संगीतकार एआर रहमानची पत्नी सायरा बानोने आपल्या पतीपासून वेगळे झाल्याची घोषणा केली आहे. एआर रहमान आणि सायरा यांनी १९९५ मध्ये लग्न केले आणि त्यांना तीन मुले आहेत.
चेन्नई : संगीतकार एआर रहमानची पत्नी सायरा हिने पतीपासून वेगळे होत असल्याची घोषणा केली आहे. लग्नाच्या २९ वर्षांनंतर त्याच्या पत्नीने हा निर्णय घेतला आहे. सायराच्या वकील वंदना शाह यांनी या जोडप्याच्या विभक्त होण्याच्या निर्णयाबाबत अधिकृत निवेदन जारी केले.
'लग्नाच्या अनेक वर्षानंतर सायराने पती एआर रहमानपासून वेगळे होण्याचा कठीण निर्णय घेतला आहे. नात्यातील तणावानंतर हा प्रकार समोर आला आहे. त्यांचे एकमेकांवर अतोनात प्रेम असूनही, दोघांमधील तणाव आणि अडचणींमुळे दोघांत दरी निर्माण झाली आहे व ती भरून येणे शक्य नाही' अशा आशयाचे निवेदन सायरा बानोच्या वकिलाने जारी केले आहे. 'ती आयुष्याच्या एका कठीण टप्प्यातून जात आहे व लोकांनी वैयक्तिक आयुष्यात दाखल देऊन तिच्या त्रासात अजून भर घालू नये' असेही सायराच्या वकिलाने या निवेदनाद्वारे म्हटले आहे. दरम्यान याबाबत एआर रहमानची प्रतिक्रिया अजूनही समोर आलेली नाही.
संगीतकार एआर रहमान व सायरा बानो यांनी १९९५ साली लग्न केले होते व त्यांना ३ अपत्ये आहेत. एआर रहमानने १९८९ मध्ये इस्लाम धर्म स्वीकारला होता. त्याने आपले नाव दिलीप कुमार बदलून अल्लाह रखा रहमान असे केले होते. संगीतकार ए आर रहमानला १९९२ मध्ये आलेल्या रोजा चित्रपटातून पहिला ब्रेक मिळाला . तो हिट ठरला आणि रहमानच्या साउंडट्रॅकने त्याला सर्वोत्कृष्ट संगीतकाराचा राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला. त्याला सर्वोत्तम संगीतासाठी ऑस्कर देखील मिळाला आहे.