच्या जोरावर या इंंडस्ट्रीजमध्ये आपले स्थान निर्माण करू शकता.
आरकेसोबतची तुमच्या बालपणीची एक न ऐकलेली गोष्ट सांंगशिल?
अशा बऱ्याच गोष्टी आहेत. मला आठवते चेंबूरला मोठमोठ्या पार्ट्या व्हायच्या. तिथे एक मोठी बाग होती. जिथे मी एकदा अनवाणी खेळत होतो. त्यावेळी मला लाल मुंग्या चावल्या. मी वेदनेने कळवळत,ओरडत होतो. पण, त्यावेळी काेणाचाच माझ्याकडे लक्ष नव्हता. पण दादूंनी ते पाहिले. ते धावत माझ्यापाशी आले आणि मला उचलून घेतले आणि माझे पाय धुतले, तो क्षण मी अजूनही विसरलो नाही.
एक अभिनेता म्हणून आरकेकडून तुम्ही काय शिकला?
मी इथे प्रामाणिकपणे सांगू इच्छितो की, मी अभिनयापेक्षा दिग्दर्शक म्हणून आरकेंचा मोठा चाहता आहे. अभिनयासाठी मी माझ्या वडिलांचा चाहता आहे. पण एक दिग्दर्शक म्हणून त्यांच्या नजरेत जे सत्य आणि प्रामाणिकपणा होता, तो एक अभिनेता या नात्याने आणणे खूप कठीण आहे, असे मला वाटते.
तुझा कोणता एक चित्रपट तू आरके आणि तुझ्या वडिलांना दाखवला असतास?
मी केलेल्या चित्रपटांपैकी ‘बर्फी’चे पात्र हे आरकेंपासून खूप प्रेरित आहे. त्यामुळे मला त्यांंना ‘बर्फी’ चित्रपट दाखवायला आवडला असता आणि त्यावर त्यांच्याशी चर्चा करायला आवडली असती. माझ्या वडिलांबद्दल सांंगायचे तर, मला आठवते जेव्हा ‘रॉक स्टार’ रिलीज झाला तेव्हा त्यांनी मला फोन केला आणि विचारले. तू का म्हणून हा चित्रपट केलास, या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे नव्हते. माझे अनेक चित्रपट हे त्यांंना आवडले नव्हते.
तुला आरकेंच्या बायोपिकमध्ये भूमिका करायची संंधी मिळाली तर?
जर मला ती संधी मिळाली तर मी ते आनंंदाने करणार. त्यांचे जीवनचरित्र खूपच प्रेरणादायी आहे. ती केवळ त्यांंच्या यशावर प्रकाश टाकणारी गोष्ट नाही, तर त्यांंनी केलेला संघर्षही खूप महत्त्वाचा आहे. लीजंडरी आरकेवर एक डॉक्युमेंटरी बनवण्यापूर्वी, मला माझ्या कुटुंबाला विचारावे लागेल, त्यानंंतरच त्यावर काम करावे लागेल. मला हे सांगताना आनंंद होत आहे की, आरके यांचे १० चित्रपट आम्ही पुन्हा प्रदर्शित करणार आहोत. १३, १४ आणि १५ डिसेंबर रोजी आम्ही त्यांचे चित्रपट प्रदर्शित करत आहोत. त्यामुळे सर्वांनी कृपया ते पाहावे, ही विनंती. मला आठवते की मी आलियाला भेटलो, तेव्हा तिने मला विचारले होते की, किशोर कुमार कोण होते? सध्याची पिढी जुन्या कलाकृती विसरत चालली आहे. त्यामुळे हे एव्हरग्रीन चित्रपट त्यांंनी पाहणे गरजेचे आहे. आजच्या पिढीला आरके कोण होते, याची जाण असणे आवश्यक आहे.