करवीर : कोल्हापूरच्या करवीरमधील केर्ले गावातील कन्या कुमार विद्यामंदिरात सहावीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या अंगावर शाळेची जुनाट लोखंडी गेट पडल्याने त्याचा मृत्यू झाला. सदर घटना काल सकाळी ८:३० च्या सुमारास घडली. स्वरूप दीपकराज माने असे या मुलाचे नाव आहे. या दुर्घटनेने पालक वर्ग आक्रमक झाला असून शाळा प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप करत करवीर पोलीस स्थानकात तक्रार नोंदवण्यात आली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, स्वरूपला त्याच्या वडिलांनी सकाळी शाळेत सोडले होते. त्याच्या घरापासून शाळा अवघी दीड-दोन किलोमीटर लांब आहे. सकाळी शाळेतील प्रार्थना झाल्यानंतर सर्व विद्यार्थी आपापल्या वर्गात गेले. शिक्षकांनी हजेरी घेतल्यानंतर स्वरूप आपल्या वर्ग शिक्षकांची परवानगी घेत लघुशंका करण्यासाठी वर्गातून बाहेर पडला.
दरम्यान शाळेच्या गेटच्या दरवाज्यातून तो जात असतानाच येथील गंजलेल्या अवस्थेतील जुनाट लोखंडी गेट थेट त्याच्या अंगावर पडली. या दुर्घटनेत लहानग्या स्वरूपच्या डोक्याला गंभीर जखम होत रक्तस्राव झाला व तो बेशुद्ध पडला. दरम्यान याच अवस्थेत त्यास नजीकच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले असता स्वरूपला मृत घोषित करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार पालकवर्गाने अनेकदा शाळा प्रशासनाकडे सदर गेट बदलण्याची मागणी केली होती. योग्य वेळी ही गेट बदलण्यात आली असती तर कदाचित आज स्वरूप जीवंत असता असे स्वरूपच्या वडिलांनी म्हटले. स्वरूपच्या पश्चात वडील, आई तसेच भाऊ असा परिवार आहे.