वृद्ध खातेदारांना लाखोंना लुबाडल्याचा आरोप
प्रतिनिधी। गोवन वार्ता
सांगे : आठवड्यापूर्वी कुडचडे येथील एका राष्ट्रीयकृत बँकेतील महिला कर्मचाऱ्याने ज्येष्ठ नागरिकांना लाखो रुपयांना फसवल्याचे प्रकरण उजेडात आले होते. या प्रकरणी कुडचडे पोलिसांनी सोमवारी संशयित तन्वी वस्त हिला अटक केली. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक तुकाराम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. सुरुवातीला दुर्लक्ष केल्यानंतर अखेर पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
मागील सोमवारी बँकेत खाते असलेले काही ज्येष्ठ नागरिक फसवणूक झाल्याची तक्रार घेऊन कुडचडे पोलीस स्थानकात आले होते. सुरुवातीला पोलिसांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले होते. याबाबत जनतेतून संताप व्यक्त होत होता. दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक सुनीता सावंत यांनी आदेश जारी करून पोलीस निरीक्षक वैभव नाईक यांना दक्षिण गोवा राखीव पोलीस दलात पाठवले. त्यांच्या जागी तुकाराम चव्हाण यांची नियुक्ती केली. त्यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेऊन कारवाईचा बडगा उगारला. संशयित तन्वी वस्त हिच्याविरोधात गुन्हा दाखल करून तिला अटक केली.
कुडचडे येथील राष्ट्रीयकृत बँकेत तन्वी वस्त व्हिजन इंडिया सर्व्हिसेस प्रा. लिमिटेडची स्वयंसेवक म्हणून काम करत होती. तिने बँकेत खाते असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना लाखो रुपयांचा गंडा घातला होता. गेल्या सोमवारी पीडितांनी पोलिसांत तक्रार दिली होती. मात्र त्यावर आठ दिवस मंद गतीने कार्यवाही सुरू होती. अखेर आठ दिवसांनंतर तन्वीच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आणि तिला अटक करण्यात आली.