व्हेंझी व्हिएगस विदेशात; क्रूज सिल्वा अन्य कार्यक्रमात
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : आम आदमी पक्षाचा स्थापना दिनाचा कार्यक्रम सोमवारी मडगाव येथे पार पडला. या कार्यक्रमाला पक्षाचे दोन्ही आमदार उपस्थित नव्हते. दोन्ही आमदारांची अनुपस्थिती कार्यकर्ते व राजकीय जाणकारांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. स्थापना दिवस कार्यक्रमाचे आयोजन तसेच अन्य गोष्टींमध्ये आमदारांना विश्वासात घेतले जात नसल्याचा हा परिणाम असल्याचीही चर्चा आहे.
राज्यात नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक केली जात असल्याची प्रकरणे गाजत आहेत. याशिवाय अधिक व्याज देण्याचे आमिष दाखवूनही लोकांची फसवणूक झाली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने ऐतिहासिक विजय नोंदवल्याने काँग्रेससह इतर विरोधी पक्षांमध्ये अस्वस्थता आहे. या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाचा स्थापना दिवस सोमवारी मडगावातील गोमंत विद्या निकेतनमध्ये साजरा करण्यात आला. राज्याचे समन्वयक अॅड. अमित पालेकर व मोठ्या संख्येने कार्यकर्ते कार्यक्रमाला उपस्थित होते. बाणावलीचे आमदार व्हेंझी व्हिएगस व वेळ्ळीचे आमदार क्रूज सिल्वा दोघेही अनुपस्थित होते. यामुळे आम आदमी पक्षातही सर्व काही सुखरूप नसल्याचे संकेत मिळत आहेत. आमदार व्हेंझी व्हिएगस विदेशात असल्याने ते उपस्थित राहू शकले नाहीत. आमदार क्रूज सिल्वा चिंचिणी येथील एका कार्यक्रमाला उपस्थित होते. स्थापना दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावणे त्यांना शक्य होते. तरीही त्यांनी दांडी मारली, याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
वैयक्तिक महत्त्वाच्या कामासाठी मी विदेशात गेलो होतो. रविवारी रात्री उशिरा मी गोव्यात पोहोचलो. गोव्यात नसल्याने स्थापना दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकलो नाही. तशी कल्पना मी पक्षाच्या नेत्यांना दिली होती.
_ व्हेंझी व्हिएगस, आमदार, बाणावली
कार्यक्रम पुढे ढकलणे शक्य नव्हते : अॅड. पालेकर
याविषयी ‘आप’चे राज्याचे समन्वयक अॅड. अमित पालेकर म्हणाले, पक्षाचा स्थापना दिवस २६ नोव्हेंबर रोजी आहे. मात्र महत्त्वाच्या कामानिमित्त मला २६ रोजी दिल्लीत जावे लागणार होते. त्यामुळे स्थापना दिवसाचा कार्यक्रम एक दिवस अगोदर, म्हणजे २५ रोजी घेण्यात आला. १४ मतदारसंघांत युवा संघटकांची नेमणूक करायची होती. कार्यक्रमाची सर्व तयारीही झाली होती. अशा स्थितीत रविवारचा कार्यक्रम आमदारांसाठी पुढे ढकलणे शक्य नव्हते. काही पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे दोन्ही आमदार उपस्थित राहू शकले नाहीत.
...
चिंचिणी येथील माऊंट मेरी उच्च माध्यमिक विद्यालयाचा वार्षिक क्रीडा मेळावा एक महिना अगोदरच ठरला होता. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून येण्याचा शब्द मी दिला होता. माझ्याच मतदारसंघात कार्यक्रम असल्याने मला तेथे जाणे भाग होते. त्यामुळे मला स्थापना दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहता आले नाही.
_ क्रूज सिल्वा, आमदार, वेळ्ळी