देव तुमच्या वांशिकतेत आहे : कुल गोत्राचे विज्ञान

आजकाल, लोक शेजारच्या कोणाशीही प्रेमात पडतात जे कोणत्याही कुळाचे असू शकतात आणि जनुके सगळी मिसळून गेली आहेत, त्यामुळे ते त्याच पद्धतीने काम करणार नाही. समाज बदलला आहे, म्हणून अशा प्रकारचे स्वरूप सगळ्यांसाठी तितके प्रासंगिक नाही.

Story: विचारचक्र |
10th November, 10:55 pm
देव तुमच्या वांशिकतेत आहे : कुल गोत्राचे विज्ञान

सद्गुरू : भारत हा असा देश आहे जिथे कुठलाही ‘एक देव’ नाही. ही एकमेव संस्कृती आहे जी याबाबत जागरूक आहे की, देव ही आपली निर्मिती आहे. ही संस्कृती तुम्हाला तुम्ही निवडलेल्या देवावर विश्वास ठेवण्याची किंवा अजिबात विश्वास न ठेवण्याची मुभा देते. आणि जर तुम्हाला तुमच्या आवडीचा देव सापडला नाही, तर ती तुम्हाला एक नवीन देव बनवण्याचे स्वातंत्र्य देते. म्हणूनच आपल्याकडे शेवटच्या मोजणीनुसार ३३ दशलक्ष देव आहेत! हे देव काल्पनिक खेळणी नव्हते. आपण प्रतिष्ठापनेचे विज्ञान, देव-निर्मितीचे एक संपूर्ण विज्ञान विकसित केले होते.            

आपल्या देवतांना यंत्र म्हणून संबोधले जाते - शब्दशः, जीवनाच्या सगळ्या प्रकटीकरणांमध्ये वाढ करण्याची यंत्रे. जर तुम्ही व्यावसायिक असाल, तर एक प्रकारची देवता; जर तुम्ही सर्जनशील व्यक्ती असाल, तर दुसऱ्या प्रकारची देवता; जर तुम्ही आध्यात्मिक व्यक्ती असाल, तर वेगळ्या प्रकारची देवता. चोरांनाही त्यांच्या चोरीला पाठिंबा देणाऱ्या त्यांच्या स्वतःच्या देवी-देवता आहेत. पारंपारिकरित्या, काही जमाती होत्या ज्या सांस्कृतिकदृष्ट्या चोर होत्या. त्यांनी त्याला एक व्यवसाय मानले आणि त्यांच्या व्यवसायाचा त्यांना अभिमान होता. आणि त्याला पाठिंबा देण्यासाठी, त्यांच्या स्वतःच्या देवता होत्या कारण ही ऊर्जारूपे विशिष्ट प्रकारच्या कार्यांना सुलभ करण्यासाठी तयार केली गेली होती. त्यांच्या देवतेची पूजा न करता, ते कधीही चोरीसाठी जात नसत.            

कुलदेवता नावाच्या इतर देवता आहेत, किंवा विशिष्ट कुलासाठी (वंश) तयार केलेल्या देवता, ज्या दक्षिण भारतात खूप सामान्य आहेत. पूर्वी, वेगवेगळ्या कुलांचा जनुकीय नकाशा ठेवला जात असे, आणि केवळ विशिष्ट प्रकारच्या जनुकांसाठी देवतांची प्रतिष्ठापना केली जात असे. काही मंदिरे सामान्य कल्याणासाठी होती, जिथे सर्वजण जात. पण विशिष्ट उद्देशांसाठी, लोक केवळ त्यांच्या कुलदेवतेकडेच जात.            

एक उदाहरण द्यायचे झाल्यास, सध्या शास्त्रज्ञ सांगत आहेत की आशियाई लोकांमध्ये एक विशिष्ट प्रकारचे डीएनए असते जे त्यांना मधुमेहाकडे अधिक झुकणारे बनवते. अमेरिकन्सकडे दुसऱ्या प्रकारचे डीएनए आहेत, त्यामुळे ते दुसऱ्या काही गोष्टींकडे झुकतात. म्हणून, जर तुम्ही आशियाई आहारात एखादा पूरक पदार्थ जोडला, अमेरिकन आहारात दुसरा, आणि युरोपियन आहारात काहीतरी वेगळं, तर तुम्ही लोकांच्या जगण्याच्या पद्धतीत बदल करू शकता. अमेरिकेत अशा गोष्टी घडल्या आहेत, जिथे त्यांच्या डीएनएवर आधारित ब्रेड बनवण्याच्या प्रक्रियेत काही पूरक पदार्थ जोडले गेले, आणि १९४० आणि ५० च्या दशकात त्यांना जे अनेक आजार होते ते नाटकीयरित्या कमी झाले. उदाहरणार्थ, शास्त्रज्ञांना आढळले की अमेरिकन आहारात व्हिटॅमिन डी-३ जोडल्याने त्यांचा मधुमेह दूर होऊ शकतो. म्हणून त्यांनी ते ब्रेड बनवण्याच्या प्रक्रियेत जोडले आणि आज, युनायटेड स्टेट्समध्ये मधुमेहाचे प्रमाण बरेच कमी आहे. सध्याच्या पिढीला हे देखील माहीत नाही की ते काही विशिष्ट पूरक पदार्थ घेत आहेत जे काही आजारांना प्रतिबंधित करत आहेत. आता, भारताला जगाची मधुमेह राजधानी असण्याचा मान मिळाला आहे. पण जर आपण व्हिटॅमिन डी-३ खाल्ले, तर ते आशियाई जनुकांसाठी त्याच पद्धतीने काम करणार नाही.            

