इफ्फी : ४८ तासांत बनलेला ‘गुल्लू’ सर्वोत्कृष्ट लघुपट

‘क्रिएटिव्ह माइंडस ऑफ टुमारो’अंतर्गत स्पर्धा

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
25th November, 12:40 am
इफ्फी : ४८ तासांत बनलेला ‘गुल्लू’ सर्वोत्कृष्ट लघुपट

पणजी : ‘क्रिएटिव्ह माइंडस ऑफ टुमारो’ या ४८ तासांत लघुपट बनविण्याच्या स्पर्धेचा समारोप सोहळा मॅक्वीनेझ पॅलेस येथे झाला. यात सर्वोत्कृष्ट लघुपट म्हणून ‘गुल्लू’ची निवड करण्यात आली.

सर्वोत्कृष्ट लघुपट (उपविजेता) : वुई हियर द सेम म्युझिक, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : आर्शली जोस (गुल्लू), सर्वोत्कृष्ट कथा : अधिराज बोस (लव्हपिक्स सबस्क्रिप्शन), सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : विशाखा नायर (लव्हपिक्स सबस्क्रिप्शन), सर्वोत्कृष्ट अभिनेता : पुष्पेंद्र कुमार (गुल्लू) यांची निवड करण्यात आली.

‘क्रिएटिव्ह माइंडस ऑफ टुमारो’ (सीएमओटी) हा भारताच्या सर्वात आश्वासक तरुण चित्रपट निर्मात्यांचा शोध आणि संगोपन यासाठीचा प्रमुख मंच म्हणून उदयाला आला आहे. या उपक्रमाला यावर्षी भरघोस प्रतिसाद मिळाला. यासाठी देशभरातून चित्रपटांशी संबंधित १३ प्रकारांमध्ये आपापली प्रतिभा सादर करणाऱ्या सुमारे १,०७० कलाकारांच्या प्रवेशिका आल्या होत्या.

प्रत्येकी २० सदस्य असलेल्या पाच संघांनी ‘तंत्रज्ञानाच्या युगातील नातेसंबंध’ या विषयावर आधारित लघुपटांची निर्मिती केली.

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळवणाऱ्या आर्शली जोस यांनी यावेळी कृतज्ञता व्यक्त केली. त्या म्हणाल्या, हे यश माझ्या संपूर्ण संघाचे आहे. या चित्रपटाची कथा हाच या चित्रपटाचा खरा हिरो होता आणि ज्या क्षणाला मी ही कथा वाचली, त्याच वेळी मला समजले की आमच्या हाती काहीतरी खास लागले आहे. या अत्युत्कृष्ट संघासोबत काम करणे हा एक अविस्मरणीय अनुभव होता.

या युवा कलाकारांना मार्गदर्शन करण्यासाठी मागील वर्षीच्या सीएमओटी चॅम्पियन म्हणून गौरवण्यात आलेल्या चिदानंद नाईक, अखिल लोटलीकर, सुवर्णा दास, अक्षिता वोहरा आणि कृष्णा दुसाने या माजी विद्यार्थ्यांना आमंत्रित करण्यात आले होते.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या विशेष सचिव नीरजा शेखर, एनएफडीसीचे प्रसारण सहसचिव आणि व्यवस्थापकीय संचालक प्रितुल कुमार, चित्रपट सहसचिव वृंदा देसाई आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे माजी सचिव अपूर्वा चंद्रा यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. प्रथितयश लेखक आणि ग्रँड ज्युरी सदस्य सम्राट चक्रवर्ती यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली.

हेही वाचा