मुख्यमंत्र्यांचा पालकांना सल्ला ‘हुप्पा हुय्या’ महाचित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण थाटात
विजेत्यांसोबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत. राज्य निवडणूक आयुक्त दौलत हवालदार, शिक्षण संचालक शैलेश झिंगडे, बँक ऑफ महाराष्ट्राचे क्षेत्रीय व्यवस्थापक आनंद डिंगणकर, ‘द गोवन’चे संपादक ज्योएल आफान्सो आणि दै. ‘गोवन वार्ता’चे संपादक पांडुरंग गावकर. नारायण पिसुर्लेकर
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : नोकरी वा व्यवसायामुळे मुलांकडे लक्ष देणे पालकांना शक्य होत नाही. मुलांमधील कला-गुणांना वाव देण्यासाठी पालकांनी मुलांना पुरेसा वेळ दिला पाहिजे. विविध स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी त्याला प्रोत्साहन दिले पाहिजे. मोबाईल, टीव्ही यामध्ये गुरफटलेल्या मुलांना वेगळे, नवीन करण्याची उमेदच राहिलेली नाही. त्यांना दिशा देण्याचे काम शिक्षकांसह पालकांनीही केले पाहिजे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
दै. गोवन वार्ताच्या ‘हुप्पा हुय्या’ बालविशेषांकातर्फे इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी महाचित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील विजेत्यांना मंगळवारी पणजी येथील इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा सभागृहात बक्षिसांचे वितरण करण्यात आले. या सोहळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर मुख्यमंत्र्यांसह राज्य निवडणूक आयुक्त दौलत हवालदार, शिक्षण संचालक शैलेश झिंगडे, बँक ऑफ महाराष्ट्राचे क्षेत्रीय व्यवस्थापक आनंद डिंगणकर, ‘द गोवन’चे संपादक ज्योएल आफाेन्सो आणि दै. ‘गोवन वार्ता’चे संपादक पांडुरंग गावकर उपस्थित होते. स्पर्धेतील तीन निवडक चित्रे फ्रेम करून मान्यवरांना भेट देण्यात आली.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, मुुलांमधील कला-गुणांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने महाचित्रकला स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल दै. गाेवन वार्ता आणि अशा उपक्रमाला आर्थिक साहाय्य करणारी बँक ऑफ महाराष्ट्र दोघेही कौतुकास पात्र आहेत. राज्य निवडणूक आयुक्त दौलत हवालदार म्हणाले, तरुणांमध्ये कलाविषयीची आवड कमी होत आहे. गोव्यात इफ्फी आणि सेरेंडिपिटी हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील महोत्सव आयोजित केले जातात. या महोत्सवात सहभाग घेऊन सर्वोत्कृष्ट कलाकारांची कला अभ्यासली पाहिजे.
या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे रोख १० हजार रुपयांचे बक्षीस जी. एस. आमोणकर विद्यामंदिरचा विद्यार्थी विराज जाधव याने पटकावले. द्वितीय क्रमांकाचे रोख ७ हजार रुपयांचे पारितोषिक शिरवई केपे येथील सरकारी प्राथमिक शाळेचा विद्यार्थी नीरज पाटील याने, तर तृतीय क्रमांकाचे रोख ५ हजार रुपयांचे पारितोषिक मडगाव येथील विद्याभुवन कोकणी शाळेची विद्यार्थिनी अवनी नाईक हिने पटकावले. याशिवाय बारा तालुक्यांतून प्रत्येकी एक विद्यार्थी, परीक्षकांनी शिफारस केलेल्या तीन विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले.
परीक्षक रदिमा जोगळे, वृषाली मेथा आणि नारायण पिसुर्लेकर, तसेच ‘हुप्पा हुय्या’च्या संपादकीय विभागात महत्त्वाची भूमिका पार पाडलेल्या स्नेहा सुतार यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरवण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दै. गाेवन वार्ताचे मुख्य प्रतिनिधी सिद्धार्थ कांबळे आणि वृत्तसंपादक सचिन खुटवळकर यांनी केले.
विराजला व्हायचे आहे कलाकार !
महाचित्रकला स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे बक्षीस स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर आलेल्या विराज जाधव याला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ‘तुला मोठेपणी काय व्हायचे आहे’, असे विचारले. यावर विराजने उत्तर दिले, ‘‘मला कलाकार व्हायचे आहे.’’ याबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या आणि त्याचे कौतुकही केले.
वाचनाची गोडी वाढवण्यासाठीच ‘हुप्पा हुय्या’ची निर्मिती
‘हुप्पा हुय्या’चा प्रवास विशद करताना संपादक पांडुरंग गावकर म्हणाले, गोव्यात खास मुलांसाठी प्रसिद्ध होणारा ‘हुप्पा हुय्या’ हा एकमेव बाल विशेषांक आहे. मोबाईल, टीव्ही यात वेळ घालवण्याचे मुुलांचे प्रमाण वाढले आहे. यातून मुलांना बाहेर काढून त्यांच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, या हेतूने आम्ही दरवर्षी बालदिनाचे औचित्य साधून ‘हुप्पा हुय्या’ विशेषांक प्रसिद्ध करत आहोत. दै. ‘गोवन वार्ता’च्या रविवारच्या ‘तरंग’ पुरवणीत हुप्पा हुय्यासाठी एक पानही दिले आहे. यंदाचा ‘हुप्पा हुय्या’चा तिसरा विशेषांक आहे. याला उत्तम प्रतिसाद लाभत आहे. मुलांच्या चित्रकलेला प्राेत्साहन देण्याच्या हेतूने यंदा महाचित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. राज्यभरातून २२० मुलांनी या स्पर्धेसाठी आपली चित्रे पाठवली होती. मुलांमधील कला-गुणांना वाव देण्यासाठी यापुढेही आमचे प्रयत्न सुरूच राहतील.