अजूनही नाविन्याच्या शोधात : विद्या बालन

Story: हर्षदा वेदपाठक । मुलाखत |
14th November, 11:42 pm
अजूनही नाविन्याच्या शोधात : विद्या बालन


नवनवीन भूमिका करणे, त्यातही प्रयोगशीलता जपणे, हे फार कमी कलाकारांना जमते. असेच एक नाव आहे विद्या बालन हिचे. आपण ग्लॅमरस भूमिका करू शकत नाही, आपण ग्लॅमरस कपड्यात चांगले दिसत नाही, हे जाणून तिने वेगळ्या भूमिका निवडल्या आणि साडी ही परिवर्तनशीलता म्हणून तिने अंगीकारली. नुकताच ‘भुलभुलय्या ३’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला बऱ्यापैकी यश लाभले आहे. त्यानिमित्ताने विद्यासोबत हर्षदा वेदपाठक यांनी केलेली बातचित...
भूल भूलैया ३ ला इतके प्रेम, कौतुक आणि यश मिळेल असे अपेक्षित होते का?
ज्या क्षणापासून मी ‘भूल भुलैया ३’ करत आहे, हे जाहीर झाले, सगळेजण विचारत होते की चित्रपट रिलीज कधी होणार? मला माहित होते की, सर्वजण खूपच उत्सुक आहेत आणि प्रत्येकजण म्हणत होता की, तुम्ही यात दिसणार आहात, त्यामुळे मला खूप चांगले वाटले. त्यामुळे माझ्यावर थोडा ताण होता. पण त्यावेळी मला असे वाटले की, चित्रपट चांगला चालेल आणि लोकांना तो आवडला, याचा मला खूप आनंद आहे. माझ्यावर थोडा ताण होता, पण आता मी भारावून गेले आहे. या चित्रपटाने, भूमिकेने आणि गाण्याने मला खूप काही दिले आहे आणि आता १७ वर्षांनंतरही मी अजूनही त्याच्यावर जगत आहे. लोक मोंजुलिका आणि ‘अमीजे तोमार’ गाण्याबद्दल बोलतात. ऐकून चांगले वाटते.
तुमच्यासाठी बॉक्स ऑफिसवर यश किती महत्त्वाचे आहे?
बॉक्स ऑफिसवर यश हा एक खूप महत्त्वाचा मापदंड आहे. कारण हे सिनेमा व्यवसाय आहे. कोणत्याही व्यवसायात गुंतवणूक केल्यावर आपण नफा अपेक्षित करतो. आजच्या काळात हे जास्त महत्त्वाचे आहे. कारण अलीकडील काही चित्रपट चांगले चाललेले नाहीत. व्यावसायिक यशासारखा गोडवा कोणत्याच गोष्टीत नाही.
माधुरीही या चित्रपटात असेल, याची तुम्हाला कल्पना होती का?
नाही, मला माहिती नव्हते. माझी निवड झाल्यानंतर त्या भूमिकेसाठी विचार सुरू होता आणि दिग्दर्शक अनीस बझ्मी माधुरी दीक्षित यांना भेटले. आम्हाला खात्री नव्हती की, ती होकार देईल. पण तिने लगेचच होकार दिला. तिने होकार दिल्यानंतर मला वाटले की ते मला तिच्यासोबत नाचायला लावतील. त्यांनी मला सांगितले की मला तिच्यासोबत नाचावे लागेल. सुरुवातीला मला भीती वाटत होती. कारण माधुरी दीक्षितसोबत नाचायचे होते आणि ते माझेच गाणे होते. त्यामुळे प्रतिष्ठा टिकवायची होती. म्हणून मी खूप मेहनत केली. मी ‘दो और दो प्यार’च्या शूटिंगमध्ये व्यस्त होते आणि गाण्यासाठी रिहर्सल करत होते. माधुरी दीक्षितच्या नृत्याची बरोबरी कोणीही करू शकत नाही. ‘दो और दो प्यार’चे प्रमोशन करताना थकून जायचे, पण डार्क चॉकलेट खाऊन मी माझे गाणे उत्तम करण्यासाठी रिहर्सल करत होते.
माधुरी दीक्षितसोबतच्या काही आठवणी आहेत का, ती तुमची आदर्श होती का?
ती खूप छान व्यक्ती आहे. कधी कधी तुम्हाला एखादी व्यक्ती आवडते. पण त्या व्यक्तीकडून त्याच प्रेमाची परतफेड होत नाही. मी तिच्यावर अनेक वर्षांपासून प्रेम केले आहे आणि अजूनही तिच्यावर प्रेम करते. आणि माझ्यासाठी ते महत्त्वाचे आहे. मी तिला नेहमीच आदर्श मानले होते आणि ती माझ्या अपेक्षेपेक्षा जास्तच होती. ती एक खूप छान आणि उदार व्यक्ती आहे. शुटिंगदरम्यान तिने नृत्याच्या स्टेप बदलल्या. त्यामुळे दोनदा मी अडकले. मी म्हणाले की, मला जमणार नाही. पण तिने सांगितले की, ती खूप सोपी स्टेप आहे आणि तिने मला ती कशी करायची हे शिकवले आणि मी सहज ते शिकले. हीच माधुरी दीक्षित आहे.
