नागरी पुरवठा खात्याची सूचना; ५ लाख ई-केवायसी पूर्ण
पणजी : रेशनकार्ड लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी सक्तीची करण्यात आली आहे. १५ दिवसांच्या आत ई-केवायसी न केल्यास ही कार्डे निलंबित केली जातील. आतापर्यंत ५ लाख गोमंतकीयांनी ई-केवायसी केली आहे. उर्वरीत कार्डधारकांनी सोसायटीत जाऊन त्यांचे आधारकार्ड लिंक करून ई-केवायसी करून घ्यावी, अशी सूचना नागरी पुरवठा खात्याने केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रेशनकार्ड ई-केवायसी करणे बंधनकारक केले आहे. ही प्रक्रिया मागील एका वर्षापासून सुरू आहे. कार्डांवर देण्यात येणारे रेशन लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी ही सक्ती करण्यात आली आहे. ई-केवायसी न केल्यास सोसायटीतून रेशन मिळणे बंद होईल. मात्र रेशनकार्ड रद्द केली जाणार नाही किंवा कार्डवरून कोणाचेही नाव हटवले जाणार नाही. रेशनकार्ड मात्र निलंबित राहतील आणि ई-केवायसी नंतरच कार्यान्वित होतील.
आतापर्यंत, राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्या (एनएफएसए) अंतर्गत रेशन कार्ड लाभार्थ्यांपैकी ६४ टक्के आणि दारिद्र्यरेषेखालील ३७ टक्के लाभार्थ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे. राज्यातील एकूण १०.७२ लाख सोसायटी रेशन घेणाऱ्यांपैकी ५.२६ लाखांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे.
एनएफएसए अंतर्गत प्राधान्य कुटुंब आणि अंत्योदय अन्न योजना कार्डचा लाभ घेणारे ४.७९ लाख गोवा आहेत, त्यापैकी ३.०७ लाख धारकांनी ई-केवायसी केली आहे. गरीबीरेषेवरील ५.९३ लाख कार्डधारक लाभ घेतात त्यापैकी २.१९ लाख गोमंतकीयांनी ई-केवायसी केली आहे.
लाभार्थी पुढे येत नाहीत
गेल्या वर्षभरापासून खात्यातर्फे लाभार्थ्यांच्या रेशनकार्डासाठी ई-केवायसी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, कितीही उपक्रम हाती घेतले तरी ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी लाभार्थी पुढे येत नाहीत. प्रक्रिया पूर्ण न केल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता निलंबित करण्यात येतील, असा इशारा खात्याने दिला.