विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घातल्याचा ठपका
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : चरावणे धबधब्यावर नेऊन विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घातल्याबद्दल शिवोलीतील सेंट फ्रान्सिस झेवियर उच्च माध्यमिक विद्यालयाच्या व्यवस्थापनाला शिक्षण खात्याने ‘कारणे दाखवा’ नोटीस जारी केली आहे. स्पष्टीकरण देण्यास व्यवस्थापनाला ७ दिवसांची मुदत दिली आहे. विद्यालयाचे विद्यार्थी व काही शिक्षक २३ सप्टेंबर रोजी चरावणे धबधब्यावर अडकले होते.
गोवा विद्यालय शिक्षण नियम १९८६च्या नियम ४३ व ५६ अंतर्गत ३७ (६), ५६ (ऐ), ५६ (बी) व ५६ (सी) खाली ही नोटीस दिली आहे. हवामान खात्याची अतिपावसाची सूचना असताना व कोणत्याही सरकारी यंत्रणांना माहिती न देता पर्यावरणीय सहल व स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्याचा हेतू कोणता होता? जाणूनबुजून विद्यार्थी व शिक्षकांचा जीव धोक्यात घालण्याचाच हा प्रकार होता, असा निष्कर्ष काढत शिक्षण संचालकांनी व्यवस्थापनाला नोटीस बजावली आहे.
पावसामुळे धबधब्यावरील पाण्याची पातळी वाढली व सहलीला गेलेले ४७ विद्यार्थी, ५ शिक्षक अडकून पडले होते. अग्निशमन दल व वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी अडकलेले विद्यार्थी व शिक्षकांची सुटका केली होती. व्यवस्थापनाने ३० सप्टेंबर २०२४ रोजी पत्र लिहून उत्तरासाठी एक आठवड्याचा वेळ मागितला होता. व्यवस्थापनाने सहलीची माहिती सरकारी यंत्रणाना दिली होती का, याचा खुलासा केलेला नाही. व्यवस्थापनाच्या उत्तराला शिक्षण खात्याने आक्षेप घेतला आहे.
व्यवस्थापनाकडून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष
सहल तथा स्वच्छता मोहिमेला मान्यता देण्यापूर्वी आवश्यक सुरक्षेची काळजी व्यवस्थापनाने घेतलेली नाही. खात्याच्या परिपत्रकानुसार, सुरक्षेची काळजी घेणे बंधनकारक असते. मदत कार्यासाठी अग्निशमन दल, वन खात्याचे आभार मानण्याऐवजी श्रेय उपटण्याचा प्रयत्न यंत्रणानी केला, असा उल्लेख पत्रात आहे. सरकारी यंत्रणांना दोष देणे नीतीमत्तेला धरून नाही, असे शिक्षण खात्याने ‘कारणे दाखवा’ नोटिसीत म्हटले आहे.