उद्घाटन सोहळ्यास श्री श्री रविशंकर हे देखील उपस्थित राहणार असून ते उपस्थितांना संबोधित करतील
पणजी : गोव्यात आज २० नोव्हेंबरपासून आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुरू होत आहे. या निमित गोव्याच्या धर्तीवर भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार भेट देणार आहेत. याप्रसंगी अनेक नावाजलेल्या सर्जनशील चित्रपटांचे प्रदर्शन होईल. तसेच चित्रपट सृष्टीशी निगडीत विविध क्षेत्रातील दिग्गजांची चर्चासत्रे देखील होतील. एकूणच यंदाचा इफ्फीचा सोहळा भारतीय तसेच परदेशी चित्रपट चाहत्यांसाठी मेजवानी ठरणार आहे.
आज २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी पार पडणाऱ्या महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याला सुभाष घई, दिनेश विजन, अमर कौशिक, एनएम सुरेश, आरके सेल्वामणी, ईशारी गणेशन, रवी कोतारकारा तसेच प्रसून जोशी यांसारखे प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व तंत्रज्ञ उपस्थित राहणार आहेत. यावेळी प्रसिद्ध अभिनेते नागार्जुन, नित्या मेनन, मला, विक्रांत मेसी, रकुल प्रीत, मानुषी छिल्लर, बोमन इराणी, राजकुमार राव, अभिषेक बॅनर्जी, जयदीप अहलावत, रणदीप हुडा, सानया मल्होत्रा, जयम रवी, जॅकी भगनानी, आर. सरथ कुमार, मुक्ता बर्वे, सोनाली कुलकर्णी, राधाकृष्णन पार्थिबन यांच्यासह इतर मान्यवर देखील यावेळी उपस्थित राहणार आहेत. यावेळी चित्रपटसृष्टीतील दिग्गजांसह आध्यात्मिक क्षेत्रातील दिग्गज श्री श्री रविशंकर हे देखील उपस्थित राहणार असून ते उपस्थितांना संबोधित करतील.
आजच्या वेळापत्रकानुसार दुपारी २ वाजता पणजीतील आयनॉक्स थिएटरनजीक रेड कार्पेटचे आयोजन करण्यात आले आहे. यात रेड कार्पेट गाला प्रीमियर मध्ये दुपारी २:३० वाजता ऑस्ट्रेलियन दिग्दर्शक मायकल ग्रेसी यांच्या द बेटर मॅनचा प्रीमियर होईल. यानंतर दुपारी तीनच्या सुमारास, फिल्म बाजारचे उद्घाटन केले जाईल. सायंकाळी शामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियमवर ५ वाजता रेड कार्पेट गालाचे आयोजन करण्यात आले असून यानंतर ५.३० वाजता उद्घाटन सोहळा पार पडणार आहे.
यंदाच्या महोत्सवात सर्जनशील व मनाचा ठाव घेणाऱ्या चित्रपटांचा गौरव केला जाणार आहे. यासाठी विविध विभागांची निर्मिती करण्यात आली आहे. यावेळी महोत्सवाची थीम ही पूर्णतः ऑस्ट्रेलियन चित्रपट सृष्टीवर आधारित आहे. ऑस्ट्रेलियन चित्रपट संस्कृतीशी चित्रपट चाहत्यांना एकरूप होता येईल. ५५व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आपल्या कलेने चित्रपटसृष्टी आणि चित्रपट व्यवसायाला यशाच्या शिखरावर नेणाऱ्या कलाकार आणि तंत्रज्ञांचा देखील गौरव केला जाईल.