दयानंद सोपटे, दामू नाईक यांची नावेही चर्चेत
प्रतिनिधी। गोवन वार्ता
देशासह राज्यात भाजपची सदस्य नोंदणी मोहीम सुरू आहे. पक्षाने ४ लाख सदस्य नोंदणी करण्याचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. संघटनात्मक निवडणूक प्रक्रिया आता सुरू होईल. डिसेंबरअखेर किंवा जानेवारी सुरुवातीला नव्या प्रदेशाध्यक्षांची निवड होईल, असे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी सांगितले.
पणजी : भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी माजी मंत्री दिलीप परुळेकर आणि माजी खासदार अॅड. नरेंद्र सावईकर यांची नावे आघाडीवर आहेत. परुळेकर, अॅड. सावईकर यांच्यासह माजी आमदार दयानंद सोपटे आणि दामू नाईक यांच्या नावाबाबतही चर्चा सुरू आहे. डिसेंबर अखेरीस वा जानेवारीच्या सुरुवातीला नव्या प्रदेशाध्यक्षांची निवड होणार आहे. चर्चेत असलेल्यांपैकी एकानेही यापूर्वी प्रदेशाध्यक्षपद भूषवलेले नाही.
येत्या २९ नोव्हेंबरला मार्गदर्शनपर कार्यशाळा आयोजित केली आहे. राष्ट्रीय पदाधिकारी रेखा वर्मा आणि राज्याचे प्रभारी आशिष सूद कार्यशाळेला मार्गदर्शन करतील. या कार्यशाळेत निवडणूक कार्यक्रम निश्चित होईल. राष्ट्रीय स्तरावर संघटनात्मक निवडणुकीची प्रक्रिया जानेवारीपर्यंत पूर्ण होईल. गोव्यात ती डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. रविवारी पक्षाच्या बैठकीत बूथस्तरावरील निवडणूक प्रक्रियेबाबत चर्चा झाली. बूथ समित्यांची निवड झाल्यानंतर अन्य समित्यांची निवड होईल. शेवटी प्रदेशाध्यक्षांचे नाव जाहीर केले जाईल, अशी माहितीही सूत्रांनी दिली.
प्रदेशाध्यक्षपदासाठी मी इच्छुक आहे. प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे आणि पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मी तसा प्रस्ताव मांडला आहे.मागील विधानसभा निवडणुकीत मला उमेदवारी मिळाली नव्हती. तरीही मी पक्षाशी एकनिष्ठ राहिलो, बंडखोरी केली नाही.
_ दिलीप परुळेकर, माजी मंत्री
बऱ्याच वर्षांपासून मी भारतीय जनता पक्षाचे कार्य करत आहे. प्रदेशाध्यक्षपदाबाबत पक्षाचे वरिष्ठ नेते निर्णय घेत असतात. अद्याप तसा विचार सुरू झालेला नाही. पक्षाने जबाबदारी दिल्यास मी स्वीकारण्यास तयार आहे.
_ अॅड. नरेंद्र सावईकर, माजी खासदार
पक्षाशी एकनिष्ठ आणि कार्यक्षम व्यक्तीची निवड प्रदेशाध्यक्षपदावर झाली पाहिजे. पक्ष देईल ती जबाबदारी मी पूर्ण क्षमतेने पार पाडली आहे. प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिल्यास मी त्यालाही न्याय देण्याचा प्रयत्न करेन.
_ दयानंद सोपटे, माजी आमदार