रणबीर कपूर : चित्रपट निर्माते राहुल रवैल यांच्यासह आठवणींना उजाळा
राज कपूर यांच्याबद्दल भावना व्यक्त करताना अभिनेता रणबीर कपूर.
पणजी : राज कपूर यांचे चित्रपट काळ आणि सीमा ओलांडतात. आवारा, मेरा नाम जोकर आणि श्री ४२० यांसारख्या चित्रपटांची सार्वत्रिक मोहिनी होती. हे चित्रपट रशियापासून भारतापर्यंत जगभरातील प्रेक्षकांमध्ये खोलवर रुजले. त्यांच्या चित्रपटांतून समाज जीवनाचे प्रतिबिंब दिसते, असे प्रतिपादन अभिनेते तथा राज कपूर यांचे नातू रणबीर कपूर यांनी केले.
राज कपूर यांच्या शताब्दी समारंभाचा एक भाग म्हणून ५५ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) राज कपूर यांचे नातू रणबीर कपूर आणि ज्येष्ठ चित्रपट निर्माते राहुल रवैल यांनी एका विशेष सत्रात उपस्थित राहून राज कपूर यांना आदरांजली वाहिली.
‘आवारा’च्या संकल्पनेने जातीयवादाचा कसा वेध घेतला, हे नमूद केले, तर श्री ४२० मध्ये लोभ आणि महत्त्वाकांक्षेचे विषय हाताळण्यात आला. प्रेमरोग आणि राम तेरी गंगा मैली यांसारख्या नंतरच्या चित्रपटांनी स्त्रियांच्या समस्या आणि सामाजिक आव्हानांवर नैतिक कथन केले. यामुळे काळाच्या पुढे असलेला चित्रपट निर्माता म्हणून राज कपूर यांचा दृष्टिकोन अधोरेखित केला गेला, असे रणबीर यांनी सांगितले.
बाबा झाल्यानंतर पर्यावणाप्रती आणखी सजग...
पिता झाल्यानंतर पर्यावरण आणि सामाजिक बदलांप्रती आपण अधिक जागरूक झालो, असे सांगताना रणबीर कपूर यांनी, कलाकारांना त्यांचे मंच जागतिक कल्याणासंदर्भात ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी आणि त्याचे समर्थन करण्यासाठी वापरावेत, असे आवाहन केले. जगभरातील महान कलाकारांकडून प्रेरणा घेऊन स्वतःची वेगळी अशी शैली विकसित करण्यासाठी नवोदित कलाकारांना प्रोत्साहन देऊन रणबीर यांनी अभिनयात स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
सत्राच्या शेवटी, रणबीर कपूर यांनी हा आदरांजलीपर कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल इफ्फीप्रती कृतज्ञता व्यक्त केली आणि उपस्थित प्रेक्षकांना राज कपूर यांच्या चिरंतन कार्याचा आनंद घेऊन त्यांच्या आठवणी हृदयात जतन करण्याचे आवाहन केले. रणबीर याने व्यक्त केलेल्या विचारांना दुजोरा देत राहुल रवैल यांनी चित्रपट सृष्टीवरील तसेच समाजावरील राज कपूर यांच्या कायमस्वरूपी प्रभावाचा उल्लेख केला.
या सत्रात केंद्रीय माहिती आणि प्रसारण विभाग सचिव संजय जाजू, भारतीय चित्रपट निर्माते आणि इफ्फीचे महोत्सव संचालक शेखर कपूर, केंद्रीय माहिती आणि प्रसारण विभागाचे संयुक्त सचिव आणि एनएफडीसीचे व्यवस्थापकीय संचालक प्रिथुल कुमार आणि केंद्रीय माहिती आणि प्रसारण विभागातील चित्रपट विभागाच्या संयुक्त सचिव वृंदा देसाई यांनी भाग घेतला.
दहा चित्रपट होणार पुन:प्रदर्शित!
राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी), भारतीय राष्ट्रीय चित्रपट अर्काईव्ह्ज (एनएफएआय) आणि फिल्म हेरिटेज फौंडेशन या संस्थांच्या सहकार्याने राज कपूर यांच्या चित्रपटांचे पुनर्संचयन करण्याच्या प्रयत्नांचीदेखील रणबीर कपूर यांनी माहिती दिली. राज कपूर यांचे दहा चित्रपट याआधीच पुनर्संचयित केलेले असून डिसेंबरमध्ये भारतभरात ते प्रदर्शित करण्याचे नियोजन सुरू आहे.