ज्येष्ठांची फसवणूक : यापूर्वी मुख्य आरोपी तन्वी वस्त गजाआड
बँकेचे व्यवस्थापक आनंद जाधव यांना न्यायालयात नेताना पेलीस.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
सांगे : कुडचडेतील राष्ट्रीयीकृत बँकेत गैरव्यवहार केल्याप्रकरणी मुख्य आरोपी तन्वी वस्तला अटक केल्यानंतर रात्री उशिरा तन्वीचा या फसवणुकीतील मदतनीस बँकेचे व्यवस्थापक आनंद जाधव यांनाही पोलिसांनी अटक केली.
आठवड्यापूर्वी कुडचडे येथे ज्येष्ठ नागरिकांना लाखो रुपयांना फसवल्याचे प्रकरण उजेडात आले होते. पोलिसांनी सुरुवातीला या प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याने लोकांमध्ये संतापाचे वातावरण होते. पोलीस निरीक्षक वैभव नाईक यांच्या जागी तुकाराम चव्हाण यांची नियुक्ती केल्यानंतर या प्रकरणाच्या तपासाला गती मिळाली. यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंद करून मुख्य आरोपी तन्वी वस्तला अटक केली. तन्वीने काही ज्येष्ठ नागरिक खातेदारांना सुमारे सव्वा कोटी रुपयांना फसवल्याचा आरोप आहे. तन्वीला मदत केल्याचा आरोप असल्याने बँकेचे व्यवस्थापक आनंद जाधव यांनाही मंगळवारी पोलिसांनी अटक केली.
कुडचडेतील ज्येष्ठ नागरिकांना न्याय मिळावा, अशी मागणी जनतेतून होत होती. याची दखल घेऊन कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल यांनी या प्रकरणाबाबत कुडचडे पोलीस स्थानकात जाऊन निरीक्षक तुकाराम चव्हाण यांच्याकडून कारवाईची माहिती घेतली. या प्रकरणातील दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची सूचनाही पोलिसांना केली.
राष्ट्रीयीकृत बँकेत लोक विश्वासाने पैसे ठेवत असतात. बँकेशी संबंधित लोकांनीच खातेदारांना फसवणे, ही गंभीर बाब आहे. अशा प्रकरणा फसवणूक झालेल्या पीडित लोकांनी पुढे येऊन पोलिसांत तक्रार दिली पाहिजे. दोषींवर कठोर कारवाई होण्यासाठी पाठपुरावा केला जाईल.
_ नीलेश काब्राल, आमदार, कुडचडे