'पुष्पा'फेम अल्लू अर्जुनचा त्यांच्या भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी विशेष पुरस्काराने सन्मान केला जाईल.
पणजी : राज्यात सुरू असलेल्या ५५ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची (इफ्फी) आज गुरुवारी सांगता होत आहे. येथील डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियम येथे मनोरंजनाच्या विविध कार्यक्रमानंतर इफ्फीची सांगता होईल. दरम्यान या समारोप सोहळ्याला अभिनेता अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना, जया प्रदा, श्रिया सरन, प्रतीक गांधी यांची उपस्थिती लाभणार आहे. तसेच ‘पुष्पा’फेम अल्लू अर्जूनला भारतीय चित्रपट क्षेत्रातल्या योगदानासाठी विशेष पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
यंदाच्या महोत्सवाची थीम ही ऑस्ट्रेलियन चित्रपटसृष्टीवर आधारित होती. चित्रपट शौकिनांना या महोत्सवात अनेक अभूतपूर्व असे वेगळ्या धाटणीचे चित्रपट पाहता आले. मास्टरक्लास सेशन्समध्ये विश्वभरातील दिग्गज निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते आणि तंत्रज्ञांनी आपले अनुभव आणि एकंदरीत दृष्टिकोन प्रेक्षकांसमोर मांडले. रेड कार्पेटवर अनेक कलाकारांनी आपल्या ग्लॅमरने चारचाँद लावले.
समारोप समारंभात दिग्गज भारतीय दिग्दर्शक रमेश सिप्पी, अभिनेता-निर्माता निविन पॉली आणि अभिनेता प्रतीक गांधी यांसारख्या चित्रपट क्षेत्रातील दिग्गजांशी संवाद साधला जाईल."रिदम्स ऑफ इंडिया" या कार्यक्रमाद्वारे येथील प्रेक्षकांसमोर कथ्थक (उत्तर भारत), मोहिनीअट्टम आणि कथकली (दक्षिण भारत), मणिपुरी आणि पुंग चोलम ड्रमर्स (पूर्व भारत) आणि गरबा (पश्चिम भारत) यांसारख्या शास्त्रीय नृत्य प्रकारांमधून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवले जाईल.
समारोप सोहळ्यात ‘सुवर्ण मयूर’ पदक विजेत्याची घोषणा होणार आहे. ‘युनिस्को गांधी’ या प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या पुरस्कार विजेत्याचीदेखील घोषणा करण्यात येईल. राज्यात २० ते २८ नोव्हेंबर दरम्यान चाललेल्या इफ्फीमध्ये २७० हून अधिक चित्रपट दाखवण्यात आले. यासाठी पणजी, मडगाव आणि फोंडा येथील सहा चित्रपटगृहांची निवड करण्यात आली होती. याशिवाय आंतरराष्ट्रीय विभागात ८१ देशांतील १८० हून अधिक चित्रपट दाखवण्यात आले. यंदाच्या इफ्फीला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. देश-विदेशांतील ७ हजारांहून अधिक चित्रपट रसिकांनी इफ्फीचा आनंद घेतला.