भारताच्या माजी कर्णधार सौरव गांगुली यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'कोलकात्याचा राजकुमार' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गांगुली यांच्या नेतृत्वगुणांमुळे त्यांनी भारतीय क्रिकेटवर अमीट छाप उमटवली आहे. आता त्यांची संघर्षमय आणि प्रेरणादायी कहाणी रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.
एका मुलाखतीत अभिनेता राजकुमार रावने अधिकृतपणे जाहीर केले की तो सौरव गांगुली यांच्या बायोपिकमध्ये त्यांची भूमिका साकारणार आहे. आता खुद्द दादांनी सांगितले आहे, तर मीही सांगतो, हो, मी त्यांच्या बायोपिकमध्ये काम करतोय, असे राव म्हणाला. थोडी भीती वाटतेय, पण ही मोठी जबाबदारी असूनही मजा येणार आहे, असेही त्याने नमूद केले.
हा चित्रपट विक्रमादित्य मोटवानी दिग्दर्शित करणार असून, लव्ह फिल्म यांची निर्मिती आहे. चित्रपटाचे शूटिंग जानेवारी २०२६ मध्ये सुरू होणार असून, डिसेंबर २०२६ मध्ये चित्रपटगृहात प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. चित्रपटाचे शीर्षक अद्याप निश्चित झालेले नाही.
ही पहिली वेळ नाही की राजकुमार राव प्रत्यक्ष व्यक्तीच्या भूमिकेत झळकणार आहे. २०१३ मध्ये आलेल्या ‘शाहीद’ या चित्रपटात त्यांनी मानवाधिकार वकिल शाहीद आझमी यांची भूमिका साकारून राष्ट्रीय पुरस्कार मिळवला होता. त्यानंतर २०१७ मध्ये ‘ओमेर्ता’ मध्ये दहशतवादी अहमद ओमार शेख याची भूमिका केली होती. नुकताच २०२४ मध्ये आलेल्या ‘श्रीकांत’ या बायोपिकमध्ये त्याने दृष्टिहीन उद्योजक श्रीकांत बोळ्ला यांची भूमिका साकारली होती.
सौरव गांगुली यांनी १९९२ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. मात्र, १९९६ च्या इंग्लंड दौऱ्यात लॉर्ड्सवरील त्यांच्या कसोटी पदार्पणातील शतकाने त्यांना खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. त्यांनी भारतासाठी ११३ टेस्ट आणि ३११ वनडे सामने खेळले.
२००० मध्ये भारताचा कर्णधार म्हणून निवड झाल्यावर, गांगुली यांच्या नेतृत्वाखाली भारताने २००३ वर्ल्ड कपचा अंतिम सामना गाठला आणि २००२ मध्ये नॅटवेस्ट ट्रॉफी आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. निवृत्तीनंतर, गांगुली यांनी प्रशासकीय भूमिकेत काम सुरू ठेवले. ते क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल (सीबीए) चे अध्यक्ष होते आणि २०१९ मध्ये बीसीसीआयचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी कार्यभार सांभाळला.