ओपिनियन पोलमुळे भाजपचे मनोधैर्य उंचावले

Story: राज्यरंग |
14th November, 10:03 pm
ओपिनियन पोलमुळे भाजपचे मनोधैर्य उंचावले

विधानसभा निवडणुकीसाठी १३ नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्यात ४३ मतदारसंघांत मतदान पार पडले. दुसऱ्या टप्प्यात ३८ जागांसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे. मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीपर्यंत नेण्यात दुमका जिल्ह्याचे मोठे योगदान राहिले आहे. २०१९ च्या निवडणुकीत या जिल्ह्यातील चारपैकी तीन जागा झारखंड मुक्ती मोर्चाने (झामुमो), तर एक जागा काँग्रेसने जिंकली होती. यंदा या जिल्ह्यातील निकालाबाबत उत्सुकता आहे.

दुमका, शिकारीपाडा, जामा आणि जरमुंडी मतदारसंघ या जिल्ह्यात येतात. या मतदारसंघांत २० नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. दुमकामधून भाजपने माजी खासदार सुनील सोरेन यांना मैदानात उतरवले आहे. झामुमोने वसंत सोरेन यांच्यावर विश्वास दाखवला आहे. तिकीट न मिळाल्याने नाराज डॉ. लुईस मरांडी यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत झामुमो पक्षात प्रवेश केला आहे. २०१४ मध्ये भाजपचे लुईस मरांडी, २०१९ मध्ये झामुमोचे हेमंत सोरेन आणि २०२० मध्ये पोटनिवडणुकीत झामुमोचेच वसंत सोरेन विजयी झाले होते. 

शिकारीपाडामधून झामुमोने सलग सात वेळा आमदार राहिलेले विद्यमान खासदार नलीन सोरेन यांचे पुत्र आलोक यांना तिकीट दिले आहे. भाजपने माजी उमेदवार परितोष सोरेन यांच्यावरच पुन्हा विश्वास दाखवला आहे. २०१९ मध्ये नलीन यांनी परितोष यांना आस्मान दाखवले होते. जामामधून झामुमोने अलीकडेच भाजप सोडून आलेल्या डॉ. लुईस मरांडी यांना उमेदवारी दिली आहे. भाजपने तिसऱ्यांदा सुरेश मुर्मू यांना तिकीट दिले आहे. २०१९ च्या निवडणुकीत झामुमोच्या सीता सोरेन यांनी विजय मिळवला होता. मात्र यावर्षी लोकसभा निवडणुकीत सीता सोरेन यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. झामुमोचे बंडखोर रामकृष्ण हेम्ब्रम यांच्या उमेदवारीमुळे मतांची विभागणी होण्याची शक्यता आहे. जरमुंडीत ‘इंडी’ आघाडीतील झामुमो, कॉंग्रेस, राजद यांचा संयुक्त उमेदवार म्हणून कॉंग्रेसचे आमदार, माजी मंत्री बादल पत्रलेख तिसऱ्यांदा मैदानात आहेत. भाजपनेही देवेंद्र कुंवर यांना तिसऱ्यांदा मैदानात उतरवले आहे.

रणधुमाळी सुरू असतानाच भाजप आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (रालोआ) मनोधैर्य उंचावणारा ‘ओपिनियन पोल’ समोर आला आहे. ‘मॅट्रिझ’च्या सर्वेक्षणात रालोआला बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सर्वेक्षणानुसार, रालोआला ८१ पैकी ४५ ते ५० जागांवर विजय मिळेल. बहुमतासाठी ४१ आमदारांची गरज असते. २०१९ मध्ये काँग्रेस आणि झामुमोच्या आघाडीला ४६ जागी विजय मिळाला होता. यंदा झामुमो, काँग्रेस आणि राजद एकत्र निवडणूक लढवत आहेत. सर्वेक्षणानुसार, या आघाडीला १८ ते २५ जागाच मिळू शकतील. झामुमो-भाजप यांच्यातील लढाईत कोण बाजी मारते, याबाबत औत्सुक्य आहे.

- प्रदीप जोशी