पर्यटकांना फटका - नाताळ, नववर्षाच्या पार्श्वभूमीवर किमती झाल्या तिप्पट
पणजी : डिसेंबरमध्ये गोव्याला येणाऱ्या विमानांच्या तिकिटांच्या दरात कमालीची वाढ झाली आहे. नाताळ आणि नवीन वर्ष साजरे करण्यासाठी अनेक पर्यटक गोव्यात येतात, पण दिल्ली आणि मुंबईच्या विमानाचे तिकीट ७ हजार ते १० हजार रुपये झाले आहे. आणखी दोन-तीन हजार खर्च केल्यास श्रीलंका, मालदीवसारख्या आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळांची तिकिटे मिळू शकतील, असे पर्यटन क्षेत्रातील सूत्रांनी सांगितले.
गोव्यात पर्यटन हंगाम सुरू झाला आहे. डिसेंबर महिना म्हणजे पर्यटकांचा महिना मानला जातो. वर्षाच्या अखेरीस नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी देशभरातील पर्यटक गोव्याला भेट देतात. उत्तर गोव्यातील समुद्रकिनारे ख्रिसमस आणि नवीन वर्षात पर्यटकांनी भरून जातात. या पार्श्वभूमीवर २२ ते ३१ डिसेंबरच्या वीकेंडसाठी फ्लाइटच्या दरात वाढ करण्यात आली आहे. हे दर नेहमीच्या दरापेक्षा तिप्पट आहेत. दिल्ली-गोवा फ्लाइटच्या तिकिटांचे दर ७ हजार रुपयांवरून १० हजार रुपयांपर्यंत वाढले आहेत. इतर दिवशी या तिकीटाची किंमत ४ हजार रुपये असते. त्याचप्रमाणे मुंबई ते गोवा फ्लाइट तिकीट ७ ते १० हजार रुपयांपर्यंत वाढले आहे, तर इतर दिवशी ते २ ते ४ हजार रुपयांपर्यंत असते. बंगळुरू ते गोवा तिकिटांचे दरही ६ ते १० हजार रुपयांवर गेले आहेत. इतर दिवशी २,५०० ते ४ हजार रुपयांच्या दरम्यान असते. हैदराबाद ते गोवा फ्लाइटचे दर ९ ते ११ हजार रुपयांपर्यंत वाढले आहेत. इतर दिवशी ते २ ते ४ हजार रुपयांपर्यंत असते. तर कोलकाता ते गोवा फ्लाइटच्या किमती १० हजार रुपयांवरून १३ हजार रुपयांपर्यंत वाढल्या आहेत. इतर दिवशी हे दर ४ ते ६ हजार रुपयांपर्यंत असतात. गोवा ते बंगळुरूसाठी ४ ते ७ हजार रुपये, गोवा ते मुंबई ५ ते ७ हजार रुपये आणि गोवा ते दिल्ली ७ ते १० हजार रुपये सध्या भाडे आहे. विमानाने गोव्यात येणे चांगलेच खर्चिक झाले आहे.
अलीकडेच एक अफवा पसरली होती की भारतातील लोक गोव्याऐवजी दक्षिण-पश्चिम आशियाई देशांना भेट देण्यास प्राधान्य देतात. कारण जास्त विमान भाडे तसेच हॉटेलचे दर त्यांना परवडत नाहीत. १० ते १५ हजार रुपयांपर्यंतच्या तिकिटांसह तुम्ही इतर देशांमध्ये जाऊ शकता. डिसेंबर अखेरीस, हैदराबाद ते मालदीव फ्लाइटच्या तिकीटाची किंमत ११ ते १५ हजार रु., चेन्नई ते श्रीलंका १० ते १७ हजार रु., बंगळुरू ते सिंगापूर १५ ते २० हजार रु., बंगळुरू ते मलेशिया १० ते १९ हजार रु., बंगळूरु ते फुकेत द्विप १९ ते २३ हजार रु., बंगळूरू ते बँकॉक २० ते २१ हजार रुपये, बंगळुरू ते व्हिएतनाम २८ ते ७१ हजार रु., आणि बंगळूरू ते बाली २४ ते ४६ हजार रु. विमानाच्या तिकिटांची किंमत आहे.
हॉटेलचेही दर कडाडले
डिसेंबर अखेरीला कळंगुट येथील गेस्ट हाऊसचे भाडे अडीच ते ५ हजार रुपये आहे, तर थ्री स्टार हॉटेल्सच्या रुमचे भाडे ५ ते ९ हजार रु. आहे. दक्षिण गोव्यातील कोलवा भागात गेस्ट हाऊसचे भाडे अडीच ते ५ हजार रु. आहे. तर थ्री स्टार हॉटेल्सच्या रुमचे भाडे ५ ते १४ हजार रु. आहे.