पारोडा येथील खूनप्रकरणी मध्यप्रदेशातून एकाला अटक

संशयिताची १४ दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी


15 hours ago
पारोडा येथील खूनप्रकरणी मध्यप्रदेशातून एकाला अटक

प्रतिनिधी। गोवन वार्ता
केपे : मोड्डेवाडा-पारोडा येथील उबाल्डीना ब्रागांझा (५७) यांच्या खूनप्रकरणी संशयित रामकुमार रावत या कामगाराला मध्यप्रदेशात जाऊन केपे पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
उबाल्डीना ब्रागांझा या लंडन येथे वास्तव्याला होत्या. पारोडा येथील त्यांच्या बंगल्याचे दुरुस्ती काम सुरू आहे. बंगल्याचे काम पाहण्यासाठी त्या अधूनमधून लंडनहून पारोड्याला येत होत्या. त्यांची सोन्याची साखळी संशयित रामकुमार रावतने हिसकावली होती. त्यातूनच ब्रागांझा यांचा खून झाला होता. ब्रागांझा गुरुवारी दुपारी त्यांच्या बंगल्यात मृतावस्थेत आढळल्या होत्या. त्यांचा चेहरा विद्रूप करण्यात आला होता. घरातील दागिने व पैसे गायब असल्यामुळे त्यांचा खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. केपे पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला होता.
ब्रागांझा यांचा गळा आवळून खून झाल्याचे शवचिकित्सा अहवालातून स्पष्ट झाले होते. पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला होता. तपासात पोलिसांचा संशय कामगार रामकुुमार रावतवर बळावला होता. खुनाच्या घटनेनंतर रामकुमार गोव्यातून पसार झाला होता. तो मध्य प्रदेशमध्ये त्याच्या मूळ गावी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी मध्य प्रदेशमध्ये जाऊन त्याची चौकशी केली. चौकशीनंतर त्याला अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अर्जुन सांगोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.