अभिनेत्री क्रिती सेननचा ‘दो पत्ती’ हा नेटफ्लिक्सवर रिलीज झालेला नवा सिनेमा घरगुती हिंसाचारासारख्या एका गंभीर प्रश्नाला हात घालू पाहतो खरा, पण सुमार मांडणीमुळे विषयाचे नेमकं गांभीर्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात तो अपयशी ठरतो. आजवर अनेक चांगल्या जाहिरातींचे दिग्दर्शन करणाऱ्या शशांक चतुर्वेदीचे हे पहिलेच सिनेदिग्दर्शन. सिनेमाची निर्माती असलेल्या क्रितीने या सिनेमात सौम्या आणि शैली अशी जुळ्या बहिणींची दुहेरी भूमिका साकारली आहे.
सिनेमाची कथा घडते ती नयनरम्य निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या उत्तराखंडमध्ये. ध्रुव सूद हा उत्तराखंडमधल्या एका दिग्गज राजकारण्याचा मुलगा. एका पॅराग्लायडिंग कंपनीचा मालक असलेला ध्रुव आपल्या वडलांच्या मदतीने मोठा व्यवसाय उभारायचे स्वप्न बघत असतो. अशातच त्याची भेट सौम्या नावाच्या सोज्वळ मुलीशी होते. सततच्या भेटीगाठींतून सौम्याच्या मनात ध्रुवबद्दल प्रेमभावना वाढीस लागतात. तिच्या कुटुंबाशी ओळख करून घेत असतानाच ध्रुवला तिची जुळी बहीण शैलीही भेटते. सौम्यापेक्षा अगदी विरुद्ध स्वभावाची असलेली बिनधास्त, डॅशिंग शैली ध्रुवला आवडते आणि ते एकमेकांना डेट करू लागतात. पण वडिलांच्या कानउघडणीनंतर ध्रुव सौम्याशी लग्न करतो. लग्नानंतर काही महिन्यांत ध्रुवचे हिंसक रूप हळूहळू उघड होऊ लागते आणि त्याची परिणीती घरगुती हिंसाचारात होते. एका टप्प्यावर प्रकरण हाताबाहेर जाऊन ते विद्या ज्योती या महिला पोलीस इन्स्पेक्टरकडे जाते आणि अनेक गूढ धागे उलगडत जातात.
गेल्यावर्षी आपल्या अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवणाऱ्या क्रितीने यावेळी दुहेरी भूमिका साकारून जास्तीत जास्त स्क्रीन व्यापण्याचा केलेला प्रयत्न हा निव्वळ एक फसलेला अट्टाहास आहे. काही वर्षांपूर्वी आलेल्या लोकप्रिय ‘महाभारत’ सिनेमातला अर्जुन हाच होता यावर विश्वास बसू न देणारा शाहीर शेखचा ठोकळेबाज अभिनय ध्रुव या पात्राला न्याय देऊ शकलेला नाही. गेल्या काही सिनेमांपासून कनिका ढिल्लनचा तर्कविसंगत कथानकांकडे झुकलेला कल इथे अधिकच स्पष्टपणे दिसून येतो. तन्वी आझमी-काजोल या जोडगोळीने मिळून केलेला अपेक्षाभंग घरगुती हिंसाचारासारख्या गंभीर विषयाची हवाच काढून घेतो. आपल्या मिनीटभराच्या जाहिरातींमधून अपेक्षित आशय प्रेक्षकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याचे कौशल्य दिग्दर्शक शशांक चतुर्वेदीला या सिनेमात दाखवता आलेले नाही.
घरगुती हिंसाचार हा विषय याआधीही ‘थप्पड’, ‘डार्लिंग्ज’सारख्या सिनेमांमधून मांडला गेलाय. ‘क्रिमिनल जस्टीस’सारख्या वेबसिरीजच्या दुसऱ्या सीझनमध्ये हा विषय कोर्टरूम ड्रामाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे हाताळला गेलाय. दिग्गज कलाकारांना घेऊन या यादीत बसण्याचा प्रयत्न करणारा ‘दो पत्ती’ पाहताना मात्र पुरती निराशाच हाती लागते.