२४ जणांची टोळी गजाआड : एका महिन्यात सुमारे १ कोटी रुपयांची फसवणूक
पत्रकार परिषदेत बोलताना पोलीस महानिरीक्षक अलोक कुमार. सोबत राहुल गुप्ता आणि दीपक पेडणेकर.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : बनावट कॉल सेंटरद्वारे अमेरिकन नागरिकांची एका महिन्यात सुमारे १ कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा गुन्हा शाखेच्या सायबर विभागाने झुआरीनगर येथील एका बंगल्यावर छापा टाकून पर्दाफाश केला. विभागाने मुख्य सूत्रधार मयांक कौशिक (३८, नवी दिल्ली), नितीन साहनी (३६, दिल्ली), आशिष वाजपेयी (३३, हरयाणा) यांच्यासह २४ जणांवर गुन्हा दाखल केला आणि त्यांना अटक केली. त्यांच्याकडून २६ लॅपटाॅप, २६ मोबाईल, ८ राऊटर व इतर साहित्य जप्त करण्यात आले.
या कारवाईची माहिती देण्यासाठी पोलीस महासंचालक अलोक कुमार यांनी सोमवारी पोलीस मुख्यालयात पत्रकार परिषद घेतली. त्यांच्यासोबत सायबर विभागाचे प्रभारी अधीक्षक राहुल गुप्ता आणि निरीक्षक दीपक पेडणेकर उपस्थित होते. महासंचालक म्हणाले, झुआरीनगर येथील एका बंगल्यात संशयास्पद कारवाया होत आहेत. तेथे बनावट काॅल सेंटर सुरू असल्याची माहिती गुप्तहेरांकडून मिळाली होती. अधीक्षक राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक दीपक पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक सर्वेश सावंत यांच्या पथकाने शुक्रवारी रात्री त्या बंगल्यावर छापा टाकला. पथकाने मुख्य सूत्रधार मयांक कौशिक, नितीन साहनी, आशिष वाजपेयी यांच्यासह २४ जणांना ताब्यात घेतले. बंगल्याची झडती घेतली असता, तिथे बनावट काॅल सेंटर सुरू असल्याचे समोर आले. तेथून पथकाने २६ लॅपटाॅप, २६ मोबाईल, २४ हेडफोन्स, ८ इंटरनेट राऊटर व इतर साहित्य जप्त केले. निरीक्षक दीपक पेडणेकर यांनी वरील टोळीवर भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४), ३१९(२) आर डब्ल्यू ३(५) आणि माहिती व तंत्रज्ञान कायद्याचे कलम ६६डी अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. संशयितांना शनिवार, २३ रोजी वास्को येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने संशयितांना तीन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली.
संशयित टोळी या काॅल सेंटरमधून अमेझॉन, बँक कर्मचारी, पेपाल, आयओएस, झेल पे, अॅपल पे, तसेच सरकारी संस्था आणि अंमलबजावणी अधिकारी असल्याचे भासवून अमेरिकन नागरिकांना संपर्क साधत होती. कर्ज, खरेदी केलेल्या वस्तूच्या रकमेसाठी किंवा तांत्रिक साहाय्य करण्याच्या बहाण्याने गिफ्ट कार्ड, बिटकॉइन खरेदी करायला लावत होती. वरील कार्ड किंवा बिटकॉइनची रक्कम अमेरिकास्थित व्यक्तीकडून भारतीय चलनात रूपांतरित करून भारतात आणत होती.
संशयित उच्चशिक्षित
मुख्य सूत्रधार मयांक कौशिक यांच्या टोळीने गोव्यात काम करण्यासाठी दिल्लीतून युवकांची नोकरभरती केली होती. युवकांना ३५ ते ४० हजार रुपयांचे मासिक वेतन दिले जाणार होते. संशयित उच्चशिक्षित, पदवीधर आहेत.
अटक करण्यात आलेले संशयित
मुख्य सूत्रधार मयांक कौशिक (३८, नवी दिल्ली), नितीन साहनी (३६, दिल्ली), आशिष वाजपेयी (३३, हरयाणा), कर्मचारी : विकास श्रीवास्तव (३१ हरियाणा), समीर मुसा (३७, अंदमान व निकोबार), गगनदीप सिंग (३५, पंजाब), पुष्पेंद्र सिंग (३१, उत्तर प्रदेश), आकर्ष मिश्रा (२४, उत्तर प्रदेश), अखलेश गुप्ता (३८, नवी दिल्ली), गुलजार अहमद (२९, जम्मू कश्मीर), लक्ष्य शर्मा (२३, नवी दिल्ली), प्रियांशू शर्मा (२०, हरियाणा), आशिष मुरकर (२७, मुंबई), शाहरुख अजीज (३०, उत्तरप्रदेश), मोहम्मद निजामुद्दीन (२१, नवी दिल्ली), तुषार वाणी (२२, गुजरात), मोक्ष राजपूत (२७, उत्तरप्रदेश), लवकेश सोलंकी (२३, नवी दिल्ली), केवल आगरवाडकर (२०, मुंबई), चिराग वर्मा (४४, दिल्ली), दमन चंद्रा (२३, पंजाब), शाहबाज खान (२६, नवी दिल्ली), साक्षर आनंद (२४, नवी दिल्ली), नफी वाणी (२९, नवी दिल्ली).