शॉर्ट फिल्मसाठी ५ ते ६ मिनिटांचा कालावधी, १००हून अधिकांचा सहभाग
पणजी : युवा भारतीय चित्रपट निर्मात्यांच्या प्रतिभा पारखण्यासाठी तसेच त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी चित्रपट निर्मिती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तरुण सहभागींनी एका निश्चित बजेटमध्ये ४८ तासांच्या आत ५ ते ६ मिनिटांची शॉर्ट फिल्म तयार करणे आवश्यक आहे. या स्पर्धेत १०० हून अधिक जणांनी सहभाग घेतला आहे.
क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो ही स्पर्धा माहिती आणि प्रसारण मंत्रालय, नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि शॉर्ट्स टीव्ही यांनी संयुक्तपणे ही स्पर्धा आयोजित केली आहे. नेक्स्ट जनरेशन एआय या थीम अंतर्गत स्पर्धेत सहभागी होणाऱ्या मुलांनी लघुपट तयार करणे आवश्यक आहे. इफ्फीची फिल्म बाजाराच्या मॅरियट हॉटेलमध्ये ही स्पर्धा होत आहे.
या स्पर्धेविषयी माहिती देताना शॉर्ट्स टीव्हीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्टर पिचर म्हणाले की स्पर्धा बुधवारी सकाळी १०.३० वाजता सुरू झाली आणि शुक्रवारी १०.३० वाजता संपली. लघुपट बनवण्यासाठी आम्ही त्यांना १ हजार डॉलरचे बजेट दिले असून त्यांना या बजेटमध्येच चित्रपट बनवायचा आहे. त्याशिवाय ते स्वतःचा अतिरिक्त खर्च घालू शकत नाहीत. तसेच त्यांनी ४८ तासांच्या आत शुटिंग आणि एडिटींग पूर्ण केले पाहिजे.
वेळेच्या आधी आणि नंतर काहीही करता येणार नाही. सकाळी १०.३० वाजता स्पर्धा सुरू झाल्यावर त्यांना स्पर्धेची थीम सांगण्यात आली. त्याच वेळी त्यांनी स्क्रिप्ट तयार केली, कलाकारांची निवड केली आणि कोणी काय काय करायचे ते ठरवले. आता सर्वांनी चित्रपटाचे चित्रीकरण केले आहे.
४८ तासांत चित्रपट बनवण्याची क्षमता पाहिली जाईल
स्पर्धेत १०० मुलांनी सहभाग घेतला असून आम्ही त्यांची सहा गटात विभागणी केली आहे. ज्यांचा चित्रपट सर्वोत्कृष्ट असेल त्यांच्यामधून आम्ही विजेता आणि उपविजेता ठरवणार आहोत. आम्हाला माहित आहे की ४८ तासांत चित्रपट बनवणे कठीण आहे. पण यातच त्याची क्षमता बघायला हवी. भविष्यात त्यांची काम करण्याची क्षमता आणि टॅलेंट या माध्यमातूनच समोर येईल. मुले जे चित्रपट बनवणार आहेत ते शॉर्ट्स टीव्ही, ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील पाहता येतील, असे कार्टर म्हणाले.