मोंजुलिकाची ही भूमिका भाग २ पेक्षा कशी वेगळी आहे?
ती खूप वेगळी आहे. ते दोन भिन्न व्यक्तिमत्त्व आहेत. तिथे ती अवनी होती आणि इथे ती मल्लिका आहे. यावेळी थोडे रहस्यमय आहे. कारण प्रेक्षकांना माहित आहे की, ती मोंजुलिका आहे. आम्ही मजा तयार करायचा प्रयत्न केला आणि शेवटी काही वेगळे उघड केले. भूमिकेकडे माझा दृष्टिकोन पूर्णपणे नवा होता. दिग्दर्शक अनीस बझ्मी हे दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्यापेक्षा पूर्णतः वेगळे आहेत. त्यामुळे भूमिकेकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे नवीन होता. पण काहीतरी असते ज्याला ‘मसल मेमरी’ म्हणतात. जेव्हा मी एक सीन केला, तेव्हा एक असिस्टंट माझ्याकडे आला आणि म्हणाला की, त्याला ‘भूल भुलैया १’ बघितल्यासारखे वाटले. त्याने मला विचारले की, मी पुन्हा चित्रपट पाहिला का? मी म्हणाले, नाही, मला लवकर विसरायला होते आणि मी नवीन दृष्टिकोनातून ही भूमिका घेतली होती. कधीकधी काही गोष्टी आपल्या स्मरणात राहतात. जेव्हा मी सीन केला, तेव्हा मोंजुलिका माझ्यात उतरली. या जगात कुठेही मोंजुलिका असेल तर, मला माहित आहे की ती नेहमीच मला आशीर्वाद देईल.
तुम्ही खूप आत्मविश्वासाने भरलेल्या, आनंदी आणि सकारात्मक दिसता, हा बदल कसा झाला?
मी नेहमीच आनंदी होते. पण आता चित्रपट चांगला चालल्यामुळे मी अधिक आनंदी आहे. जेव्हा चित्रपट चांगले चालत नाहीत, तेव्हा तुम्ही स्वतःला समजवायचा प्रयत्न करता. पण तुमची मनःस्थिती खालावते. कारण प्रत्येकाने खूप मेहनत केलेली असते. प्रत्येक चित्रपटाचे बॉक्स ऑफिसवर वेगळे नशीब असते.
तुम्ही खूप यश मिळवले आहे, खऱ्या आयुष्यात तुम्ही किती आध्यात्मिक आहात?
माझ्या घरी एक छोटेसे मंदिर आहे. मी रोज देवाची प्रार्थना करते. जर मला प्रार्थना करावीशी वाटली नाही, तर मी करत नाही. माझ्या लहानपणापासूनची मी प्रार्थना करत आले आहे. माझी आई रोज प्रार्थना करायची आणि मंदिरात जायची. माझी आई बर्‍याच वेळा मंत्रोच्चार करते. माझे वडीलदेखील प्रार्थना करतात आणि तो माझ्या आयुष्यातील एक भाग आहे. हेच मला अधिक शक्ती देते. देव चांगला असो किंवा वाईट, तोच माझा आधार आहे. माझा विश्वास, माझी प्रार्थना आणि प्रत्येक क्षणात देवाचे आभार मानते. मी जितके अधिक आभार मानले तितके देवाने मला अधिक आभार मानण्यासाठी कारणे दिली. तुम्ही आजसाठी आभार मानलात, तर तुमचा उद्याचा दिवस चांगला असतो.
माधुरीबरोबर नाचताना तुम्हाला किती आव्हानात्मक वाटले?
आव्हानापेक्षा, ती माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट होती. मी तिचे ‘एक दो तीन’ गाणे पाहून मोठी झाले आणि अभिनेत्री बनण्याचा निर्णय घेतला. आज मी आभारी आहे की मी तिच्यासोबत फक्त नृत्यच नाही तर अभिनयही केला. स्पर्धेची संधीच नव्हती. प्रेरणेसोबत काहीतरी करण्याची संधी किती वेळा मिळते? मी तिच्यासोबत माझ्या गाण्यावर नाचत होते, त्यामुळे तो माझ्यासाठी मोठा क्षण होता. म्हणून मी खूप मेहनत करून माझे सर्वोत्तम करायचे ठरवले. मला माहित होते की, तिच्याइतके चांगले होणे अशक्य आहे, पण मी माझे सर्वोत्तम प्रयत्न केले.

हेही वाचा