त्याचप्रमाणे, भारतीय संस्कृतीने समजून घेतले की हे पैलू कसे काम करतात. म्हणूनच इथल्या लोकांनी वंशावळी इतक्या काटेकोरपणे राखल्या आणि विशिष्ट प्रकारच्या कुळांसाठी किंवा जनुकीय समूहांसाठी ऊर्जा स्रोत स्थापन केले. जेव्हा लोक या देवतांकडे जात, तेव्हा ते म्हणत, "हे माझे नाव आहे. मी या वंशावळीचा आहे. हे माझे गोत्र, नक्षत्र आणि कुळ आहे." ही त्यांची देवतेसोबत त्यांच्या वांशिक माहितीची नोंदणी करण्याची पद्धत होती; ते वर कुठल्यातरी देवाला हे सांगत नव्हते. मुळात, ते म्हणत होते, "हे माझे कूळ आहे, माझ्यासाठी काहीतरी करा." ही एखाद्याच्या जनुकांचे व्यवस्थापन करण्याची सर्वात वैज्ञानिक पद्धत होती.            

दुर्दैवाने, आज ते एक गोंधळ बनले आहे. जीवनाच्या अद्भुत गुंतागुंतीची जाणीव ठेवून ही संस्कृती निर्माण केली गेली, पण जी साधने आणि संस्था हे पिढ्यानपिढ्या पोहोचवणार होत्या त्या गेल्या तेराशे वर्षांत गंभीरपणे विस्कळीत झाल्या. आजही त्या विज्ञानाचे अवशेष आहेत. लोक अजूनही त्यांच्या कुलदेवतेकडे जात आहेत पण आता कदाचित विज्ञानाच्या आकलनाने देवता तयार केल्या जात नसतील. शिवाय, आजकाल, लोक शेजारच्या कोणाशीही प्रेमात पडतात जे कोणत्याही कुळाचे असू शकतात आणि जनुके सगळी मिसळून गेली आहेत, त्यामुळे ते त्याच पद्धतीने काम करणार नाही. समाज बदलला आहे, म्हणून अश्या प्रकारचे स्वरूप सगळ्यांसाठी तितके प्रासंगिक नाही.            

आज, सार्वत्रिक देवता तयार करणे चांगले आहे, ज्या जनुकांवर आधारित नसतील, तर एखाद्याच्या ऊर्जेच्या विकासावर आधारित असतील. आम्ही हेच करत आहोत. ध्यानलिंग असो, लिंग भैरवी असो किंवा आमच्या केंद्रांमधली इतर ऊर्जा रूपे असोत, आम्ही त्यांची अशी प्रतिष्ठापना केली आहे की, ते तुम्हाला तुमच्या जनुकांमार्फत किंवा वंशावळींमार्फत ओळखणार नाहीत. ते तुम्हाला तुमच्या सध्याच्या असलेल्या ऊर्जेच्या आणि विकासाच्या दृष्टीने ओळखतील.            

(एक योगी, द्रष्टा, आत्मज्ञानी आणि प्रसिद्ध लेखक असा लौकिक असलेले सद्गुरू हे भारतातील पहिल्या ५० अतिशय प्रभावशाली व्यक्तींपैकी एक आहेत. सदगुरूंना भारत सरकारतर्फे २०१७ मध्ये ‘पद्मविभूषण’पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ते ४ अब्ज लोकांपर्यंत पोहोचलेल्या कॉन्शस प्लॅनेट - सेव्ह सॉइल (माती वाचवा) या जगातील सर्वात मोठ्या लोकचळवळीचे संस्थापक देखील आहेत.)


- सद् गुरू

(ईशा फाऊंडेशन)